लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

SSC राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार तयार करण्यात आलेल्या राज्य अभ्यासक्रम आराखड्यात दहावीच्या परीक्षेसंदर्भात ( SSC ) महत्त्वाचा बदल प्रस्तावित करण्यात आला आहे. त्यानुसार गणित आणि विज्ञान या विषयात ३५ गुणांपेक्षा कमी आणि २० गुणांपेक्षा अधिक गुण असल्यास अकरावीला प्रवेश घेता येणार आहे.

सुकाणू समितीने कुठल्या आराखड्याला दिली मंजुरी?

राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) तयार केलेल्या राज्य अभ्यासक्रम आराखड्याच्या मसुद्याला राज्य शासनाने नियुक्त केलेल्या सुकाणू समितीने अंतिम मान्यता दिली आहे. हा आराखडा राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे. राज्य मंडळातर्फे दहावीची परीक्षा ( SSC ) घेण्यात येते. प्रचलित पद्धतीनुसार दहावीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होण्यासाठी सर्व विषयांत किमान ३५ गुण मिळवावे लागतात. मात्र अनेकांना गणित, विज्ञान विषयांची भीती वाटते. त्या दडपणाखाली अनेक विद्यार्थी अनुत्तीर्ण होतात. त्यांना सत्र कायम ठेवण्याची मुभा (एटीकेटी) असल्याने अकरावीला प्रवेश मिळतो. पण, पुरवणी परीक्षा देऊन अनुत्तीर्ण विषयांत उत्तीर्ण व्हावे लागते.

गणित आणि विज्ञानात ३५ पेक्षा कमी गुण मिळाले तरी काळजी नाही

आता राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार होणाऱ्या बदलानुसार दहावीच्या परीक्षेत ( SSC ) विद्यार्थ्याने गणित आणि विज्ञान या विषयांत ३५ पेक्षा कमी आणि २०पेक्षा जास्त गुण मिळवल्यास त्या विद्यार्थ्याला अकरावीला प्रवेश दिला जाणार आहे. मात्र, पुढील शिक्षणात गणित किंवा विज्ञान किंवा दोन्ही विषयांवर आधारित विषय घेता येणार नाहीत असा शेरा गुणपत्रिकेवर नमूद केला जाईल. तसेच गणित, विज्ञान या विषयांतील अभ्यासक्रम घ्यायचे असल्यास विद्यार्थ्याला पुरवणी परीक्षेत त्या विषयांत उत्तीर्ण ( SSC ) व्हावे लागणार आहे.

हे पण वाचा- विश्लेषण : राज्य शालेय शिक्षण मंडळाला ‘सीबीएसई’चाच अभ्यासक्रम का राबवायचाय? त्यावरून वाद का सुरू आहे?

माजी मुख्याध्यापक महेंद्र गणपुले काय म्हणाले?

या बदलाबाबत माजी मुख्याध्यापक महेंद्र गणपुले म्हणाले, की दहावीला अनुत्तीर्ण झाल्याने शिक्षण सोडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे गणित आणि विज्ञान विषयांत तांत्रिकदृष्ट्या अनुत्तीर्ण झाल्यास गणित आणि विज्ञान विषयांशी संबंधित उच्च शिक्षण घ्यायचे नसलेल्या विद्यार्थ्यांना त्यांचे पुढील शिक्षण सुरू ठेवता येऊन उच्च शिक्षण घेता येऊ शकेल. मात्र, गणित आणि विज्ञानाशी संबंधित विषयांत उच्च शिक्षण घ्यायचे असल्यास त्या विषयांसाठी पुनर्परीक्षा देऊन उत्तीर्ण व्हावे लागणार आहे. सध्याही ही पद्धती वापरली जाते आहे.

पुस्तकासहित परीक्षा

राज्य मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे विद्यार्थ्यांवरील दडपण कमी केले पाहिजे. त्या दृष्टीने भविष्यात पुस्तकासहित, वस्तुनिष्ठ स्वरुपाचे प्रश्न, ओएमआर शीटद्वारे परीक्षा घेण्याचा विचार भविष्यात करता येईल. विषय, परीक्षेच्या स्वरुपाप्रमाणे लॉग टेबल, योग्य स्वरुपाचे गणकयंत्र वापरण्यास परवानगी देण्याचा विचार करावा. मात्र, या मुळे विद्यार्थ्यांच्या गणितीय कौशल्यांशी तडतोड होणार नाही याची काळजी घ्यावी, असेही नमूद करण्यात आले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Class 10 exams are easier now despite scoring less than 35 marks in mathematics and science what are the new changes pune print news ccp 14 scj