मागील काही दिवसांपासून आपल्यातील अनेकांना बँकेकडून मेसेज, फोन किंवा मेलही येत आहेत. ज्यांनी बँकेकडे आपल्या आधारकार्डची झेरॉक्स दिलेली नाही अशांनी ती त्वरीत जमा करावी असे यामध्ये सांगण्यात येत आहे. आर्थिक व्यवहार जास्तीत जास्त सुरक्षित व्हावेत यासाठी मोदी सरकारने काही कठोर पाऊले उचलली आहेत. हा त्याचाच एक भाग आहे. पैशांची अफरातफर विरोधी नियमांनुसार बँक खात्याशी आधार कार्ड लिंक करणं अनिवार्य असल्याचं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने स्पष्ट केलं आहे. नुकतेच काही माध्यमांकडून आरटीआयच्या आधारावर बँक खात्याशी आधार लिंक करणं अनिवार्य नसल्याचं वृत्त देण्यात आलं होतं. मात्र यावर आता आरबीआयने स्पष्टीकरण दिलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आधार कार्ड बँकेशी लिंक न केल्यास काय होईल?

बँक खात्याशी आधार कार्ड लिंक करण्यासाठी सरकारने ३१ डिसेंबरपर्यंतची मुदत दिली आहे. यापूर्वी तुम्ही आधार कार्ड लिंक न केल्यास खातं बंद होईल. खातं बंद झाल्यानंतर तुम्ही आधार कार्ड लिंक केलं तरच तुमचं बँक खातं पुन्हा चालू होऊ शकेल, असं अर्थ मंत्रालयाने स्पष्ट केलं होतं. मात्र या सर्व प्रक्रियेसाठी किती वेळ जाईल, याबाबत नेमकी माहिती मात्र मंत्रालयाकडून देण्यात आलेली नाही.

आपलं आधार कार्ड बँकेशी लिंक झाल्याचे कसे तपासाल?

आधार कार्डाच्या http://www.uidai.gov.in या वेबसाईटवर तुम्हाला बँकिंग स्टेटस चेक करण्याचा पर्याय देण्यात आला आहे. या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमचा आधार क्रमांक आणि सिक्युरिटी कोड टाका. हे सबमिट केल्यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर ओटीपी येईल. ओटीपी टाकून लॉग इन केल्यानंतर तुम्हाला लिंकिंग स्टेटस दिसेल. याशिवाय नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरुनही तुम्ही हे स्टेटस पाहू शकता. यासाठी *99*99*1# हा क्रमांक डायल आधार क्रमांक टाकावा लागेल. आधार क्रमांक टाकल्यानंतर तो अचूक आहे का, याची खात्री करण्यासाठी ‘कन्फर्म’ हा पर्याय निवडावा लागेल. तुमचा आधार नंबर लिंक केलेला असेल तर स्टेटस दाखवलं जाईल. आपली अनेक बँक खाती असल्याने एकाच आधार नंबरशी लिंक केलेली अनेक खाती असू शकतात. मात्र तुम्ही शेवटचं लिंक केलेलं खातं यामध्ये तुम्हाला दिसेल. तुम्हाला तुमच्या सर्व खात्यांची माहिती पाहिजे असेल, तर मात्र त्या बँकेत जावं लागेल.

दरम्यान आधार कार्ड लिंक न केल्यास तुमची सर्व खाती बंद होणार नाहीत. तर काही खाती सुरु राहतील आता ती नेमकी कोणती त्याबाबत मात्र नेमकी माहिती देण्यात आलेली नाही. बँक खात्याशी आधार कार्ड लिंक कऱण्याची प्रक्रिया अतिशय सोपी आहे. ही प्रक्रिया बँकेच्या एटीएममध्ये जाऊनही करता येऊ शकते. त्याशिवाय बँकेत जाऊनही हे काम सहज करता येण्यासारखे आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What happen if your aadhar card is not linked with bank account