कासा : साखरशेत प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जवळपास एकही अद्ययावत सुविधांनी युक्त रुग्णालय नाही. त्यामुळे साखरशेत येथे ग्रामीण रुग्णालय उभारावे, अशी मागणी आदिवासी व ग्रामस्थांनी केली आहे. जव्हार-सिलवासा रस्त्यावर साधारणपणे जव्हारपासून १६ ते १७ किमीवर साखरशेत प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. साखरशेत प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत ३० गावे असून ६६ पाडे आहेत. त्यामधील जवळपास ४१ हजारांच्या लोकसंख्येला आरोग्याच्या सुविधा पुरविण्याची जबाबदारी या आरोग्य केंद्रावर आहे. केंद्राअंतर्गत दाभोसा, देहरा, कोरतड, बरवाडपाडा, दाभेरी, वावर वांगनी अशी ८ उपकेंद्रे आहेत. तसेच २ मदत केंद्रे असून २ पथके आहेत. जव्हार तालुक्यात आरोग्य यंत्रणेने चांगल्या सुविधा द्याव्यात, अशी नागरिकांची अपेक्षा आहे. पण ती पूर्ण होत नाही. तालुक्यातील डोंगराळ व आदिवासी भागातील ग्रामस्थांना अनेकदा उपचारासाठी सिलवासा अथवा नाशिक गाठावे लागते. तोवर जाण्याचा प्रवास खरोखरच कठीण असतो. यासाठी साखरशेत येथे असणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे ग्रामीण रुग्णालयात रूपांतर करावे, अशी मागणी केली जात आहे.
जव्हार तालुक्यातील साखरशेत या डोंगराळ व आदिवासी भागात सध्या हे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. या केंद्रामार्फत परळी आरोग्य केंद्र जवळपास ४१ हजार नागरिकांना आरोग्य सेवा पुरविते. साखरशेतमधील केंद्रात दररोज २००-२५० बाह्यरुग्ण उपचारासाठी येतात. पावसाळय़ात तर ही संख्या ३००-३५०वर पोहोचते. या आरोग्य केंद्रावर यामुळे प्रचंड ताण पडत असून, औषध-गोळय़ा आणि अन्य सेवांवर याचा विपरीत परिणाम होतो. त्यामुळे येथे असणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे रूपांतर उपजिल्हा रुग्णालयात व्हावे अशी मागणी जोर धरू लागली आहे.
साखरशेत आरोग्य केंद्रावर आरोग्य सेवेचा प्रचंड ताण पडत आहे. या परिसरात जवळपास अद्ययावत सुविधानी युक्त असे रुग्णालय नसल्याने वेळप्रसंगी सिलवासा, नाशिक अशा ठिकाणी जावे लागते. तरी आमच्या मागणीचा विचार करावा आणि साखरशेत येथे ग्रामीण रुग्णालय उभारण्यात यावे.
— गोविंद भोये, ग्रामस्थ