नागपूर : नागपूरसह राज्यातील काही भागात मध्यंतरी डेंग्यू, चिकनगुनिया आजाराचे रुग्ण वाढले होते. या आजारावर नियंत्रण मिळत असतांनाच आता राज्यात ‘लेप्टोस्पायरोसिस’ आजाराचे रुग्ण व मृत्यूही वाढले आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा या आजाराने तिप्पट मृत्यू आहेत. त्यापैकी मागील आठवडाभरातील मृत्यूमुळे आरोग्य विभागातील अधिकारी- कर्मचाऱ्यांचे टेंशन वाढले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लेप्टोस्पायरा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिवाणूंमुळे होणाऱ्या लेप्टोस्पायरोसिसच्या वाढत्या रुग्णसंख्येने आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रक कार्यक्रम अहवालानुसार, राज्यात १ जानेवारी २०२४ ते २८ नोव्हेंबर २०२४ या काळात लेप्टोस्पायरोसिस आजाराचे ९२४ रुग्ण आढळले. त्यापैकी २१ रुग्णांचा मृत्यू झाला.

हेही वाचा : अंदाज पावसाचा, पण आकाशातून पडले वेगळेच काही…कोरियन भाषेतला मजकूर बघून…

दरम्यान ही रुग्णसंख्या १ जानेवारी २०२४ ते २१ नोव्हेंबर २०२४ रोजी दरम्यान ९०० रुग्ण होती. त्यातील फक्त एकाचाच मृत्यू झाला होता. त्यामुळे मागील आठवडाभरात राज्यात या आजाराचे २४ नवीन रुग्ण वाढले असले तरी तब्बल २० मृत्यू वाढल्याचे दिसत आहे. मागच्या वर्षी १ जानेवारी २०२३ ते ३१ डिसेंबर २०२३ दरम्यान राज्यात या आजाराचे १ हजार ४८४ रुग्ण तर ८ मृत्यू नोंदवण्यात आले होते. या रुग्णसंख्येला सार्वजनिक आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला.

मृत्यूचे प्रमाण ०.५३ टक्क्यांवरून २.२७ टक्क्यांवर

राज्यात मागील वर्षी १ जानेवारी २०२३ ते ३१ डिसेंबर २०२३ दरम्यान १ हजार ४८४ रुग्णांपैकी ८ रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे मृत्यूचे प्रमाण ०.५३ टक्के होते. यंदा १ जानेवारी २०२४ ते २८ नोव्हेंबर २०२४ दरम्यान ९२४ रुग्णांपैकी २१ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे रुग्णांच्या तुलनेत मृत्यूचे प्रमाण २.२७ टक्के झाले आहे.

हेही वाचा : “‘त्यांना’ दणदणीत विजयाचा विश्वास होता; शिंदेची सभा नाकारली”, जाधव यांचा संजय गायकवाड यांना टोला

लेप्टोस्पायरोसिस आजाराचे कारण?

लेप्टोस्पायरोसीस आजार प्रामुख्याने अंदमान निकोबार बेटे, महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक केरळ व तमिळनाडूमध्ये आढळतो. या रोगाचे निदान रुग्णाचे रक्त व लघवी प्रयोगशाळेत तपासून करता येते. रोगबाधीत प्राणी (मुख्यत: उंदीर, डुक्कर, गाई, म्हशी, कुत्री) यांच्या लघवीवाटे जंतू बाहेर पडतात. या प्राण्याच्या लघवीने दूषित झालेले पाणी, माती, भाज्या यांचा माणसांच्या त्वचेशी संपर्क आल्यास हा रोग होतो. भात व ऊस लागवडीच्या प्रदेशात मुख्यत: या रोगाचे प्रमाण जास्त असते. जास्त व अवेळी पाऊस पडल्याने हा आजार होण्याची शक्यता वाढते.

हेही वाचा : शिवशाही अपघात : आदल्या दिवशी बस चुकली अन्…

राज्यातील लेप्टोस्पायरोसिस रुग्णांची स्थिती

वर्ष – रुग्ण – मृत्यू

२०२१ – ३४७ – १०
२०२२ – ४५८ – १८
२०२३ – १४८४ – ०८
२०२४ – (२८ नोव्हें.पर्यंत) ९२४ – २१