म्हातारं न दिसण्यासाठी… या ९ टिप्स | to avoid looking older follow these tips vp-70 | Loksatta

लवकर म्हातारं न दिसण्यासाठी… या ९ टिप्स!

म्हातारपण टाळता येणार नसलं, तरी वेळेआधीच म्हातारं दिसणं मात्र जीवनशैलीत काही सकारात्मक बदल करून लांबवता येऊ शकतं.

लवकर म्हातारं न दिसण्यासाठी… या ९ टिप्स!
वेळेआधीच म्हातारं दिसणं लांबवता येऊ शकतं… (छायाचित्र सौजन्य : pixabay)

वय वाढत जातं, तसं कोणतीही व्यक्ती म्हातारी होणार, म्हातारपण चेहऱ्यावर दिसणार, यात काही गैर नाहीच. पण तुम्हाला ‘प्रीमॅच्युअर एजिंग’ ही संकल्पना माहिती आहे का? वय वाढण्याबरोबरच आपण कोणत्या वातावरणात राहातो, वावरतो, तसंच आपली एकूण जीवनशैली कशी आहे, याचाही आपल्या त्वचेवर मोठा परिणाम होत असतो. ‘प्रीमॅच्युअर एजिंग’मध्ये वयानं खूप म्हातारं होण्याच्या आधीच म्हातारं झाल्याच्या खुणा चेहऱ्यावर दिसू लागतात. हल्ली अनेक जणांची ही तक्रार असते आणि ‘अँटी एजिंग’चा दावा करणाऱ्या सौंदर्यप्रसाधनांचा वापर किंवा त्या प्रकारचे इतर सौंदर्योपचार ही अनेक मंडळी तिशीतच सुरू करताना दिसतात. म्हातारपण टाळता येणार नसलं, तरी वेळेआधीच म्हातारं दिसणं मात्र लांबवता येऊ शकतं. त्यासाठी अर्थातच जीवनशैलीत सुधारणा करण्याचा सल्ला दिला जातो. यात आरोग्यदायी आहार, नियमित व्यायाम, आरोग्यदायी वातावरणात राहाणं याचा उपयोग होऊ शकतो. ‘अमेरिकन अकॅडमी ऑफ डरमॅटोलॉजी असोसिएशन’नं (एएडी) अशा काही दिल्या टिप्स आहेत, ज्यांचा अवलंब केल्यास ‘प्रीमॅच्युअर एजिंग’ची प्रक्रिया लांबवता येईल.

आणखी वाचा : नातेसंबंध : बायको पडतेय तोंडघशी?

चेहरा धुताना हे लक्षात ठेवा
आंघोळीच्या वेळी, बाहेर जाताना आणि बाहेरून आल्यावर आपण चेहरा धुतो. पण प्रत्येक वेळी त्वचा स्वच्छ व्हावी यासाठी काहींना रगडून, रगडून धुवायची सवय असते. असं केल्यास त्वचेला इजा होऊ शकते आणि त्यामुळे ‘प्रीमॅच्युअर एजिंग’ला चालना मिळू शकते. त्यामुळे हलक्या हातानं आणि सौम्य उत्पादनं वापरून चेहरा धुतलेला चांगला. चेहऱ्यावर खूप घाम आल्यावर चेहरा धुवायला हवा.

उन्हापासून त्वचेचं संरक्षण महत्त्वाचं
‘प्रीमॅच्युअर एजिंग’ लांबवण्यासाठी उन्हापासून त्वचेचं संरक्षण करणं फारच आवश्यक आहे. त्यामुळे कडक उन्हात बाहेर जाताना हात आणि चेहरा झाकलेला चांगला. त्यासाठी सनकोट वापरता येईल, तसंच चेहऱ्याला संरक्षण देईल अशा पद्धतीनं स्कार्फ किंवा ओढणी बांधता येईल किंवा थेट चेहऱ्यावर कडक ऊन पडू नये म्हणून टोपी घालता येईल. तरीही काही त्वचा कडक उन्हात उघडी असतेच. त्या दृष्टिनं संरक्षण मिळवण्यासाठी सनस्क्रीन वापरावं. हे सनस्क्रीन ‘ब्रॉड स्पेक्ट्रम’चं, ‘एसपीएफ ३०’ किंवा त्याहून अधिक संरक्षण दिणारं आणि ‘वॉटर रेझिस्टंट’ असलेलं चांगलं.

