रंग संवेदना

महाराष्ट्राला अतिशय प्रगत अशी वस्त्र परंपरा आहे. शेकडो वर्षांच्या या परंपरेमुळे महाराष्ट्रात वस्त्रांसंबंधी प्रथा, काव्य, समजुती अशा अनेक गोष्टी विकसित झाल्या आहेत.

वस्त्रान्वेषी : विनय नारकर

रात्र काळी, घागर काळी,

जमुनाजळें ही काळीं वो माय॥

बुंथ काळी, बिलवर काळी,

गळां मोती एकावळी काळि वो माय ॥

मी काळी, कांचोळी काळी,

कांस कासिली ते काळि वो माय ॥

ऐकली पाणिया नवजाय साजणी

सवें पाठवा मुर्ति सांवळी वो माय ॥

विष्णुदास नाम्याची स्वामीणी काळी,

कृष्णमूर्ति बहु काळी वो माय ॥

– संत नामदेव

महाराष्ट्राला अतिशय प्रगत अशी वस्त्र परंपरा आहे. शेकडो वर्षांच्या या परंपरेमुळे महाराष्ट्रात वस्त्रांसंबंधी प्रथा, काव्य, समजुती अशा अनेक गोष्टी विकसित झाल्या आहेत. या मराठी वस्त्र परंपरांचं एक विश्वच निर्माण होत गेलं आहे. या गोष्टींमधूनच महाराष्ट्राची अतिशय समृद्ध, विविधरंगी, विविधढंगी वस्त्र संस्कृती तयार होत गेली आहे.

या वस्त्रसंस्कृतीचे अनेकविध पैलू आहेत. या पैलूंचा अभ्यास आपण या लेखमालेतून करत असतो. आपल्या या वस्त्रसंस्कृतीचे एक महत्त्वाचे दालन आहे. हे अद्भुत दालन मराठी वस्त्र परंपरा आणि मराठी माणसाचं सौंदर्यशास्त्र उलगडण्याला मदत करणारं आहे. हे दालन आहे, मराठी वस्त्र परंपरेतील रंग संवेदनांचं. पण मराठी वस्त्र परंपरेची स्वतंत्र अशी रंग संवेदना आहे का? असेल तर ती कोणत्या घटकांनी व कारणांनी घडत गेली आहे, हे पाहणं महत्त्वाचं आहे.

एखादा भौगोलिक प्रदेश जर आपण रंगांच्या अनुषंगाने विचारात घेतला, तर आपल्याला काही रंग आठवतात. बंगाल म्हणलं की शुभ्र, राजस्थान किंवा गुजरात म्हणलं की लाल, केशरी असे उजळ रंग, काश्मीर म्हणलं की फुलांसारखे रंगीबेरंगी, तसंच पंजाब म्हणलं की धम्मक पिवळा.. त्या त्या प्रदेशाची ही एक प्रकारे रंगओळख आहे. ही रंगओळख बनण्यामागे इथला निसर्ग हे महत्त्वाचे कारण आहे. त्या त्या प्रदेशाची रंगओळख ही तिथल्या वस्त्राच्या रंगात प्रतिबिंबित झालेली किंवा उमटलेली दिसते. त्यामुळे एखाद्या प्रदेशाची रंगसंवेदना जाणून घेण्यासाठी तिथल्या वस्त्रांच्या रंगांचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो. अशा प्रकारे विचार करता, साहजिकपणे विचार येतो की महाराष्ट्राची रंगसंवेदना काय असेल? इथल्या वस्त्रांची रंगांच्या अनुषंगाने काही ओळख आहे का.. हे प्रश्न महत्त्वाचे ठरतात.

महाराष्ट्राची रंगओळख काय असेल, याविषयी विदुषी दुर्गा भागवत यांनी एका मुलाखतीत खूप सुंदर विवेचन केले आहे. त्या म्हणतात, ‘प्रत्येक प्रांताच्या रंग वैशिष्टयामध्ये निसर्गाशिवाय कशाचाच संबंध नाही. कारण निसर्गाचे जे रंग काळा, सूर्याचा प्रकाश म्हणून पांढरा, निळा हे रंग शतकानुशतकं, सहस्त्रावधी वर्षे मानवानं पाहिलेले आहेत आणि त्याच्या मेंदूने आत्मसात केलेले आहेत. ज्या प्रदेशात मानव राहतो, त्या प्रदेशाची नैसर्गिक स्थिती, त्याच्या रंग संवेदनेला कारण असते. त्या पुढे म्हणतात, महाराष्ट्रात काळ्या रंगाचं आकर्षण आहे. महाराष्ट्रात विठोबा काळा म्हणून त्याचं किती कौतुक आहे. आमचे डोंगर काळे दिसतात. त्याच्यात हिरवा रंग चार महिने दिसला तर दिसला नाहीतर काळं आणि काटेरी हे इथल्या निसर्गाचं स्वरूप आहे. काळ्या विठ्ठलाला आपण ‘राजस सुकुमार मदनाचा पुतळा’ किंवा ‘तो सावळा सुंदरू..’, असे म्हणून कौतुक करतो.

