ठाणे शहरात कोणत्याही परिस्थितीत कर्करोग रुग्णालय उभे राहावे यासाठी महापालिकेने ‘टाटा मेमोरियल ट्रस्ट’पुढे शहरातील वेगवेगळ्या भागांतील मोक्याच्या भूखंडांची जंत्रीच मांडली असून यापैकी कोणताही भूखंड अवघ्या एक रुपयांच्या कायमस्वरूपी भाडेपट्टय़ाने देण्याची तयारी दर्शवली आहे. सुपर स्पेशालिटी रुग्णालयांची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी माजिवडे, ढोकाळी, खारीगाव आणि दिवा पट्टय़ात महापालिकेने आरक्षित ठेवलेल्या चार मोक्याच्या भूखंडांपैकी कोणताही एक भूखंड निवडल्यास तोही ट्रस्टकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
वागळे इस्टेट येथील मुंबईच्या वेशीवर असलेल्या मॉडेला मिलची जागा तसेच ग्लॅडी अल्वारिस मार्गावरील सुरेंद्र मिल कंपाऊंडमधील सुविधा भूखंडांचा पर्यायही पुढे आणण्यात आला आहे.
ठाणे महापालिकेच्या वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये कर्करोगग्रस्त रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेता आयुक्त असीम गुप्ता यांनी ठाणे शहरात एखादे कर्करोग रुग्णालय उभारले जावे, अशा स्वरूपाचा प्रस्ताव टाटा मेमोरियल ट्रस्टपुढे ठेवला आहे. मुंबईतील परळस्थित असलेल्या टाटा रुग्णालयावर कर्करोगपीडित रुग्णांचा मोठा भार पडतो. त्यामुळे ठाण्यात या रुग्णालयाचे एखादे केंद्र उभे केले जावे, असे महापालिकेचे म्हणणे आहे. यासाठी योग्य ती जागा उपलब्ध करून देण्याचा प्रस्तावही महापालिकेने ठेवला आहे. महापालिकेच्या या प्रस्तावास टाटा रुग्णालयाच्या व्यवस्थापनाकडून हिरवा कंदील दाखविण्यात आल्याने आता हे रुग्णालय नेमके कुठे उभे करता येईल, याचा शोध सुरू करण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thane palika ready to give free land to cancer hospitals