मन:स्पंदने : प्राउड टू बी क्वीअर

लहानपणापासूनच सौम्याला भातुकलीव्यतिरिक्त ट्रकशी खेळणं, मेकॅनिक किटचा वापर करून वेगवेगळय़ा गोष्टी बनवणं, निरनिराळे कपडे घालून आणि हेअरकट बदलून पाहाणं, साहसी खेळात भाग घेणं अशा अनेक गोष्टी आवडायच्या.

मृण्मयी पाथरे

लहानपणापासूनच सौम्याला भातुकलीव्यतिरिक्त ट्रकशी खेळणं, मेकॅनिक किटचा वापर करून वेगवेगळय़ा गोष्टी बनवणं, निरनिराळे कपडे घालून आणि हेअरकट बदलून पाहाणं, साहसी खेळात भाग घेणं अशा अनेक गोष्टी आवडायच्या. मुलांनी आणि मुलींनी कसं बोलावं, वागावं आणि जगावं अशा समाजाने ठरवून दिलेल्या कित्येक अलिखित अपेक्षांचं तिला नेहमीच आश्चर्य, किंबहूना ओझं वाटत आलं होतं. या काटेकोर अपेक्षांच्या नियमावलीत तिला अजिबात अडकून राहायचं नव्हतं. पुढे कॉलेजमध्ये गेल्यावर तिला एका लेक्चरमध्ये क्वीअर कम्युनिटी (queer community) आणि नॉन-बायनरी आयडेंटिटीबद्दल (non- binary identity) कळलं. स्त्री-पुरुष या दुहेरी जगाच्या पलीकडे खूप मोठं जग आहे आणि आपली आतापर्यंतची जडणघडण आणि अनुभव हे आपण या दुहेरी चष्म्यातून पाहात आलो आहोत, याची तिला जाणीव झाली. तिने यापूर्वीही एक स्त्री म्हणून स्वत:कडे कधी पाहिलंच नव्हतं. याचा अर्थ तिला पुरुषत्व आपलंसं वाटत होतं असंही नाही. सौम्याला स्त्री आणि पुरुष या मर्यादित जेंडर आयडेंटिटीमध्ये (gender identity) न अडकता स्वत:चं वेगळं अस्तित्व निर्माण करायचं होतं. पण तिच्या आईबाबांना आणि इतर लोकांना सौम्या स्वत:ला स्त्री मानत नाही, हा धक्काच पचत नव्हता.

सध्या इंजिनीअर असणारा सौमित्र लहान असल्यापासूनच त्याच्या आजूबाजूच्या स्त्रिया कशा वावरतात याचं कायम निरीक्षण करायचा. कधीकधी त्याच्या मोठय़ा बहिणी त्याला आवडतं म्हणून त्यांची ओढणी साडीसारखी नेसवायच्या. एकदा घरात कोणीच नसताना सौमित्रने कुतूहल म्हणून मेकअपचं सामान वापरायला घेतलं आणि स्त्रियांच्या अंतर्वस्त्रांसकट सलवार कमीज घालून पाहिली. आरशात स्वत:ला न्याहाळताना आपलं रूप पाहून सौमित्र भलताच खूश झाला. आपला जन्म भले पुरुषाच्या शरीरात (gender assigned at birth) झाला असला तरी आपल्याला स्त्री (felt gender) म्हणून जगायला आवडेल, हा विचारच त्याला रोमांचित आणि आनंदित करून गेला. पण सौमित्रचा सुमित्रापर्यंतचा प्रवास हा घरच्यांना सहजासहजी समजणारा आणि पटणारा नव्हता. आपल्या मुलाला कोणीतरी नजर लावली किंवा हे सगळं ‘अबनॉर्मल’ आहे, असं त्यांना वाटायचं. घरच्यांनी सुमित्राला एका खोलीत कोंडून ठेवलं, मित्रमंडळींशी संपर्क तोडला, तांत्रिकाकडे नेलं, अनेक मंदिरं पालथी घातली आणि शेवटी मानसोपचारतज्ज्ञांकडेही घेऊन गेले. पण सुमित्राचं अस्तित्व हे नैसर्गिक आहे, असं मानसोपचारतज्ज्ञांनी सांगितल्यावर कुटुंबातील मंडळींनी सुमित्राला बदलण्याचे प्रयत्न करणं अखेरीस थकून सोडून दिले.

सौम्या आणि सुमित्रा यांचा त्यांची स्वत:ची खरी ओळख शोधण्याचा प्रवास आपल्यापैकी कित्येकांना कदाचित रीलेटेबल (relatable) वाटणार नाही, कारण आपण आपलं जग जन्मापासूनच मर्यादित दृष्टिकोनातून पाहात आलो आहोत. आपला जन्म झाल्यावर लगेचच आपण स्त्री आहोत की पुरुष आहोत, याचं वर्गीकरण आपल्या प्रजनन संस्थेवरून (उदाहरणार्थ, योनी –  vagina, गर्भाशय –  uterus, शिश्न –  penis यावरून) केलं जातं. यालाच जेंडर असाइन्ड अ‍ॅट बर्थ (gender assigned at birth) असं म्हटलं जातं. काही वेळेस एखाद्या व्यक्तीची प्रजनन संस्था स्त्री आणि पुरुष यांच्या प्रजनन संस्थेचं मिश्रण असेल तर त्यांना इंटरसेक्स (intersex) असं म्हटलं जातं. एकदा हे वर्गीकरण झालं, की मुलं मोठी होताना त्यांचे कपडे, कपडय़ांचे किंवा इतर वस्तूंचे विशिष्ट रंग, खेळण्यांचे प्रकार, गोष्टींची पुस्तकं, मैदानावरील खेळ, घरातील कामं, शाळा- कॉलेजमधील निवडलेले विषय यांतील फरक वाढत जातात. या दरम्यान ती लहान मुलं आयुष्य कसं जगत आहेत, याचा रिमोट अनेकदा त्यांच्या आजूबाजूच्या मोठय़ा माणसांकडे असतो. त्यामुळे प्रत्येकालाच त्यांची जेंडर आयडेंटिटी हवी तशी एक्सप्लोर करता येत नाही.

