राजेश बोबडे समाजातील संत सेवकांच्या धुडगुसाबद्दल राष्ट्रसंत तुकडोजी महाराज उदाहरण देऊन म्हणतात, ‘‘एखादा साधाभोळा माणूस तरी बिचारा सरळ राहील, पण हे बुवांच्या जवळचे लोक म्हणजे तीक्ष्ण काटेरी सुळेच! तेथे कोणी गेला तर त्यांच्यात सद्गुणाऐवजी दुरभिमानच दिसण्याची शक्यता अधिक. ‘आम्ही अमक्या महाराजांबरोबर असतो. तुम्ही काय समजता आम्हाला?’ अशी वृत्ती दिसते. अरे होय बाबा! रामाला सेतू बांधावयाचा होता म्हणून त्याने समुद्रातील गोटेही वर घेतले होते, पण कार्य झाल्यावर ते तसेच राहिलेत ना, गोटेच्या गोटेच, की झाले सर्वच देव? देव फक्त मारुतीच झाला! त्याने आपल्या रामाचे कार्य मरेपर्यंत केले आणि सर्वाच्या मनोमंदिरात तोच स्थापन झाला. त्याप्रमाणे साधूचे तेच सेवक प्रिय होतात, ज्यांनी संतांचा बोध आपल्या आचरणात आणला आणि आपल्याप्रमाणेच सद्भक्त म्हणवून घेणाऱ्या भोळय़ा लोकांना साधूंच्या तत्त्वज्ञानाचा फायदा करून दिला आहे. एवढेच नव्हे तर ते ज्या संतांजवळ राहिले त्यांचे ‘प्रेमळ खजिने’ झाले आहेत. एरवी, ते लोक कसे प्रिय होतील, ज्यांनी आपल्या व्यसनपूर्तीकरिताच साधूंचा आश्रय घेतला असेल?’’ महाराज म्हणतात, ‘‘मी काही बुवांजवळचे सेवक तर असे पाहिले आहेत की ज्यांनी भोळय़ा जनतेला ठगवून एक रुपयाच्या चार अत्तराच्या बाटल्यांवर दोन दोन हजार रुपये कमाविले आहेत. ते बुवाचे सेवक म्हणून गाजलेही आहेत व एक नंबरचे व्यापारी म्हणून दलालही ठरले आहेत. अशा लोकांवर गीता काय परिणाम करू शकेल? काही म्हणतात, ‘तुम्हाला काय कळतं यात? तुमची फिकीर करणारे आम्ही आहोत ना!’ मी म्हणतो, ‘काय हो ही फिकीरजिकीर! माणसाला अति खाण्याची सवय लावते, ऐषआरामात पाडते, आळशी बनविते. ज्या फिकिरीमुळे आमच्या जन्माची फिकीर मिटत नाही, काय करिता त्या तुमच्या फिकिरीला? मला नको असली फिकीर की जी माझ्या मताचा नाश करते.’ असे नेहमी बडबडणे सुरू असल्यावरही त्यांचे चवताळलेले स्वभाव सौम्य होत नाहीत. अशीच कटकट त्याही लोकांच्या मागे किती होत असेल, जे लोक भोळेभक्त असतील व ज्यांना भक्तीमुळे जग उदास वाटत असेल? त्यांचा हे लोक फार गैरफायदा घेतात.’’ महाराज आपल्या ‘लहर की बरखे’मध्ये लिहितात- साधुहि बनना चाहता, तो साधना ऐसी पकर। अध्यस्त को कर बाद, अपने ईश को पहिचान कर।। rajesh772@gmail.com