माझा पोर्टफोलियो : ग्रामीण मागणीतील पुनरुज्जीवनाचा लाभ

भारतात दुचाकी उद्योगातील ऑटोमोटिव्ह चेनमध्ये कंपनीचा ७० टक्क्यांहून अधिक बाजारहिस्सा आहे.

माझा पोर्टफोलियो : ग्रामीण मागणीतील पुनरुज्जीवनाचा लाभ

अजय वाळिंबे
सुमारे ८४ वर्षांपूर्वी वाहतूकदार (ट्रान्सपोर्ट ऑपरेटर) म्हणून स्थापन झालेली एल. जी. बालकृष्णन अँड ब्रदर्स लिमिटेड ही कंपनी आज ऑटोमोटिव्ह ॲप्लिकेशन्ससाठी चेन, स्प्रॉकेट्स आणि मेटल आदी वाहनांतील सुटय़ा भागांची प्रमुख उत्पादक आहे. कंपनीच्या व्यावसायिक विभागांमध्ये ट्रान्समिशन, मेटल फॉर्मिग आणि इतर उत्पादनांचा समावेश होतो. आज एलजीबीचे भारतात २७ अत्याधुनिक उत्पादन प्रकल्प असून एक अमेरिकेमध्ये आहे. कंपनीची १५ लाख चौरस फुटांहून अधिक क्षेत्रफळावर विस्तारलेली अत्याधुनिक उत्पादन सुविधा असून, एलजीबी ऑटोमोटिव्ह टायिमग आणि ड्राईव्ह चेन, स्प्रॉकेट्स, ऑटो टेन्शनर्स, गाइड्स, फाइन ब्लँक्ड घटक, प्रिसिजन मशीन केलेले पार्ट्स, बेल्ट्स, रबर उत्पादनांसह ट्रान्समिशन उत्पादनांमध्ये अग्रगण्य कंपनी मानली जाते. दुचाकीच्या बाजारपेठेत एलजीबी आज आघाडीची ओईएम उत्पादन पुरवठादार आहे. कंपनीच्या एकूण व्यवसायात दुचाकीचा हिस्सा ८५ टक्के असून बाकी इतर वाहन प्रकारांचा आहे.

कंपनीच्या प्रमुख ग्राहकांमध्ये बजाज ऑटो, टीव्हीएस मोटर, यामाहा मोटर, रॉयल एनफिल्ड, होंडा आदी दिग्गज कंपन्यांचा समावेश असून सर्वात मोठा ग्राहक बजाज ऑटो लिमिटेड आहे. सध्या, भारतात दुचाकी उद्योगातील ऑटोमोटिव्ह चेनमध्ये कंपनीचा ७० टक्क्यांहून अधिक बाजारहिस्सा आहे. कंपनीचे २७ उत्पादन प्रकल्प देशभरात कोईम्बतूर, करूर, म्हैसूर, बंगळुरू, पुणे, गुरूग्राम, चेन्नई, उत्तराखंड, अल्वर इ. ठिकाणी आहेत. कंपनीची भारतात ३० विक्री केंद्रे असून उत्तम वितरण व्यवस्था आहे.

गेल्या आर्थिक वर्षांत उत्तम कामगिरी करून दाखवलेल्या या कंपनीचे जून २०२२ अखेर संपलेल्या पहिल्या तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर झाले असून कंपनीने गेल्या आर्थिक वर्षांच्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेत उलाढालीत ३२.५६ टक्के वाढ नोंदवून ती ५२४.४२ कोटीवर नेली आहे. तर नक्त नफ्यातदेखील तब्बल ५५.७० टक्के वाढ होऊन तो ५८.४१ कोटीवर गेला आहे. सध्या जगभरात इलेक्ट्रिक वाहनांची हवा असली तरीही पेट्रोल-डिझेलवर चालणाऱ्या वाहनांचे उत्पादन अजून किमान १० वर्ष तरी चालू राहील. भारतात ग्रामीण भागातील दुचाकी क्षेत्रातील वाढती मागणी पाहता आणि कंपनीचा या बाजारपेठेतील हिस्सा पाहता आगामी कालावधीतदेखील कंपनी उत्तम कामगिरी करून दाखवेल अशी अपेक्षा आहे. अनुभवी प्रवर्तक, उत्तम गुणवत्ता आणि अत्यल्प कर्ज असलेला एलजीबीचा शेअर मध्यम कालावधीसाठी आकर्षक गुंतवणूक ठरू शकेल.
सध्याची शेअरबाजारातील अनिश्चितता पाहता सुचविलेले समभाग कमी बाजार भावात मिळू शकतात, त्यामुळे प्रत्येक घसरणीत टप्प्याटप्प्याने शेअर खरेदीचे धोरण ठेवावे.

अजय वाळिंबे बाजारातील अनिश्चितता पाहता हा शेअर सुचविलेल्या किमतीपेक्षा कमी भावात मिळू शकतो, म्हणून प्रत्येक मंदीत तसेच टप्प्याटप्प्याने शेअर खरेदीचे धोरण ठेवावे.

एल जी बालकृष्णन ॲण्ड ब्रदर्स लि.
(बीएसई कोड – ५००२५०)
शुक्रवारचा बंद भाव : रु. ६६५/-
वर्षभरातील उच्चांक/ नीचांक : रु. ७३६ / ३९९

संक्षिप्त विवरण
शेअर गट : स्मॉल कॅप
प्रवर्तक : विजयकुमार बालकृष्णन
व्यवसाय क्षेत्र : ऑटो अॅन्सिलरी
पुस्तकी मूल्य : रु. ३६१
दर्शनी मूल्य : रु. १०/-
गतवर्षीचा लाभांश : १५०%
बाजार भांडवल : रु. २,०९० कोटी

भरणा झालेले भागभांडवल : रु. ३१.३९ कोटी
शेअर होल्डिंग पॅटर्न (%)
प्रवर्तक ३४.३२
परदेशी गुंतवणूकदार ८.०३
बँक/ म्यु. फंड/ सरकार ११.८२
इतर/ जनता ४५.८३

शेअर शिफारशीचे निकष
प्रति समभाग उत्पन्न : रु. ८६.२७
पी/ई गुणोत्तर : ८.४५
समग्र पी/ई गुणोत्तर : २४.४
डेट इक्विटी गुणोत्तर : ०.०९
इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर : ४२.९
रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड : २९
बीटा : १.१

सूचना : १. प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यापेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. २. लेखात सुचविलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर वा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.

मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त ( Arthvrutant ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
‘अर्था’मागील अर्थभान : औद्योगिक संबंध( इंडस्ट्रियल रिलेशन्स )
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी