मुंबई : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात ‘हॅलो’ नव्हे ‘वंदे मातरम’ या अभियानाचा प्रारंभ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार आहे. सरकारी अधिकारी-कर्मचारी यांना सरकारी कार्यालयात त्यांचे सहकारी, कार्यालयात येणारे अभ्यागत यांच्याशी दूरध्वनी अथवा मोबाइल आदींवर किंवा बैठकीत  संवाद साधताना ‘हॅलो’ या अंगवळणी पडलेल्या शब्दाऐवजी ‘वंदेमातरम’ असे संबोधन करावे लागणार आहे. ‘वंदेमातरम बोलण्याची सक्ती नसेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. या बदलासाठी सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार हे आग्रही आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शासकीय कार्यालयात दूरध्वनी अथवा परस्परभेटीत संवाद साधताना कोणत्या शब्दाने अभिवादन करायचे याबाबत स्पष्टता नाही. पाश्चिमात्य संस्कृतीचे अनुकरण करताना ‘हॅलो’ हा कोणताही विशिष्ट अर्थ नसलेला आणि संभाषणकर्त्यांमध्ये कोणतीही आपुलकी न जागवणारा केवळ एक अभिवादन करणारा शब्द आहे, असे या परिपत्रकात म्हटले आहे. शासकीय कार्यालयांबरोबरच निमशासकीय कार्यालये, शासन साहाय्यित/ अनुदानित/ अर्थसाहाय्यित व इतर स्वरूपाचे साहाय्य असणारी कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, शाळा/ महाविद्यालये तसेच शासन अंगीकृत सर्व कार्यालयांतही दूरध्वनीवर किंवा भ्रमणध्वनीवर अभ्यागत किंवा सहकारी यांनी संवाद साधल्यास, सुरुवातीला ‘वंदेमातरम’ असे संबोधन करावे. तसेच त्यांनी त्यांच्या वैयक्तिक भ्रमणध्वनीवरही संवाद साधताना ‘वंदेमातरम असे संबोधन करावे. ज्या ठिकाणी स्वयंचलित दूरध्वनी यंत्रणा अस्तित्वात आहे त्या ठिकाणीही हा बदल करण्यात यावा.

कर्मचाऱ्यांची नापसंती : मुनगंटीवार यांनी सर्वप्रथम ‘हॅलो’ऐवजी ‘वंदेमातरम’ असे संबोधन करण्याबाबत मंत्रीपदाची शपथ घेतल्यावर ट्वीट केले होते. यावर विरोधी पक्षाने टीका केली होती. सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी खासगीत या निर्णयावर नापसंती व्यक्त केली आहे. मुनगंटीवार मात्र या निर्णयावर ठाम आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vande mataram instead hello government offices campaign starts today ysh