गुरूच्या घरी राहून गायकीला पैलू पाडण्याचे दिवस आता निघून गेले आहेत. युवा पिढीला सोपे पर्याय उपलब्ध झाल्यामुळे संगीतातील गुरू-शिष्य परंपरेचा लोप पावत असल्याची खंत आग्रा घराण्याचे ज्येष्ठ गायक पं. बबनराव हळदणकर यांनी शनिवारी व्यक्त केली. अभिजात संगीतातील घराणेशाही नष्ट होत असून हा ठेवा जतन करण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी सांगितले.
दिलीपराज प्रकाशनतर्फे डॉ. सुधा पटवर्धन लिखित ‘स्मरण संगीत’ या पुस्तकाचे प्रकाशन पं. हळदणकर यांच्या हस्ते झाले. ज्येष्ठ सतारवादक उस्ताद उस्मान खाँ, संगीत रंगभूमीवरील गायिका-अभिनेत्री निर्मला गोगटे आणि व्हायोलिनवादक उस्ताद फय्याज हुसेन खाँ या प्रसंगी उपस्थित होते.
पं. हळदणकर म्हणाले, युवा पिढीला झटपट मोठे होण्याची घाई झाली आहे. त्यामुळे यशासाठी थांबण्याची सवड त्यांच्याकडे नाही. अभिजात संगीताचे जतन करण्याच्या दृष्टीने ही बाब योग्य नाही. संगीतातील सौंदर्यविषयक मूल्ये जपली पाहिजेत.
उस्ताद उस्मान खाँ म्हणाले, ज्ञान आणि अभिव्यक्ती या माध्यमातून गुरू हे आपल्या शिष्याला घडवितात. त्यामुळे संगीतातील ही पंरपरा जपली पाहिजे.
संगीताचे स्वरूप बदलले असले, तरी नवी पिढी नव्या विचारांनी काम करीत असल्याचे मत फय्याज हुसेन खाँ यांनी व्यक्त केले. उत्तरार्धात अपर्णा गुरव यांचे गायन झाले. त्यांना उमेश पुरोहित यांनी हार्मोनियमची आणि मििलद गुरव यांनी तबल्याची साथसंगत केली. मंगेश वाघमारे यांनी सूत्रसंचालन केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Smaran sangeet book published by pandit haldankar