बुलढाणा : चालू वर्षाच्या प्रारंभापासून अनामिक अशा आजाराने शेगाव तालुक्यातील रहिवाशांना छळले. त्याचा प्रसार शेजारील खामगाव आणि नांदुरा तालुक्यातही झाला. केसगळती आणि टक्कल पडण्याच्या या विचित्र आजाराचे रुग्ण तीनशेच्या घरात गेले. अजूनही याचे ना ठोस निदान झाले, ना हमखास उपचार मिळाला, ना केंद्रीय आरोग्य संस्थेचा बहुप्रतीक्षित अहवाल प्राप्त झाला. यामुळे भय इथलं संपत नाही, असे तीन तालुक्यातील टक्कलबाधित गावातील विदारक चित्र कायम आहे. केसगळती आणि टक्कल पडण्याचे आव्हान कायम असतानाच आता नवीन संकट समोर आले आहे. केसगळतीच्या आजराचा एक केंद्रबिंदू असलेल्या शेगाव तालुक्यातील बोंडगावमध्ये नवीन आजाराने तोंड वर काढले आहे. या गावातील कही गावाकऱ्यांची हातांची नखे गाळून पडत असल्याचे वृत्त आहे.बोंडगावमध्ये केसगळतीनंतर आता नागरिकांच्या बोटांची नखंही गळून जात असल्याने अगोदरच दहशतीत असलेल्या गावकऱ्यांची मानसिक स्थिती बिकट झाली आहे.परिसरातील इतर गावांतील नागरिकांचीही बोटांची नखं गळून पडत असल्याचा दावा ग्रामस्थांमधून होत आहे.
आरोग्य यंत्रणेचं म्हणणं काय?
यासंदर्भात विचारणा केली असता, आरोग्य विभागाच्या वरिष्ठ सूत्रांनी या घडामोडीला अप्रत्यक्ष दुजोरा दिला. बोंडगावसह परिसरात अचानक नख गळणाऱ्या व्यक्तींची संख्या पाच ते सहा असल्याचा प्राथमिक अहवाल आहे. त्यानुसार बोंडगावमध्ये जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य विभागाचे एक पथक नखगळतीबाधित बोंडगावमध्ये दाखल झाले आहे. पथकातील अधिकाऱ्यांनी प्रथम शेगाव तालुका आरोग्य कार्यालयाला भेट देऊन प्राथमिक चौकशी केली. नखगळतीसंदर्भात प्राप्त तक्रारी, प्राथमिक माहिती जाणून घेतली. यानंतर हे पथक बोंडगावकडे रवाना झाले.
सेलिनियमचा परिणाम?
केसांप्रमाणेच हा सेलिनियमचा परिणाम असल्याचे जाणकारांनी सांगितले. बाधित गावातील गावकऱ्यांच्या शरीरात सेलिनियमचे प्रमाण कैकपटीने वाढल्याने केसांप्रमाणेच नख गळत असल्याचा दावा या सूत्रांनी बोलून दाखविला. ज्येष्ठ संशोधक पद्मश्री डॉ. हिंमतराव बावस्कर यांनी केलेल्या तपासणीत गावकऱ्यांच्या शरीरात याचे गंभीर प्रमाण आढळले होते. एरवी शरीरात प्रतिलिटर ५८ ते २३४ मायक्रोग्राम असते. केसगळतीबाधित रुग्णांच्या शरीरात हे प्रमाण ४ते ५ हजार मायक्रोग्राम आढळून आले होते.
© The Indian Express (P) Ltd