मुंबईच्या चतुरंग प्रतिष्ठानतर्फे आयोजित सवाई एकांकिका स्पर्धेच्या अंतिम फेरीत येथील दि जिनिअस निर्मित ‘कस्टमर केअर’ एकांकिकेतील शंकराच्या भूमिकेबद्दल नीलेश सूर्यवंशी याला महाराष्ट्राचा या वर्षीचा सवरेत्कृष्ट सवाई अभिनेता म्हणून गौरविण्यात आले.
या बाबतची माहिती एकांकिकेचे प्रमुख मार्गदर्शक आणि दि जिनिअसचे प्रमुख प्रवीण काळोखे यांनी दिली. अंतिम फेरीत काल पहाटेपर्यंत सादर झालेल्या एकूण सात एकांकिकांमध्ये नाशिकच्या दत्ता पाटील लिखित व बाळकृष्ण तिडके दिग्दर्शित ‘कस्टमर केअर’चा समावेश होता. सहा एकांकिका मुंबईच्या, तर एक नाशिकची अशी अनोखी चुरस पाहावयास मिळाली. सवाईच्या अंतिम फेरीत नाशिकमधून धडक मारणारी कस्टमर केअर ही पहिलीच एकांकिका ठरली आहे. तसेच अंतिम फेरीत सवाई अभिनेत्याचा पुरस्कार मिळविणारा नीलेश सूर्यवंशी हा पहिलाच अभिनेता ठरला आहे.
गेली काही वर्षे रंगभूमीवर गाजत असलेल्या कस्टमर केअरला आजवर पुण्याचा पुरुषोत्तम करंडक, अखिल भारतीय नाटय़ परिषद यासह अनेक पुरस्कार प्राप्त झाले असून, आता अतिशय प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या सवाईचाही स्पर्श झाला आहे. परीक्षक म्हणून अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, अभिनेता वैभव मांगले आणि प्रसाद ओक यांनी काम पाहिले.
या एकांकिकेला ज्येष्ठ रंगकर्मी लोकेश शेवडे, कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे कार्यवाह मकरंद हिंगणे, नाटय़ परिषदेचे प्रा. रवींद्र कदम, ज्येष्ठ रंगकर्मी सदानंद जोशी यांचे सहकार्य लाभले. एकांकिकेत करिष्मा देसले व नीलेश सूर्यवंशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. प्रकाश योजना रवी रहाणे व विजय रावळ, संगीत प्रतीक नाईक, नेपथ्य चंद्रकांत जाडकर व गुलाब पवार, रंगभूषा माणिक कानडे, वेशभूषा ओवी भालेराव यांची आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

 

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nilesh suryavanshi bet sawai best actor award