आणखी वाचा : तुमच्यासाठी ‘महिला’ म्हणजे प्रसिद्धीचं खेळणं आहेत का?

रोज मॉईश्चरायझर वापरा
मॉईश्चरायझर त्वचेला ओलावा देतं. त्यामुळे ते रोज वापरायलाच हवं.

सारखे डोळे मिचकावताय?
हे वाचायला मजेशीर वाटेल, पण आपल्यापैकी काही जणांना सारखी सारखी एकाच प्रकारची ‘फेशियल एक्स्प्रेशन्स’ करण्याची सवय असते. ती त्यांची लकब असू शकते. उदा. सारखे डोळे मिचकावणं (किंवा स्क्विंटिंग), कपाळाला आठ्या घालणं, वगैरे. जेव्हा आपण चेहऱ्यावर अशा भावना दाखवतो, तेव्हा तिथले स्नायू आपण तात्पुरते आकुंचित करत असतो. त्यात काहीच गैर नाही. पण वर्षानुवर्षं एकच लकब सारखी सारखी करत राहिल्यास चेहऱ्यावर त्या ठिकाणी सूक्ष्म रेषा तयार झाल्यासारख्या दिसतात. हे टाळा.

आरोग्यदायी, संतुलित आहारच हवा
ताज्या भाज्या आणि फळं पुरेशा प्रमाणात आहारात नियमित असतील, तर ‘प्रीमॅच्युअर एजिंग’ला आळा बसायला मदत होईल, असं काही अभ्यासांमधून दिसून येतं. काही अभ्यास असंही सांगतात, की अति साखरेचे आणि अतिप्रक्रियायुक्त (रीफाईन्ड) पदार्थ वारंवार खाल्ल्यास लवकर म्हातारं दिसायला चालना मिळू शकते.

व्यायाम करा
आठवड्यातले अधिकाधिक दिवस चांगला व्यायाम करायचा प्रयत्न करा. त्यानं शरीर जातंजवानं होतं आणि रोगप्रतिकारशक्तीला चालन मिळते. व्यायामाच्या चांगल्या परिणामांमुळे त्वचेवरही तजेला दिसून येतो.

आणखी वाचा : आई व्हायचंय? तर प्रेग्नंसीसाठी ‘या’ दिवसात शरीरसंबंध ठेवणं महत्वाचं

स्मोकिंग त्वरित थांबवा
धूम्रपानामुळे ‘प्रीमॅच्युअर एजिंग’ला एक प्रकारे चालनाच दिल्यासारखं होतं. धूम्रपानामुळे त्वचेवर लवकर सुरकुत्या पडतात, त्वचा मलूल, पिवळसर दिसू लागते. त्यामुळे तुम्ही जर धूम्रपान करत असाल, तर ते प्रयत्नपूर्वक थांबवा.

मद्यपान नियंत्रणातच हवं
तुम्ही मद्यपान करत असाल तर ते नियंत्रणातच हवं. शक्यतो टाळलेलं बरं.

याशिवाय एखाद्या सौंदर्यप्रसाधनाची त्वचेवर ॲलर्जी येत असेल, त्वचेवर पुरळ, खाज येणं, आग होणं असा परिणाम होत असेल, तर ते वापरणं लगेच थांबवा.

मराठीतील सर्व चतुरा ( Women ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-12-2022 at 19:12 IST
Next Story
आई xx दे की रिप्लाय!