पर्यावरणपूरक अंत्यसंस्काराचा परिणाम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विकास प्रकल्प, बांधकाम अशा विविध कारणांमुळे शहरात वृक्षतोडीचे प्रमाण वाढले आहे. मात्र, त्याचवेळी पर्यावरणपूरक पद्धतीने केल्या जाणाऱ्या अंत्यसंस्कारामुळे दर महिन्याला १५ वष्रे वयाच्या सुमारे ६०० झाडांना जीवदान दिले जात आहे. तर वर्षांला ७२०० झाडे वाचवण्यात उपराजधानी यशस्वी ठरली आहे.

पर्यावरणपूरक अंत्यसंस्काराचे बीज २०१३ साली उपराजधानीत रोवले गेले. गेल्या सात वर्षांत त्याचा मोठा वृक्ष झाला आहे. राजधानी मुंबईने उपराजधानी नागपूरची ही संकल्पना स्वीकारली, तर देशातील इतर शहरांनीदेखील पर्यावरण संरक्षणासाठी पाऊल उचलले. २०१६ या वर्षांत शहरातील अंबाझरी घाट हा पूर्णपणे पर्यावरणपूरक स्मशानघाट म्हणून घोषित करण्यात आला. तेव्हापासून आतापर्यंत या स्मशानघाटावर ३५०० लोकांचे अंत्यसंस्कार पर्यावरणपूरक पद्धतीने करण्यात आले. २०१९ मध्ये शहरातील आणखी पाच स्मशानघाट  या शृंखलेत जोडले गेले.

शहरात आता दर महिन्याला सुमारे ३०० अंत्यसंस्कार पर्यावरणपूरक पद्धतीने केले जातात. एका व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी १५ ते २० वष्रे वयाच्या दोन वृक्षांचा बळी जातो. त्यानुसार आता या शहरात एका महिन्यात सुमारे ६०० आणि एका वर्षांत सुमारे ७२०० झाडांना जीवदान मिळत आहे.

..तर दोन कोटी वृक्ष वाचतील

पर्यावरणपूरक अंत्यसंस्काराची पद्धत संपूर्ण देशात लागू झाली तर देशात प्रत्येक वर्षी सुमारे दोन कोटी वृक्ष वाचवण्यात आपण यशस्वी होऊ. यामुळे जगभरात पर्यावरणक्षेत्रात भारताचे नाव मोठे करण्यात प्रत्येक व्यक्तीचे योगदान राहील, असे मत शहरात पर्यावरणपूरक अंत्यसंस्काराचे बीज रोवणारे विजय लिमये यांनी व्यक्त केले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpur environment save tree akp