सिद्धार्थ केळकर

जानेवारी २०२४ पासून एप्रिलच्या मध्यापर्यंत म्हणजे गेल्या साडेतीन महिन्यांत अमेरिकेत गेलेले ११ भारतीय विद्यार्थी विविध घटनांत मृत्युमुखी पडले. अगदी नुकतीच गेल्या शुक्रवारीदेखील कॅनडामध्ये एका भारतीय तरुणाची हत्या झाली. एखाद-दुसरा अपवाद वगळता इतर सर्व मृत्यूंचे कारण अजून अस्पष्ट आहे..

परदेशात आणि त्यातूनही अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी जाण्याची ओढ भारतीय विद्यार्थ्यांमध्ये सर्वाधिक आहे. २०२२-२३ मध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांची आकडेवारी ही या विधानाची निदर्शकच समजायला हवी. या वर्षांत तब्बल २ लाख ६८ हजार ९२३ भारतीय विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणासाठी अमेरिका गाठली. याच्या आदल्या शैक्षणिक वर्षांशी तुलना करता, ही वाढ ३५ टक्के इतकी होती. अमेरिकेत शिक्षणासाठी जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांची ही आतापर्यंतची सर्वाधिक संख्या आहे, असे ‘ओपन डोअर्स’ संस्थेचा अहवाल सांगतो. २०२२-२३ मध्ये अमेरिकेत आलेल्या १० लाख आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांपैकी अडीच लाखांहून अधिक म्हणजे २५ टक्के विद्यार्थी हे भारतीय आहेत, असेही ही आकडेवारी सांगते. आकडेवारीचे हे सगळे पुराण सांगण्याचे कारण असे, की या संख्यावाढीला येत्या शैक्षणिक वर्षांत लगाम लागतो की काय, असा प्रश्न पडावा अशी स्थिती अमेरिकेत आहे. जागतिक अर्थव्यवस्थेची मंदावलेली गती आणि परिणामी अमेरिकेत पदव्युत्तर शिक्षण घेऊनही बेरोजगार राहणाऱ्यांची वाढलेली संख्या हे त्याचे एक कारण. दुसरे कारण अमेरिकेतील भारतीय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसंबंधी आहे आणि ते अधिक गंभीर आहे. पुन्हा आकडेवारीच्या भाषेत बोलायचे, तर १ जानेवारी २०२४ पासून एप्रिलच्या मध्यापर्यंत म्हणजे साडेतीन महिन्यांत ११ भारतीय विद्यार्थी विविध घटनांत मृत्युमुखी पडले आहेत. अगदी एखाद-दुसरा अपवाद वगळता इतर सर्व मृत्यूंचे कारण अजून अस्पष्ट आहे. अशा प्रकारचे हल्ले वाढले असून, त्यातील काहींची नोंदच न झाल्याची शंका आहे. विद्यार्थी समुदायामध्ये भीतीचे आणि साशंकतेचे वातावरण असल्याच्याही बातम्या आहेत. या सगळया पार्श्वभूमीवर, अमेरिकेत नेमके काय घडते आहे, हा प्रश्न यंदा किंवा पुढच्या वर्षी अमेरिकेत जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना सतावतो आहे.

हेही वाचा >>> लेख : राज्यांच्या कर्जमर्यादेला केंद्राचा चाप?

ही सगळी चर्चा घडण्यासाठी कारणीभूत ठरलेल्या घटना नेमक्या काय होत्या, याचा आढावा घेतला, तर या सगळया प्रकाराचे गांभीर्य आणखी नेमकेपणाने समोर येईल. आतापर्यंत झालेल्या घटनांतील अकराही विद्यार्थी पंचविशीच्या आतील आहेत. यात दोघांचा मृत्यू सुरक्षा उपायांची माहिती नसल्याने झाल्याचे समोर आले आहे, पण इतर मृत्यूंबाबत साशंकता आहे. अमेरिकेतील भारतीय विद्यार्थ्यांचे बहुतांश मृत्यू हे ओहियो, इलिनॉइस आणि इंडियाना या मध्य-पश्चिमेकडील राज्यांत घडले आहेत, हा या मृत्यूंमधील आणखी एक समान धागा आहे. त्यातील अगदी नुकतीच घडलेली घटना आहे महंमद अब्दुल अरफाह या २५ वर्षीय विद्यार्थ्यांच्या मृत्यूविषयीची. महंमदचा मृतदेह ओहियो राज्यातील क्लीव्हलँड येथे सापडला. तो क्लीव्हलँड राज्य विद्यापीठात पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी आला होता. त्याचा मृतदेह हाती लागल्यावर अशी माहिती समोर आली, की महंमद तीन आठवडय़ांपासून गायब होता. त्याच्या पालकांच्या म्हणण्यानुसार, त्याचे अपहरण झाले होते. अपहरण करणाऱ्यांनी पालकांकडे खंडणी मागितली होती. ती न दिल्यास महंमदची मूत्रिपडे काढून ती विकू, अशी धमकीही दिली होती. पालकांनी पोलिसांकडे तक्रार केली, पण महंमदचा ठावठिकाणा लागला नाही आणि त्याचा मृतदेहच हाती लागला.