मुलांना हळूहळू समज येऊ लागली की मग मात्र त्यांचं त्यांच्या जेंडरबद्दलचं कुतूहल वाढू लागतं आणि आपली या जगातील खरी ओळख काय हे समजण्यासाठी ते निरनिराळे कपडे घालणं, केशभूषा आणि मेकअप करणं असे अनेक लहानमोठे प्रयोग करून पाहातात. या प्रयोगांतूनच त्यांना स्वत:ची पुन्हा नव्याने ओळख होते. अशा वेळेस इतर लोक आपल्याकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहातात, यापेक्षा आपण आपले व्यक्तित्व कोणत्या दृष्टिकोनातून पाहातो, हे जास्त महत्त्वाचं असतं. आपण लहानपणापासून एका विशिष्ट पद्धतीने जगत असल्यामुळे आणि अशा प्रयोगांत काहीही गैर नाही हे माहीत असतानाही इतरांना कळलं तर ते आपली चेष्टा/ उपहास करतील, टोचून बोलतील, कदाचित मारतील किंवा घराबाहेरही काढतील असं वाटल्यामुळे हे प्रयोग घाबरून किंवा गिल्टी फील झाल्यामुळे बहुतेकदा इतरांपासून लपून केले जातात. या भीतीपोटी कित्येकदा काही जणांना त्यांची खरी ओळख त्यांच्या कुटुंबीयांपासून अगदी म्हातारपणापर्यंत लपवून ठेवावी लागते.

एकीकडे जिथे क्वीअर व्यक्ती घाबरलेली असते, तिथे दुसरीकडे त्यांचं कुटुंब आणि जिवलगही भीत असतात. ‘आपलं मूल क्वीअर असलं, तर आपण त्यांना वाढवण्यात काही चूक केली का?’, ‘ही त्यांच्या आयुष्यातील एक क्षणिक फेज (phase) आहे का’, ‘हा एक आजार तर नाही ना?’, ‘हा आजार असेल तर यातून बरं होता येईल का?’, ‘यामुळे आपल्या अपत्याचे आणि आपले संबंध ताणले जातील का?’, ‘इतरांना कळलं तर काय म्हणतील ते आपल्याला आणि आपल्या मुलांना?’ अशा अनेक शंका-कुशंका मनात येतात. मुळात, या प्रश्नांचा उगम कुठून होतो, हे जाणणं महत्त्वाचं आहे.

मानवाने आपल्या सोयीसाठी स्वत:च्याच प्रजातीचं स्त्री आणि पुरुष असं त्यांच्या शरीररचनेतील भिन्नतेवरून वर्गीकरण केलं. पण आपली प्रजनन संस्था वेगळी असल्यामुळे या जगात वावरण्याची पद्धत आणि आपल्या वाटय़ाला येणारी कामं किंवा जबाबदाऱ्यासुद्धा भिन्न असाव्यात, ही अपेक्षा नैसर्गिक नसून मानवनिर्मित आहे, हे लक्षात आलं तर आपल्या कित्येक शंकांचं आपोआप निरसन होईल. आपली उत्क्रांती होताना आपण समाजात सुव्यवस्था राहावी यासाठी काही अपेक्षा आणि लिखित/ अलिखित नियम तयार करत गेलो, पण या अपेक्षा आणि नियम कालांतराने बदलत राहाणं गरजेचं आहे, हे कुठेतरी विसरून गेलो. आपण कसं राहावं आणि जगावं याची एक व्याख्या आपण सरसकट सगळय़ांनाच लागू करू लागलो. पुढे या अपेक्षांविरोधात जाऊन कोणी त्यांचं आयुष्य जगत असेल, तर त्यांना वाळीत टाकण्यात येऊ लागलं, त्यांच्यावर बहिष्कार घालण्यात आला आणि त्यांना दुय्यम वागणूक दिली जाऊ लागली. यामुळे क्वीअर कम्युनिटीमधील कित्येक लोकांना सामाजिक, शारीरिक, लैंगिक आणि मानसिक छळाचा सामना करावा लागला आणि सध्या कित्येक कायदे अस्तित्वात असले, तरी अजूनही असा छळ सहन करावा लागत आहे.

दरवर्षी जून महिन्यामध्ये क्वीअर कम्युनिटीच्या हक्कांसाठी ‘प्राइड मंथ’ साजरा केला जातो. यंदाच्या ‘प्राइड मंथ’च्या निमित्ताने स्वत:ला एक प्रश्न विचारून पाहू या – समोरच्या व्यक्तीची जात, धर्म, पंथ, जेंडर आयडेंटिटी किंवा लैंगिकता (sexuality) काहीही असो. पण माणसाने माणसाला माणसासारखं वागवणं आणि स्वीकारणं खरंच इतकं अवघड आहे का?

viva@expressindia.com

मराठीतील सर्व व्हिवा ( Viva ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Man spandane author mrunmayi pathare mechanic sports part take college lecture ysh

Next Story
मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक!
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी