वांद्रे बॅण्डस्टॅण्ड येथे समुद्रकिनारी खडकावर बसलेले एक प्रेमी युगुल भरतीच्या लाटेत वाहून बुडाल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. त्यापैकी तरुणीला पोलीस व स्थानिक मच्छीमारांनी वाचवले, मात्र या घटनेत तरुणाचा मृत्यू झाला. त्याचा मृतदेह रात्री उशिरा सापडला. संबंधित तरुणीवर रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वांद्रे बॅण्डस्टॅण्ड येथे खडकात बसण्यास मनाई असतानाही अनेक तरुण मुले, मुली, जोडपी तिथे जाऊन बसतात. मनाई करणारे फलकही वांद्रे येथे लावण्यात आले आहेत. मात्र तरीही पर्यटक त्याकडे दुर्लक्ष करतात. बुधवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास एक जोडपे समुद्रकिनाऱ्यापासून १०० ते १५० फूट आत खडकावर बसले होते. थोडय़ा वेळाने भरती येऊ लागल्यानंतर समुद्राचे पाणी वाढू लागले. वाढलेल्या पाण्याचा अंदाज न आल्यामुळे दोघेही बुडू लागले. पोलिसांच्या व स्थानिक मच्छीमारांच्या मदतीने तरुणीला वाचवण्यात यश आले. तिला भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. ही मुलगी दिवा येथे कापूर बनवण्याच्या कंपनीत कामाला आहे. दरम्यान, कोळीबांधव, लाईफ गार्ड यांच्या मदतीने तरुणाचा शोध संध्याकाळी उशिरापर्यंत सुरू होता. नौदल आणि तटरक्षक दलाचीही मदत घेण्यात आली होती. संध्याकाळी साडेसात वाजता मुलाचा मृतदेह हाती लागला.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Drowned love couple akp