काही घटना अनुभवताना त्या किती महत्त्वाच्या आहेत ते त्या क्षणी समजत नाही. तीन वर्षांपूर्वी जानेवारीत, रणथंबोरच्या जंगलात कॅण्टरमधून (छत नसलेली बस) भटकताना खरे तर वाघाच्या डरकाळीपेक्षा कुडकुडणाऱ्या थंडीनेच कापरे भरवले होते. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची ती अभ्यास सहल होती. त्यामुळे व्याघ्रदर्शन हे जंगलात भटकण्याचे एकमेव कारण नव्हते..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

िवध्य आणि आरवली पर्वतरागांचा भाग असलेले रणथंबोरचे जंगल जैवविविधतेसाठी प्रसिद्ध आहे. आपल्याकडे सह्य़ाद्रीमध्ये सदाहरित म्हणजे वर्षांचे बारा महिने हिरवी राहणारी जंगले आहेत. मात्र राजस्थानमधील हे जंगल पानगळीचे आहे. जानेवारी हा पानगळीचा मोसम असल्याने त्या दिवसांत अधिकाधिक जनावरे पाहायला मिळतात. सकाळच्या जंगलसफारीत घुबडापासून मोर, काळवीट, सांबर अगदी सहजी दिसले. तलावाच्या काठावर पहुडलेल्या प्रचंड आकाराच्या मगरी आणि फक्त गाइडलाच दिसलेले अस्वल (आपल्या मनात अस्वलाची प्रतिमा गोड असली तरी जंगली अस्वल हिंस्र असते) यामुळे काही काळ तणावपूर्ण शांतताही अनुभवली. जंगलाचा आणखी काही भाग पाहून संध्याकाळी परतत होतो. जंगलाच्या दगडमातीतून धूळ उडवत कॅण्टर वेगाने जात होती. त्या धुळीत आजूबाजूचेही काही दिसत नव्हते. एवढय़ात बसला झटका बसावा तशी ती थांबली. काही कळायच्या आत चालकाने बस हळूहळू मागे घ्यायला सुरुवात केली. बसच्या उजव्या बाजूने एक वाघीण चालत येत होती. गाइड पुटपुटला.. ‘ही मछली, रणथंबोरची सर्वात प्रसिद्ध वाघीण.’ आणखीही बरेच काही तो सांगत होता, पण त्याकडे दुर्लक्ष करावे, एवढा तो प्राणी उमदा होता. अवघ्या सहा-आठ फुटांवर असलेल्या त्या वाघिणीला पाहून कॅमेरा स्थिर ठेवून त्याचे बटन दाबणेही हिमतीचेच होते. मछली मात्र स्वत:च्या मस्तीत, आजूबाजूच्या माणसांची पर्वा न करत दमदार पावले टाकत निघून गेली. ती गेलेल्या वाटेकडेही आम्ही बराच वेळ डोळे लावून बसलो होतो..

आम्ही पाहिली तेव्हा मछली १७ वर्षांची होती. वाघांचे सरासरी आयुष्य १५ वर्षांचे. त्यामानाने मछली वृद्धच. मात्र तरीही त्या प्राण्याचा आब पाहिल्यावर वय हा केवळ आकडा असतो, यावर विश्वास बसला. मछलीच्या गाथा तर त्याहून सरस. कपाळावर माशासारखी खूण असल्याने तिला मछली नाव पडले. १४ फूट लांबीची, पूर्ण वाढ झालेल्या मगरीची शिकार करणाऱ्या व्हिडीओमुळे मछली जगभरात प्रसिद्ध झाली. तिचा दबदबा एवढा होता की, जंगलातील वाघही तिला बिचकून असत. सर्वसामान्यरीत्या वाघिणी दोन ते तीन वेळा प्रसूत होतात. १९९९ ते २००६ या सात वर्षांत मछलीची चार वेळा प्रसूती झाली व तिने सात मादी व चार नर पिलांना जन्म दिला. एवढेच नव्हे तर शिकारीत तरबेज असलेली मछली तिच्या पिल्लांची काळजी घेण्यातही माहीर होती. २००४ मध्ये रणथंबोर येथील वाघांची संख्या १४ होती, २०१४ मध्ये ही संख्या ५० वर गेली. यापैकी अर्धेअधिक वाघ हे मछलीचे वारसदार असल्याचे सांगितले जाते. ही मछली सतत प्रकाशझोतात राहिली. तिच्यामुळे रणथंबोर व तिर जंगलातील पर्यटकांची संख्या व त्यामुळे उत्पन्नही वाढल्याचे दाखले दिले जातात. अगदी गेल्या आठवडय़ात ती गेली तेव्हाही तिचा अंत्यसंस्कार सोहळा चर्चेत होता.