बोस्टन विद्यापीठातील २० वर्षीय परुचुरी अभिजितचा मृतदेह विद्यापीठातील दाट झाडीत एका मोटारीत आढळला. त्याला अज्ञात व्यक्तींनी मारले असावे, असा प्राथमिक अंदाज. त्याच्याजवळील पैसे आणि लॅपटॉप गायब असल्याचे तपासात समोर आले. संगणकशास्त्र विषयात पदव्युत्तर अभ्यासक्रम करणाऱ्या २५ वर्षीय विवेक सैनीवर जॉर्जियात अमली पदार्थ सेवन करणाऱ्या एका बेघर व्यक्तीकडून हल्ला झाला. त्याची हत्या अतिशय क्रूरतेने झाली. त्याच्यावर हातोडीने ५० वार करण्यात आले होते. पडर्य़ू विद्यापीठात शिकणारा नील आचार्य विद्यापीठातून अचानक गायब झाला. तो बेपत्ता असल्याची तक्रारही त्याच्या आईने केली होती. मात्र, काही दिवसांनंतर त्याचा मृतदेहच हाती लागला. त्याच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही, कारण तपास संस्थांनी ते अद्याप जाहीरच केलेले नाही. इलिनॉइसचा अकुल धवन केवळ १९ वर्षांचा होता. तो त्याच्या वसतिगृहात मृतावस्थेत सापडला. त्याच्याबाबत प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार, एका नाइट क्लबमध्ये प्रवेश नाकारल्यानंतर तो काही काळ गायब झाला आणि नंतर त्याचा थेट मृतदेहच सापडला. ओहियोतील िलडनर स्कूल ऑफ बिझनेसमध्ये शिकणारा श्रेयस रेड्डी बेनिगिरीही १९ वर्षांचा विद्यार्थी. तो वसतिगृहातील खोलीत मृतावस्थेत आढळला. त्याच्या मृत्यूचे कारण अजूनही अस्पष्ट आहे. पडर्य़ू विद्यापीठातील २५ वर्षीय समीर कामतचा मृतदेह एका राखीव वनात सापडला होता. त्याच्याही मृत्यूचे कारण अस्पष्ट आहे. अमरनाथ घोष हा वॉशिंग्टन विद्यापीठातील नृत्यकलेचा विद्यार्थी मिसिसिपीमध्ये माथेफिरूच्या गोळीला बळी पडला. घटनेनंतर त्याच्या मैत्रिणीने समाजमाध्यमाद्वारे पोलिसांना ही माहिती दिली. अमरनाथच्या हत्येच्या घटनेनंतर भारतीय विद्यार्थ्यांत भीतीचे वातावरण आहे, अशी पोस्टही अमरनाथच्या मैत्रिणीने एक्स मंचावर लिहिली होती. मार्चमध्ये ही घटना घडली होती. या सगळया प्रकरणांत एकच प्रकरण फारसे शंका घेण्याजोगे नाही. गट्टू दिनेश आणि निकेश हे दोन विद्यार्थी कनेटिकटमध्ये मृतावस्थेत आढळले होते. मात्र, त्यांचा मृत्यू कोणत्याही हल्ल्यामुळे नाही, तर वायुगळतीमुळे झाल्याचे अमेरिकेतील प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे. सुरक्षा उपायांबाबत नीट माहिती नसल्याने त्यांच्यावर हा प्रसंग गुदरला, असे तपास यंत्रणांचे म्हणणे.

