मुंबई : क्रेडिट आणि डेबिट कार्डधारकांना त्यांच्या कार्डाचे चिन्हांकन अर्थात टोकनीकरणाची प्रक्रिया पूर्ण करून घेण्यासाठी रिझव्‍‌र्ह बँकेने आणखी तीन महिन्यांचा कालावधी देऊ केला आहे. कार्ड टोकनीकरणाची अंतिम मुदत तीन महिने पुढे म्हणजे ३० सप्टेंबर २०२२ पर्यंत वाढविण्याचा निर्णय शुक्रवारी तिने जाहीर केला. या प्रक्रियेला दिली गेलेली ही तिसरी मुदतवाढ असून,  मध्यवर्ती बँकेने त्यासाठी ३० जून ही अंतिम मुदत निश्चित केली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्यापारी व देयक व्यवहार मंचांना कार्डाचे सर्व तपशील हटवून, ग्राहकांच्या संमतीने ते टोकनह्णरूपात बदलून घ्यावे लागण्याच्या या प्रक्रियेला मुदतवाढीची कारणमीमांसा रिझव्‍‌र्ह बँकेने शुक्रवारी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे. विशिष्ट प्रकारच्या व्यवहारांच्या संदर्भात नव्या आदेशाच्या अंमलबजावणीशी संबंधित समस्यांकडे उद्योग क्षेत्राकडून लक्ष वेधण्यात आल्याचे तिने म्हटले आहे. तसेच, टोकन वापरून प्रक्रिया केलेल्या व्यवहारांची संख्या व्यापाऱ्यांच्या सर्व श्रेणींकडून अद्याप प्राप्त झालेली नाही, असे उद्योग क्षेत्राकडून सूचित केले गेले आहे.

या समस्यांची दखल घेऊन त्यासंबंधी सर्व भागधारकांशी सल्लामसलत करून त्यांचे निराकरण केले जात असल्याचे रिझव्‍‌र्ह बँकेने म्हटले आहे. हा विस्तारित कालावधी व्यापारी संस्था व देयक उद्योगाद्वारे, टोकनीकृत व्यवहार हाताळण्यासाठी सर्व भागीदारांची सज्जता करण्यासाठी, टोकन-आधारित व्यवहारावर प्रक्रिया आखण्यासाठी, तसेच कार्डधारकांमध्ये जनजागृतीसाठी वापरात येईल, असा विश्वास रिझव्‍‌र्ह बँकेने व्यक्त केला आहे. टोकनीकृत कार्डाची एक पर्यायी यंत्रणा कार्यान्वित करण्याच्या दिशेने या काळात पावले टाकली जातील, असेही मध्यवर्ती बँकेला अपेक्षित आहे.

टोकनीकरण काय?

सध्या, ऑनलाइन धाटणीच्या कार्ड व्यवहारांमध्ये, व्यापाऱ्यांसह अनेक संस्थांकडून ग्राहकांच्या कार्डाचा तपशील अर्थात कार्ड क्रमांक, समाप्तीची तारीख वगैरे ‘कार्ड-ऑन-फाइल’ तपशील जतन करून ठेवला जातो. जेणेकरून भविष्यात व्यवहार करताना कार्डधारकांना हा तपशील पुन्हा नमूद करावा न लागता, सोयीस्करपणे व अल्पवेळेत व्यवहार मार्गी लावणे शक्य बनते. परंतु अनेक व्यापारी संस्थांकडे अशा तऱ्हेने कार्डाचा तपशील असणे, यातून तो चोरला जाण्याची अथवा त्याचा दुरुपयोग होण्याचा धोकाही वाढतो. शिवाय व्यापाऱ्यांकडूनच साठविलेल्या अशा तपशिलाबाबत हयगय आणि गैरवापर झाल्याची आणि कार्डधारकांना त्यातून मोठे आर्थिक नुकसान झाल्याची उदाहरणे आहेत. त्यामुळे कार्ड वितरण जाळे आणि कार्ड जारीकर्त्यांव्यतिरिक्त इतर कोणत्याही संस्थेने कार्डचा तपशील जतन करता येणार नाही, असे रिझव्‍‌र्ह बँकेने फर्मान काढले. तसेच व्यापारी व देयक व्यवहार मंचांना कार्डचे सर्व तपशील हटवून, ग्राहकांच्या संमतीने ते ‘टोकन’रूपात बदलून घ्यावे लागणार आहे.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Card tokenization extended three months tokenization process reserve bank ysh
First published on: 25-06-2022 at 00:02 IST