पोलीस निरीक्षक अशोक सादरे आत्महत्या प्रकरण
जळगाव येथील पोलीस निरीक्षक अशोक सादरे आत्महत्या प्रकरणातील संशयित वाळू ठेकेदार सागर चौधरीचा अटकपूर्व जामीन अर्ज शुक्रवारी येथील जिल्हा न्यायालयाने फेटाळला. जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. आर. कदम यांच्या न्यायालयात चौधरीच्या अर्जावर सुनावणी झाली. सादरे यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीवरून जळगावचे पोलीस अधीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर, गुन्हा शाखेचे निरीक्षक प्रभाकर रायते आणि वाळू माफिया सागर चौधरी या तिघांविरुद्ध पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याने आणि वाळू माफिया चौधरीचे सत्ताधाऱ्यांशी लागेबांधे असल्याने तपास यंत्रणा संबंधितांना अटक करण्यात चालढकल करत असल्याचे आरोप राजकीय पक्षांकडून केले जात होते. दरम्यानच्या काळात संशयित चौधरीने नाशिक न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला. बुधवारी झालेल्या सुनावणीत दोन्ही पक्षांकडून तीन तास युक्तिवाद करण्यात आला. चौधरी गुन्हेगार असून त्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. यामुळे त्याचा अर्ज नामंजूर करण्याची विनंती सरकारी वकील राजेंद्र घुमरे यांनी केली होती. दरम्यान, सादरे कुटुंबीयांनी न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करत संशयितांपासून जिवाला धोका असल्याचे म्हटले होते. चौधरी मुक्त राहिल्यास तपास कामात अडथळे येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे त्याचा अर्ज नामंजूर करण्याची विनंती सादरे कुटुंबीयांच्या वकिलांनी केली. शुक्रवारी न्यायालयाने चौधरीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sagar chaudhry bail refuse