मछलीएवढे नसले तरी भारतातील वाघ कायम बातम्यांमध्ये राहिले आहेत. कधी चांगल्या कारणांसाठी तर कधी त्यांच्या अवैध शिकारींसाठी. भारतात ४९ क्षेत्रे वाघांसाठी राखीव आहेत. राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाच्या अधिकृत आकडेवारीनुसार २००६ मध्ये १,४११ वाघ होते. २०११ मध्ये ही संख्या वाढून १,७०६, तर २०१४ मध्ये २,२२६ झाली होती. जगातील ७० टक्के वाघ भारतात आहेत. ही संख्या आश्वासक असली तरी दरवर्षी मृत्यू पावणाऱ्या वाघांची तसेच शिकार केलेल्या वाघांची संख्याही खूप जास्त आहे. २०१५ मध्ये ९१ वाघांचा मृत्यू झाला. त्यापैकी ५८ वाघांचा नैसर्गिक किंवा अपघातात मृत्यू झाला, तर २६ वाघ तस्करीसाठी मारले गेले. २०१६ मधील चित्र यापेक्षाही त्रासदायक आहे. आठव्या महिन्यापर्यंतच ९१ वाघांचा मृत्यू नोंदवला गेला आहे. त्यातील ३३ वाघांची शिकार झाल्याचा दावा ‘वाइल्डलाइफ प्रोटेक्शन सोसायटी ऑफ इंडिया’ने (डब्ल्यूपीएसआय) केला आहे. ‘टायगरनेट’ या राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाच्या अधिकृत आकडेवारीनुसार २७ जुलैपर्यंत ५९ वाघांचा मृत्यू झाला असून त्यापैकी १५ वाघांची शिकार झाली. अर्थात ही अधिकृत आकडेवारीही आनंद व्यक्त करण्यासारखी नाही. मात्र यावर उपायांसाठी प्रयत्न करण्याऐवजी राजकारण अधिक महत्त्वाचे ठरते.

सध्या नागपूरहून जय वाघ हरवला आहे. गेले चार महिने त्याचा थांगपत्ता लागलेला नाही. त्याचा शोध घेण्यासाठी वन अधिकारी प्रयत्न करत आहेत. त्याची शिकार झाली की तो अधिक घनदाट अरण्यात गेला, त्याबद्दल शंका आहेत. मछलीही २०१४मध्ये अशीच गायब झाली होती. मात्र ती महिनाभरानंतर सापडली, तेव्हा तोही बातमीचा विषय झाला होता. मछलीइतके वलय प्रत्येक वाघाला मिळेलच असे नाही; किंबहुना ते मिळत नाही. त्यामुळेच वाघांच्या शिकारीच्या बातम्या सहज दडपता येतात. वाघांची संख्या वाढतेच हे खरे असले तरी वाघांच्या शिकारीचे प्रमाणही कमी झालेले नाही, हे सत्य आहे. उत्तम शिकारी आणि प्रेमळ आई होऊन रणथंबोरच्या जंगलातील वाघांची संख्या वाढविण्याचे काम केलेल्या मछलीच्या जाण्याच्या निमित्ताने हे सत्य जास्तच टोचतंय.

prajakta.kasale@expressindia.com

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tiger missing issue in maharashtra
First published on: 27-08-2016 at 02:00 IST