सध्या गाड्यांच्या वाढत जाणाऱ्या किमती पाहून अनेकांना सेकंड हॅण्ड गाडी घेणे सोईचे आणि परवडणारे वाटते. मात्र, असे असले तरी कोणतीही वापरलेली गाडी वा वाहन खरेदी करताना, ती व्यक्तीने सावधानता बाळगून आणि विचार करून घेणे गरजेचे असते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काही जण नवी कोरी गाडी विकत घेण्याआधी सराव व्हावा यासाठी एखादी वापरलेली गाडी विकत घेतात. तर, काहींना बाजारातील नवनवीन गाड्यांच्या किमती आणि अगोदरच्या जुन्या मॉडेलच्याही वाढत्या किमतींमुळे नवीन गाडी खरेदी करणे परवडत नाही. त्यामुळेही कित्येक जण हा पर्याय निवडतात. मात्र, अशी वापरलेली किंवा सेकंड हॅण्ड गाडी खरेदी करताना तुम्ही कोणत्या गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे ते लक्षात घ्या.

हेही वाचा : Bike tips : कशी घ्यावी आपल्या दुचाकी वाहनाची काळजी? पाहा ‘या’ पाच उपयुक्त टिप्स

सेकंड हॅण्ड गाडी विकत घेताना कोणती काळजी घ्यावी?

१. लगेच पसंती दर्शवू नये

तुम्हाला वाहन घेण्याची कितीही घाई असली तरीही पहिल्यांदाच गाडी बघितल्यावर पसंती देऊ नका. त्याव्यतिरिक्त अजून काही वाहनांची माहिती घ्या. तसेच जरी तुम्हाला एखादे वाहन आवडले असेल तरी तिच्या चमकदार रंगाकडे किंवा तिच्या केवळ बाहेरून दिसण्यावर भुलून एकदम खरेदीचा निर्णय घेऊ नका. ती गाडी किती चालवली गेलीय, मॉडेल कधीचे इ. महत्त्वाच्या सर्व बाबींची आवर्जून माहिती घ्या.

२. संपूर्ण गाडी तपासून पाहणे

गाडी पसंत केल्यानंतर अगोदर एकदा ती गाडी आत-बाहेरून तिचा प्रत्येक भाग तपासून पाहा. तुम्हाला जर गाडीच्या तांत्रिक गोष्टींची माहिती असल्यास, त्या आवश्यक बाबी स्वतः पडताळून पाहा किंवा मेकॅनिकला बोलावून त्याच्याकडून सर्व माहिती घ्या. वरून जरी सर्व गोष्टी व्यवस्थित वाटत असल्या तरीही ज्या व्यक्तीला गाड्यांविषयी माहिती असेल, त्याला त्यामधील त्रुटी किंवा काही दुरुस्ती आवश्यक असल्यास ते लगेच समजू शकते. त्यामुळे तुम्हाला गाडी घेतल्यानंतर त्रास होणार नाही. तसेच तुम्हाला वाहन खरेच चांगल्या स्थितीत विकले जात आहे ना याची खात्री होईल.
त्याचप्रमाणे तुम्ही गाडीच्या आत सीटवर कुठे डाग किंवा ती फाटली नसल्याचे पाहावे. तसेच आतमधील सर्व सिस्टीम, काचा, सीट बेल्ट इत्यादी तपासा. मुख्य म्हणजे गाडीचे टायर्स आणि इंजिन व्यवस्थित असल्याची खात्री करा.

हेही वाचा : Car tips : दुर्गंधी, घाण वास दूर करतील कॉफीच्या बिया; पाहा सुगंधी गाडीसाठी ‘स्वस्तात मस्त’ अशा टिप्स….

३. गाडी चालवून पाहणे

नवीन किंवा वापरलेली, कोणतीही गाडी खरेदी करण्याआधी ती वापरून, चालवून पाहणे अत्यंत महत्त्वाचे असते. गाडी चालवल्यानंतरच तुम्हाला त्यामध्ये काही गडबड असेल किंवा ती व्यवस्थित चालत आहे की नाही ते समजेल. तुम्हाला एकदा चालवून समजले नाही, तर २-३ वेळा गाडीचा वापर करून पाहा. एकदा तुम्हाला त्या गाडीमध्ये कोणतीही समस्या नाही, असे वाटल्यानंतरच पुढील निर्णय घ्यावा. तुमच्यासोबत अजून एखाद्या जाणकार व्यक्तीलाही गाडी चालवून पाहण्यास सांगा.

४. गाडीचा मेंटेनन्स

जे गाडी नियमित सर्व्हिसिंग किंवा दुरुस्त करवून आणतात, त्यांच्याकडे मेंटेनन्सची बिले असतात. गाडीच्या मेंटेनन्स बिलांवरून गाडीच्या स्थितीचा अचूक अंदाज येऊ शकतो.

५. रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट तपासणे

गाडी विकत घेण्याआधी वाहनाचे सर्टिफिकेट रजिस्ट्रेशन [RC ] तपासून पाहावे. गाडीच्या RC मध्ये वाहनाच्या मालकाचे नाव आणि इंजिनासंबंधी माहिती दिलेली असते. तसेच RC खरे आहे याचीही खात्री करा. जर ते डुप्लिकेट असेल, तर त्यावर DRC असे लिहिलेले तुम्हाला दिसू शकते. असे असल्यास खऱ्या RC बद्दल विचारपूस करा. वाहन विकत घेण्याआधी खऱ्या RC वर तुमचे नाव असायला हवे.

इतकेच नाही, तर इतर कागदपत्र जसे की, इन्शुरन्स, वाहनाचे इन्व्हॉइस, रोड टॅक्स रिसीट, प्रदूषण सर्टिफिकेट इत्यादी बाबीही तपासून पाहा. त्यानंतर फायनान्सिंग कंपनीचे NOC घेणेही महत्त्वाचे आहे. तुम्हाला गाडीचा रंग किंवा त्यामधील इंजिनाची जागा बदलायची असल्यास तशी माहिती आणि त्याबद्दलचे सर्टिफिकेट घेणे आवश्यक असते.

त्यामुळे वापरलेली किंवा सेकंड हॅण्ड गाडी घेताना या पाच महत्त्वाच्या टिप्स अजिबात विसरू नका. या टिप्सबाबतची माहिती हिंदुस्थान टाइम्सच्या एका लेखावरून घेतली आहे.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Getting a used car then these five tips you should always keep in mind before buying second hand vehicle dha
First published on: 27-01-2024 at 14:41 IST