|| जयंत विद्वांस
मार्च २०१४ मध्ये निवडणूकपूर्व माहोलात, मोदी सरकार येणार येणार म्हणून शेअर बाजार निवडणूक निकालांच्या आधीच वर गेला. त्याचप्रमाणे यंदाही, विशेषत: पुलवामा हल्ल्यानंतर शेअर बाजाराच्या अपेक्षा खूप उंचावल्या आहेत. निफ्टी निर्देशांक नव्याने ११,५००ची वेस ओलांडून पुढे गेला आहे. ७ सप्टेंबर २०१८ रोजी निफ्टी व बीएसई सेन्सेक्स सर्वोच्च पातळीवर (निफ्टी ११,५८९ व सेन्सेक्स ३८,३८९) होते आणि कळसापर्यंतचे अंतर गेल्या दोन महिन्यांत झपाटय़ाने कापले गेले.
तेजीमध्ये सर्व जण शेअर्स खरेदीच्या मागे असतात. ‘‘सर्व जण खरेदी करतात तेव्हा आपण शेअर्स विकावे व सर्व जण घाबरून विकतात तेव्हा आपण खरेदी करावेत’’ हे सर्वाना पटत-उमगत असते, पण कोणीही तसे वागत मात्र नाही. बाजार अजून, अजून वर गेला तर! आपण मागे राहून गेलो असे होऊ नये म्हणून कळपातील मेंढय़ांप्रमाणे सर्व प्रवाहपतित होत राहतात.
तत्कालीन, १३ एप्रिल २०१६च्या ‘अर्थ वृत्तान्त’मधील (अपेक्षांचे ओझे) लेखात, आयडीएफसी म्युच्युअल फंडाच्या पी/ई रेशोच्या मोजपट्टीबद्दल माहिती सांगितली गेली होती. तीच माहिती पुन्हा नव्या भाषेत सांगणे गरजेचे आहे. पी/ई रेशो म्हणजे शेअर्सचा बाजारभाव (किंवा निफ्टी निर्देशांकाचा) भागिले प्रत्येक शेअर मागे कंपनीचा निव्वळ नफा (किंवा निफ्टीचा एका युनिटमागे नफा) हा निफ्टीचा पी/ई रेशो कसा बघता येईल. राष्ट्रीय शेअर बाजार – ‘एनएसई’च्या वेबस्थळावर (६६६.ल्ल२ी्रल्ल्िरं.ूे) गेल्यावर कोणत्याही तारखेची किंवा कालावधीची माहिती मिळते.
ही मोजपट्टी १ ऑक्टोबर १९९९ ते ३१ डिसेंबर २०१५ या कालावधीतील निर्देशांकानुसार बनवली आहे. १६ वर्षांचा कालावधी हा तसा मोठा आहे. या मोजपट्टी नुसार पी/ई रेशियो जर १६ पेक्षा कमी असेल तर तुम्ही शेअर्स बिनधास्तपणे खरेदी करा. (हिरवा सिग्नल) परंतु एकूण गुंतवणुकीपकी फक्त एक टक्का रक्कम यावेळेस फंड घराण्यांना मिळाली. १६ ते १९च्या दरम्यान पी/ई रेशो असेल तर जरा सांभाळून. (पिवळा सिग्नल) या काळात फंड घराण्यांजवळ १९ टक्के रक्कम जमा झाली आणि पी/ई रेशो जर १९च्या वर असेल तर तुम्ही मोठी जोखीम घेत आहात (लाल सिग्नल) हा संकेत आहे. पण याच काळात फंड घराण्यांजवळ ८० टक्के रक्कम आली. म्हणजेच कळपातील मेंढय़ांच्या वृत्तीनेच आपण वागतो. बाजार तेजीत असताना सर्व जण आपली गुंतवणूक करतात.
मागील २० वर्षांचा निफ्टीच्या पी/ई रेशोचा एकंदर पट पाहिल्यास, सर्वात जास्त पी/ई फेब्रुवारी २०००, डिसेंबर २००७, ऑगस्ट २०१८ या काळात आहे. जुल २०१७ मध्ये पी/ई रेशो २५.१ आहे आणि तेव्हापासून तो कायमच त्याच्यावर आहे. म्हटले तर मागील दोन वष्रे बाजार ‘डेंजर झोन’मध्येच आहे. या काळात परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार भारतीय बाजारात शेअर्सची विक्री करीत आहेत आणि त्यांनी विकेलेले शेअर्स आपण चढय़ा भावात ‘एसआयपी’द्वारा खरेदी करीत आहोत. स्वाभाविकच मागील दोन वर्षांच्या काळात सुरू झालेल्या म्युच्युअल फंडांच्या ‘एसआयपी’चा परतावा अगदीच कमी आहे किंवा उणे आहे. डिसेंबर २०१८ ते फेब्रुवारी २०१९ या कालावधीत काही ‘एसआयपी’ बंद झाल्या. नवीन ‘एसआयपी’ चालू होण्याचे प्रमाण घटले. मग म्युच्युअल फंडाकडे नव्याने आलेले ग्राहक म्हणू लागले, ‘‘म्युच्युअल फंड सही है, पर रिटर्न्स नही है.’’
गेल्या वर्षी ७ सप्टेंबर रोजी निफ्टी निर्देशांक ११,५८९ या सर्वोच्च स्थानावर होता. त्या वेळेस पी/ई रेशो २८.१७ होता. त्यानंतर २० मार्च २०१९ रोजी पी/ई रेशो २८.२४ पातळीवर पोहोचला आहे.