लोकसाहित्यातही हे कौतुक दिसून येते, एका ओवीत म्हटलंय, ‘सावळ्या सुरतीचं लागून गेलं वेड..’.

स्त्रियांच्या सौंदर्यालाही वेगळे निकष होते असे नाही. अजिंठय़ाच्या चित्रांमधून याची प्रचीती येते. अजिंठय़ाच्या चित्रांमध्ये सर्वात सुंदर ज्या स्त्रिया चितारल्या गेल्या आहेत, त्यामध्ये श्यामल सुंदरी जास्त आहेत. तिथे ‘राजाचे स्नान’ या चित्रात एक सांवळ सुंदरी आपले लक्ष वेधून घेते. तसेच, पद्मपाणीची पत्नी, बोधीशक्ती तारा हिचे चित्र. कृष्णसुंदरी म्हणून ओळखले जाणारे हे चित्र अभिजात भारतीय स्त्री – सौंदर्याचा उत्कृष्ट नमुना समजला जातो. त्याशिवाय, आणखी एक महत्त्वाचे चित्र म्हणजे गव्हाळ सावळ्या वर्णाच्या राजकन्या किन्नरीचे. अजिंठा चित्रांच्या अभ्यासिका डॉ. राधिका टिपरे आपल्या ‘अजिंठा’ या ग्रंथात म्हणतात, अजिंठय़ाच्या कलावंतांनी काळ्या आणि सावळ्या रंगातील स्त्रियांचे सौंदर्य आपल्या कलाविष्काराने अंकित केले आहे.

बंगालमध्ये तळी खूप आहेत. गंगेचे फाटे खूप आहेत. बंगालची भूमी सुजला म्हणजे पांढऱ्या रंगाची आहे, म्हणून तिथे पांढऱ्या रंगाचे महत्त्व आहे. तसेच मारवाडमध्ये आणि गुजरातमध्ये खूप ऊन असतं तिथे तांबडा आणि पिवळा रंग जास्त आवडतो. हा रंगांबाबतचा कल कधी कधी रंगाचं वेड बनून जातं. निसर्गामुळे रुजलेल्या या रंग संवेदना, वस्त्रांमध्ये शोषल्या जातात. निसर्गाशी एकरूप होण्याचाच हा एक प्रयत्न असतो. महाराष्ट्राला हे काळ्या रंगाचं जे आकर्षण आहे ते इथल्या वस्त्र संस्कृतीमध्ये प्रतिबिंबित झालं नसतं तरच नवल.. महाराष्ट्रातील स्त्रियांची अतिशय लाडकी असलेली साडी, जी सर्व प्रकारच्या लोकसाहित्यातून आपल्याला भेटते, ज्या साडीचा उल्लेख अगदी पैठणी किंवा पीतांबरापेक्षा जास्त सापडतो अशी मनभावन ‘काळी चंद्रकळा’. लोकसाहित्यामध्ये दोन रंगांच्या चंद्रकळांबद्दल लिहिले गेले आहे, काळी चंद्रकळा व तांबडी चंद्रकळा. लोकसाहित्याच्या गाढय़ा अभ्यासक व प्रसिद्ध लेखिका सरोजिनी बाबर म्हणतात, ‘तांबडय़ा चंद्रकळेपेक्षाही काळी चंद्रकळा रूढ आणि स्त्रियांची अधिक आवडती दिसते.’

काही ओव्यांमध्ये असे वर्णन येते,

काळी गं चंद्रकळा

जसा रंगाचा तुकडा   

घेणाऱ्याची दिष्ट काढा

काळी चंद्रकळा

जशी काजळाची वडी

त्याची आज घडी मोडी

उषाताई

काळ्या चंद्रकळेबद्दलच्या ओव्यांमधून काळ्या रंगाचे हे कौतुक असे ओसंडून वाहत असते. त्याही पुढे जाऊन काळा रंग शुभ मानला जातो, असेही सरोजिनी बाबर सांगतात.