वरील सर्व घटना तपशिलात सांगण्याचा हेतू हाच, की या घटनांत मृत्यूचे ठोस कारण पुढे आलेले नसल्याने अनेक प्रश्न उपस्थित होतात. अमेरिकेतील ‘ग्लोबल हिंदू हेरिटेज फाऊंडेशन’ या संस्थेच्या म्हणण्यानुसार, आशियाई व्यक्तींवर होणारे हल्ले, जाणूनबुजून भेदभाव, छळ आदी घटनांत गेल्या काही काळात सात पटींनी वाढ झाली आहे. अनेक घटनांची पोलिसांकडे नोंदच होत नसल्याने त्या घटना प्रकाशातच आलेल्या नाहीत. भर रस्त्यात अनेकांना वर्णद्वेषी टिप्पण्यांना सामोरे जावे लागते, असे अमेरिकेतील भारतीय समुदायाचे म्हणणे आहे. अमेरिकेतील उद्योजक आणि खासदार श्री ठाणेदार यांनी, तसेच हिंदू अमेरिकन फाऊंडेशनच्या सुहाग शुक्ला यांनीही भारतीय विद्यार्थ्यांच्या संशयास्पद मृत्यूंच्या मुद्दयाला विविध व्यासपीठांवर वाचा फोडली आहे. ‘फाऊंडेशन फॉर इंडिया अँड इंडियन डायास्पोरा स्टडीज’ने केलेल्या विश्लेषणात भारतीय विद्यार्थ्यांच्या मृत्यूमागे संशयास्पद वाटावा अशा पद्धतीने झालेला गोळीबार, अपहरण, मानसिक अस्वास्थ्यातून होणारे हल्ले, वर्णद्वेषी टिप्पण्यांमुळे होणाऱ्या आत्महत्या आदी महत्त्वाची कारणे समोर आली आहेत. भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी याबाबत नुकतीच टिप्पणी करताना, सरकारसाठी ही चिंतेची बाब असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी धोकादायक ठिकाणे टाळण्याचे आणि दूतावासाने विद्यार्थ्यांच्या संपर्कात राहण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. मात्र, विद्यार्थ्यांच्या मृत्यूच्या घटनांचा एकमेकांशी संबंध नाही, असेही ते म्हणाले आहेत.  

डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष असताना, ‘अमेरिका फर्स्ट’ ही मोहीम जोरात होती. इतर अनेक आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांप्रमाणेच शिकण्यासाठी येणारे भारतीय विद्यार्थी ‘अमेरिका फर्स्ट’ला पाठिंबा असलेल्यांच्या डोळय़ांत खुपत होतेच. हे विद्यार्थी शिकण्यासाठी अमेरिकेत येतात आणि अमेरिकनांच्या नोकऱ्या खातात, या मतप्रवाहाने जोर पकडला होता. त्यातूनही भारतीय विद्यार्थ्यांवर हल्ल्यांच्या अनेक घटना घडल्या होत्या. जसे ‘अमेरिकन ड्रीम’ पूर्ण करण्यासाठी उच्च शिक्षणाकरिता अमेरिकेत दाखल होणारे भारतीय विद्यार्थी आहेत, तसे रोजगारासाठी अवैध मार्गानी अमेरिकेत प्रवेश करणाऱ्यांची संख्याही कमी नाही. हा सगळा लोंढा आपल्या शिक्षणाच्या हक्कांवर, रोजगारांवर आणि संस्कृतीवर गदा आणतो आहे, अशी भावना ट्रम्प सरकारच्या काळात अमेरिकनांमध्ये निर्माण केली गेली होती. अमेरिकेत या वर्षी होऊ घातलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हाच मुद्दा पुन्हा ऐरणीवर आणला जातो आहे की काय, अशी शंका भारतीय विद्यार्थ्यांवरील हल्ल्यांमुळे उपस्थित होते.

‘वंश किंवा धर्माच्या नावाखाली एखाद्यावर हल्ला करणे अस्वीकारार्ह आहे,’ अशा शब्दांत अमेरिकेतील सध्याच्या जो बायडेन सरकारने फेब्रुवारी महिन्यात भारतीय विद्यार्थ्यांवरील हल्ल्यांचा निषेध केला होता. मात्र, त्यानंतरही भारतीय विद्यार्थ्यांवरील हल्ले आणि मृत्यूच्या घटना सुरूच राहिल्याने आणि मुख्य म्हणजे हल्ले व मृत्यूची ठोस कारणे समोर येत नसल्याने अमेरिकेतील भारतीय विद्यार्थ्यांमध्ये चिंता आहे. काही विद्यार्थी भीतीपोटी भारतात परतलेही आहेत. दर्जेदार उच्च शिक्षण, वैयक्तिक प्रगती आणि चांगल्या भविष्यासाठी अमेरिका गाठणाऱ्या विद्यार्थ्यांचे ‘अमेरिकन ड्रीम’ भंगते आहे. हे अमेरिकन दु:स्वप्न अमेरिकेत शिकू इच्छिणाऱ्यांना किती जागे करते, त्यावर या शैक्षणिक वर्षांतील अमेरिकेकडील ओढा ठरणार आहे. शिवाय हळूहळू निवडणूकज्वर चढू लागलेल्या अमेरिकेत हा मुद्दा कोण कसा उचलतो, ते पाहणेही औत्सुक्याचे ठरणार आहे!

siddharth.kelkar@expressindia. com