काही विश्लेषक (फंडामेंटल अॅनालिस्ट) असे सांगतात की, हा पी/ई रेशो चुकीचा आहे. तुम्ही आजचा बाजारभाव आणि मागील काळातील प्रति समभाग उत्पन्न ही तुलना चुकीची आहे. या ऐवजी आजचा भाव भागिले पुढील अपेक्षित प्रति समभाग उत्पन्न (फॉरवर्ड पी/ई) विचारात घ्यायला हवा. हा मुद्दा मान्य केल्यास हा फॉरवर्ड पी/ई रेशो २०च्या वर आहे. म्हणजेच पुन्हा डेंजर झोनमध्येच आहे. पुढील काळात कंपन्यांचे उत्पन्न व नफा किती प्रमाणात वाढू शकतो याला मर्यादा आहेत. कंपन्यांचा नफा पुढील वर्षभरात मोठय़ा प्रमाणावर वाढण्याची शक्यता कमी आहे. ज्यायोगे फॉरवर्ड पी/ई सुधारेल अशी शक्यताही कमी आहे.
पी/ई रेशो हाताबाहेर गेल्यावर काही तज्ज्ञ असेही सांगतात की, पी/ई रेशो ऐवजी पी/बी म्हणजेच बाजारभाव भागिले पुस्तकी किंमत – बुक व्हॅल्यू हा रेशो बघितला जावा. कंपन्यांच्या मालमत्तेचे पुनर्मूल्यांकन करून गंगाजळी वाढवता येतात. त्याने कंपनीची बुक व्हॅल्यू वाढवता येते. परंतु खोटा नफा दाखवला तर त्यावर आयकर द्यावा लागतो. हे कोणीही करायला जात नाही. म्हणजे पी/ई रेशो आपल्या सोयीने बदलता येत नाही.
पुष्कळसे तांत्रिक विश्लेषक हे तक्त्यांनुसार (चार्ट) दोन वर्षांनंतर खूप मोठी तेजीची संभावना व्यक्त करतात. माझा तांत्रिक विश्लेषणाचा अभ्यास नाही. परंतु शेवटी दोन्ही अभ्यास एका पातळीवर येणे अपेक्षित आहे.
मागील काही महिने आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडाचे वरिष्ठ निधी व्यवस्थापक शंकर नरेन गोड भाषेत सांगत आहेत की, सध्याचा काळ हा डेट फंडांसाठीचा आहे. सध्याच्या काळात म्हणूनच त्यांच्या फंड घराण्याच्या अॅसेट अॅलोकेटर फंड (फंड ऑफ फंड) मध्ये २४.४८ टक्के गुंतवणूक समभागसंलग्न – इक्विटी प्रकारात आणि ७५.५२ टक्के गुंतवणूक डेट प्रकारात आहे. सध्या बॅलन्स्ड अॅडव्हान्टेज किंवा डायनॅमिक इक्विटी फंड या प्रकारात काही फंड घराण्यांची गुंतवणूक वरील तक्त्यात दर्शविल्याप्रमाणे आहे.
डेरीव्हेटिव्हज्मार्फत निफ्टी पुट खरेदी किंवा फ्युचर विक्री करून एकूण इक्विटी एक्सपोजर कमी केले जाते. आजच्या काळातील फंड घराणी शेअर बाजारातील गुंतवणुकीबाबत कसा विचार करतात हे वरील तक्त्यावरून स्पष्ट होते. मग आपण कंपन्यांच्या आर्थिक स्थितीचा अभ्यास न करता, निवडणुकांच्या अपेक्षित निकालावर (जो अनपेक्षित असू शकतो) गुंतवणुकीचे निर्णय घेतो. सध्या जागतिक अर्थव्यवस्था मंद गतीने वाढते आहे. सर्व देश एकमेकांवर व्यापारी र्निबध घालण्यामागे लागले आहेत. आपण मात्र इंडिया ग्रोथ स्टोरीच्या गप्पा मारत आहोत. मागील दहा वर्षांत जागतिक मंदीसदृश परिस्थिती आलेली नाही. ज्यामुळे लोकांच्या भावना बदलतील. काहीतरी लहानसे निमित्त पुरेसे होईल. यंदाच्या लोकसभा निवडणूक निकालांबाबत तीन पर्याय संभवतात.
१. सत्तारूढ पक्षास बहुमत,
२. विरोधी पक्षास पूर्ण बहुमत,
३. विविध पक्षांचे युती सरकार
दुसरी आणि तिसरी शक्यता निर्माण झाल्यास वाजपेयी सरकार कोसळल्यावर बाजार ज्या पद्धतीत कोसळला तसे निमित्त साधून बाजार खाली आपटवला जाऊ शकतो. पण पहिली शक्यता निर्माण झाल्यास बाजार वर जायची शक्यताही फारच कमी आहे. कारण कंपन्यांची आर्थिक कामगिरी सुधारण्यास काही काळ जावा लागेल. त्यातच २००० रुपयांची नोट रद्द करण्याचा फतवा निघाल्यास आर्थिक प्रगती होण्यास जास्त कालावधी लागेल.
sebiregisteredadvisor@gmail.com
(लेखक सेबीद्वारे नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार व सीएफपी पात्रताधारक आहेत.)