संत एकनाथ आपल्या एका गौळणीमध्ये म्हणतात,

तिसरी गौळण रंग काळा

नेसून चंद्रकळा

काळें काजळ लेऊन डोळां

रंग तिचा सावळा

काळी गरसोळ लेऊन गळां

आली राजसबाळा

आपल्या मराठी दागिन्यांमध्येही ‘काळी गरसोळ’ हा दागिना लोकप्रिय होता. एका उखाण्यात म्हटलंय, ‘काळी गरसोळ गळां भरून, —— रावंना पहाते डोळां भरून’.

महाराष्ट्रातील स्त्रियांचं सौभाग्यलेणं एका ओवीतून आपल्याला समजतं, ‘काजळ कूंकू मंगळसूत्र, सौभाग्याचं लेणं’. यातली दोन प्रतीकं रंगानं काळी आहेत. चंद्रकळेशिवाय अन्य वस्त्रांतही काळ्या रंगाची निवड दिसून येते. सरोजिनी बाबर असेही सांगतात की, बाळंतिणीला बाळंतविडा देताना काळा खण निवडण्याची प्रथा आहे. महाराष्ट्रात बऱ्याच प्रकारच्या साडय़ा विणल्या जायच्या, साडय़ांचे बरेच वाण प्रचलित होते. काही वाणांचे तर अगदी तेराव्या शतकांपासून उल्लेख सापडतात. यापैकी बरेच वाण असे होते की ज्यामध्ये रास्ता, म्हणजे आडव्या रेघा किंवा चौकडा असायचा. अशा वाणांपैकी बऱ्याच वाण्यांमध्ये काळ्या रंगाचे धागे हे त्या वाणांचे अविभाज्य अंग होते. जुन्या वस्तूंच्या संग्राहकांकडे, संग्रहालयांमध्ये जुन्यात जुन्या ज्या सुती पैठण्या व पैठणी शेले सापडतात, त्यात बव्हंशी काळ्या रंगातच असतात.

एका लोकगीतात असा उल्लेख येतो,

काळा कासोटा भुई लोळतो

जेजुरीचा खंडोबा फुगडी खेळतो

महाराष्ट्रातील बहुजन समाजाचे बहुपयोगी वस्त्र, घोंगडी हे काळेच असते. या घोंगडीचा किंवा चवाळ्याचा उपयोग पुजा मांडण्यासाठी सुद्धा होतो, म्हणजे धार्मिक रिवाजांमध्येही काळा रंग वज्र्य नाही. आपल्याकडे ‘कासई’ नावाची एक प्रकारची साडी होती. ती काळ्या रंगाचीच असायची. लग्नविधीमध्ये सीमांतपूजन नावाचा महत्त्वाचा विधी असतो. त्यावेळी द्यावयाच्या मानाच्या वस्त्रांत कासई या काळ्या रंगाच्या साडीचा समावेश होत असे.

सध्या वस्त्र रंगवण्यासाठी बहुतेक करून रासायनिक रंगांचा वापर होतो. हे रासायनिक रंग बनू लागण्याआधी वस्त्रांचे रंग बनवणेही अतिशय कष्टाचे काम असायचे. आता ते मनोरंजक वाटू शकते. त्यापैकी काळा रंग बनवणे हे खूप वेळ खाऊ काम होते. हा काळा रंग बनवण्यासाठी काजळी लागत असे. ही काजळी मिळवण्यासाठी एरंडेल तेलाच्या दिव्यावर विशिष्ट वस्तू धरून त्यात काजळी जमा केली जात असे. हा रंग अतिशय टिकाऊ असे. हा काजळीपासून मिळालेला काळा रंग काळी वस्त्रे बनवण्याशिवाय इतर रंगात मिसळून अन्य रंगांच्या गडद छटा बनवण्यासाठीही कामी येत असे. संत ज्ञानदेवांनी त्यांच्या एका रचनेत विठ्ठलाचा ‘काळ्या’ असा उल्लेख केला आहे. तिथे आपण काळा रंगच अभिप्रेत ठेवून ही रचना वाचू या..

प्रेम भक्ती अनुसरलें वो काळ्या रूपासी ।

ठायींचाची काळा अनादी बहु काळा ॥

viva@expressindia.com

पूजेसाठी निघालेली काळ्या पैठणीतील स्त्री

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व व्हिवा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Cloths culture maharashtra colorful cloths ssh

फोटो गॅलरी