पानात चविष्ट खाद्यपदार्थ असतील तर दोन घास जास्त जातात. त्यामुळेच उदरभरण करताना जिभेचेही लाड केले जातात. खाण्याच्या बाबतीत आताची तरुण पिढी कमालीची चोखंदळ आहे. ती सातत्याने खाण्याचे नवनवे चविष्ट अड्डे शोधत असते. अतिशय भन्नाट चवीमुळे डोंबिवलीतील ‘दख्खन तडका’ या कॉर्नरभोवती सध्या तरुणांचा गराडा पडलेला दिसतो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

डोशांचे विविध प्रकार, पावभाजी, कोंबडी वडे आणि चिकन कॅफ्रेल येथे मिळते. नाव दाक्षिणात्य असले तरी महाराष्ट्रीय पदार्थाबरोबरच अस्सल गोवन पद्धतीचे पदार्थही येथे मिळतात. इथे छोटय़ा जागेत बसून खाण्याची सोय आहे, शिवाय पार्सलही घरी घेऊन जाता येते. हल्ली पारंपरिक डोशात विविध स्वाद मिसळून अनेक प्रकारचे नवे डोसे केले जातात. ‘दख्खन तडका’मध्ये असाच आपल्याला ‘चॉकलेट डोसा’ मिळतो. या डोशामध्ये चॉकलेट सॉस, चॉकलेट चिप्स आणि चीज घातले जाते. मित्रमैत्रिणी घोळक्याने येथे येतात. प्रत्येक जण वेगवेगळा डोसा मागवितात आणि मग शेअर करून खातात. त्यामुळे आपोआप सगळ्या डोशांची चव कळते आणि अधिक आवडलेल्याला वन्समोअरची दाद दिली जाते. ओपन फेस डोसा हा ताऱ्यांच्या आकाराचा असतो. तो गुंडाळलेला नसल्याने त्याला ‘ओपन फेस डोसा’ असे म्हटले जाते. त्यामध्ये कोबी, कांदा, टोमॅटो आदी जिन्नस घातले जातात. ‘दिलखुश’ डोसाही ताऱ्यांचा आकारचा असून त्यामध्ये चीज, शेजवान चटणी आदी जिन्नसांचा वापर केला जातो. शेजवान चटणीसोबत हा डोसा मस्तच लागतो. सध्या थंडीच्या दिवसांत गरम डोसा खाणे खवय्ये अधिक पसंत करत असल्याचे ‘दख्खन तडका’चे रोहित नाईक यांनी सांगितले. फक्त संध्याकाळीच डोसा मिळतो. दर दिवशी साधारण ८० ते ९० डोसे संपतात. ‘जिमी डोसा’मध्ये डोशाचे चार रोल्स असतात. खवय्यांना देताना ताटामध्ये चार रोल्स उभे केले जातात. मधोमध शेजवान चटणी, सांबार व खोबऱ्याची चटणी ठेवली जाते. येथे मॅगी चीज डोसाही मिळतो. अलू पालक डोसा हा चविष्ट आणि पौष्टिकही आहे. विशेष म्हणजे या सर्व डोशांसोबत दिली जाणारी चटणी खूप छान असते. चटणी रोजच्या रोज बनवली जात असल्याने ती ताजी असते. त्यामुळे खवय्यांना कोणताही त्रास होत नाही. अतिशय आकर्षक सजावटीमुळे हा खाऊअड्डा सेल्फी पॉइंट म्हणूनही लोकप्रिय आहे. खाण्याचा आस्वाद घेत मनसोक्त गप्पा मारण्याचा कट्टा असा या कॉर्नरचा लौकिक आहे. ड्रायफ्रुट डोसा खाताना शाही जेवणाची आठवण झाली नाही तरच नवल. त्यामध्ये काजू, बदाम, पिस्ता, अक्रोड असे ड्रायफ्रुट्स टाकले जातात. शिवाय चटणी आणि शेजवान सॉस टाकून हा डोसा तयार केला जातो. असे एकूण ३० प्रकारचे डोसे येथे खायला मिळतात.

येथे मिळणारी पावभाजीही अतिशय स्वादिष्ट असते. त्या भाजीचा गंध नाकात गेला की लगेच ऑर्डर करण्याचा मोह आवरता येत नाही. ‘चिकन कॅफ्रेल’ ही ‘दख्खन तडका’ची खास डिश आहे. कोथिंबीर, लसूण, आलं आदीची बारीक पेस्ट करून त्यात चिकन शिजविले जाते. त्यामुळे हिरवा अवतार धारण केलेले हे चिकन खवय्यांच्या जिव्हा तृप्त करते. याबरोबरच येथे कोंबडी वडेही मिळतात. या ठिकाणी गोवन पद्धतीचे जेवणही पार्सल स्वरूपात मिळते. त्यामुळे घरी जाऊन आरामात बसून जेवण्याची मजाही घेता येते. भरलेले पापलेट बनवितानाच तो गंध नाकात शिरतो आणि तोंडाला पाणी सुटते. पुन्हा हे पापलेट अतिशय सजवून दिले जाते. त्यामुळे खवय्ये या डिशच्या प्रेमातच पडतात. रोहित नाईक, गौरव देशमुख, केवल पावनी, मिलिंद पाठक आणि नितीन कुलकर्णी या मित्रांनी एकत्र येऊन ‘दख्खन तडका’ सुरू केले आहे. डोंबिवलीत मांसाहारी पदार्थ मिळणारी जी मोजकी चांगली ठिकाणे आहेत, त्यात आता ‘दख्खन तडका’चा आवर्जून उल्लेख केला जातो. साधारणत: दीडशे ते तीनशे रुपयांपर्यंत डिश येथे मिळतात. आठवडय़ातील सर्व दिवस हे सुरू असते.

दख्खन तडका

  • कुठे- दख्खन तडका, शॉप नं-१०, हीना पॅलेस, एसव्हीसी बँकेसमोर, राजाजी पथ, डोंबिवली (पू.)
  • वेळ – सायंकाळी ५ ते रात्री ११
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dakkhan tadka dombivali