शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढून त्याची शैक्षणिक प्रगती साधली जावी याकरिता प्रत्येक शाळेमध्ये मुख्याध्यापकांच्या अध्यक्षतेखाली ‘गुणवत्ता विकास कक्ष’ स्थापन करण्यात येणार आहे.
‘शैक्षणिक गुणवत्ता विकास’ कार्यक्रमाअंतर्गत स्थापण्यात येणाऱ्या या कक्षाच्या माध्यमातून प्रत्येक विद्यार्थ्यांला अध्ययनात येणाऱ्या समस्या दूर करून त्यांची शैक्षणिक प्रगती व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. शाळेचे मुख्याध्यापक या कक्षाचे अध्यक्ष असणार असून संस्थेचे, शिक्षकांचे, विषयतज्ज्ञ, पालक-शिक्षक संघ, उपमुख्याध्यापक वा पर्यवेक्षक; तसेच ज्येष्ठ शिक्षक यांचा मिळून हा कक्ष असेल. या समितीने नियमित बैठका घेऊन विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी प्रयत्न करायचा आहे.
या कक्षातील संबंधितांनी एकत्र भेटून, बोलून, चर्चा करून मार्ग काढावा, असे अपेक्षित आहे. त्यामुळे, विद्यार्थ्यांची पर्यायाने शाळेची गुणवत्ता वाढेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पालकांचाही सहभाग
शिक्षण हक्क कायद्यामुळे पहिली ते आठवी विद्यार्थ्यांना नापासच करता येत नाही, हा गैरसमज शिक्षक, विद्यार्थी, पालक अशा सर्वच स्तरांत पसरला आहे. त्यामुळे, काही शाळांमध्ये गैरप्रकारही वाढले आहेत. आधी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेकडे दुर्लक्ष करायचे आणि नंतर दहावीचा निकाल फुगविण्याच्या नादात नववीला मोठय़ा प्रमाणावर विद्यार्थी अनुत्तीर्ण करायचे, असे प्रकार वाढले आहेत. या कक्षाच्या माध्यमातून गुणवत्तावाढीच्या कार्यक्रमात पालकांनाही सहभागी करून घेतले जाणार आहे. त्यामुळे, या कक्षाच्या माध्यमातून निश्चितपणे गुणवत्तावाढीकरिता प्रयत्न करणे शक्य आहे, असे स्पष्ट करत ‘महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघ महामंडळा’चे प्रवक्ते प्रशांत रेडीज यांनी या कक्षाचे स्वागत केले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Skill development classes in school