मूकबधीर बालिकेचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. बालिकेवर अत्याचार करून पसार झालेल्या आरोपीचा शोध घेण्यात येत आहे.
याबाबत बालिकेच्या आईने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार राठोड नावाच्या व्यक्तीसह दोघां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दहा वर्षांची बालिका मूकबधीर असून ती घरासमोर खेळत होती. तिला आमिष दाखवून राठाेड नावाच्या आरोपी आणि साथीदाराने तिचे अपहरण केले. बालिकेला धमकावून निर्जनस्थळी नेण्यात आले. तेथे तिला दारू पाजण्यात आली. त्यानंतर आरोपींनी तिच्यावर अत्याचार केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दरम्यान, मुलगी बेपत्ता झाल्यानंतर आईने शोध घेण्यास सुरूवात केली. तिने शेजाऱ्यांकडे चौकशी केली. तेव्हा बालिकेला दुचाकीवरून दोघेजण घेऊन गेल्याची माहिती मिळाली. आईने पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानंतर मध्यरात्री बालिकेला घराजवळ सोडून राठोड आणि साथीदार पसार झाले. बालिकेची अवस्था पाहून तिच्या आईने त्वरीत तिला ससून रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय तपासणीत मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचे तसेच तिला दारू पाजण्यात आल्याचे उघडकीस आले.
बालिकेने खाणाखुणांनी तिच्यावर झालेल्या अत्याचाराची माहिती दिली. पोलिसांनी अपहरण तसेच लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथके तयार केली आहेत. पोलीस उपनिरीक्षक साठे तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Abduction torture deaf and dumb girl search accused continues pune print news amy