करोना महासाथीमुळे असमानतेला खतपाणी; कैलाश सत्यार्थी यांचे मत

जमनालाल बजाज पुरस्कार विजेत्यांचा सत्कार

‘विकसित देशांमध्ये ६५ टक्केचे लसीकरण पूर्ण झाले आहे. तेथे दोनपैकी एका व्यक्तीने लस घेतली आहे. याउलट, निर्धन देशांमध्ये १२ पैकी एका व्यक्तीला लस मिळाली आहे. अशा प्रकारच्या असमानतेला जग नेहमीच तोंड देत आले आहे. करोना महासाथीमुळे या असमानतेला खतपाणी मिळाले’, अशी चिंता बालहक्क चळवळकर्ते आणि नोबेल शांतता पारितोषिक विजेते कैलाश सत्यार्थी यांनी व्यक्त केली.

कैलाश सत्यार्थी यांच्या हस्ते ४३ व्या जमनालाल बजाज पुरस्कार २०२१ च्या विजेत्यांचा सत्कार सोमवारी करण्यात आला. जमनालाल बजाज यांच्या जयंती निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या पुरस्कार सोहळ्यात गांधीजींच्या आदर्शांचे अनुसरण करून मानवतावादी व सामाजिक कार्य आणि विकासकामे केलेल्या मान्यवरांना गौरविण्यात आले. मानपत्र, सन्मानचिन्ह आणि १० लाख रुपये रोख असे पुरस्काराचे स्वरुप आहे. यावेळी जमनालाल बजाज फाउंडेशनच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष राहुल बजाज, फाउंडेशनच्या सल्लागार मंडळाचे अध्यक्ष डॉ. आर. ए. माशेलकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

यावेळी सत्यार्थी यांनी सांगितले, ‘लहान मुलांचे शिक्षण, आरोग्य इत्यादी गोष्टींवर आपण खर्च केला नाही, तर २०२२ सालाच्या अखेरपर्यंत चार कोटी ६० लाख मुले बालमजुरीत ढकलली जातील,’ अशी भीती त्यांनी व्यक्त केली. सध्याच्या स्थितीत अडीच ते तीन कोटी मुले शाळेत परतणार नसल्याचे त्यांनी सांगितले. साधने, संसाधने अशा सर्वच गोष्टींचे जागतिकीकरण झाले आहे. जगातील सर्वच नागरिक परस्परांवर अवलंबून आहेत. यशस्वी होणाऱ्या व्यक्तींच्या मागे अनेक कष्टकऱ्यांचे कष्ट असतात. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे गरजेचे आहे. हे जग विविध घटकांनी तयार झाले असून त्या विविधतेचा आपण आदर केला पाहिजे, अशी भावना सत्यार्थी यांनी व्यक्त केली.

पुरस्काराचे मानकरी

छत्तीसगड येथील धरमपाल सैनी यांना विधायक कार्यक्षेत्रातील उत्कृष्ट योगदानासाठी, ग्रामीण विकासासाठी विज्ञान व तंत्रज्ञानाचा उपयोग केलेल्या हिमाचल प्रदेशमधील डॉ. लाल सिंग आणि महिला व बालविकासासाठीच्या श्रीमती जानकीदेवी बजाज स्मरणार्थ  पुरस्कारासाठी महाराष्ट्रातील सिस्टर लुसी कुरियन यांची निवड करण्यात आली. भारताबाहेर गांधीजींच्या मूल्यांचा प्रसार केल्याबद्दलचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार अमेरिकेतील डेव्हिड एच. अल्बर्ट यांना देण्यात आला आहे.  यावेळी फाऊंडेशनच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष राहुल बजाज म्हणाले, महनीय कार्य करणाऱ्या या व्यक्तींनी गांधीवादी तत्वांच्या प्रचारासाठी योगदान दिले असून अनेकांच्या आयुष्यात भावनिक, आर्थिक आणि सामाजिक परिवर्तन घडवून आणले. त्यांच्या कार्यातून इतरांना निस्वार्थी सेवाभावासाठी प्रेरणा मिळेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Kailash satyarthi opinion on inequality due to corona abn

Next Story
‘विशेष मागासवर्गाचे दोन टक्के आरक्षण रद्द करा’; उच्च न्यायालयात जनहित याचिका
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी