आघाडीची हवाई वाहतूक कंपनी इंडिगोचा नफा मार्चअखेर तिमाहीत दुपटीने वाढत १,८९४.८ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. गेल्यावर्षी याच तिमाहीत कंपनीने ९१९.२ कोटी रुपयांचा निव्वळ नफा मिळविला होता. बरोबरीने २०२३-२४ या सरलेल्या आर्थिक वर्षात कंपनीने १८,५०५.१ कोटी रुपयांचे विक्रमी उत्पन्न मिळविले असून एकत्रित ८,१७२.५ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे.

आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत, इंडिगोने सेवा दिलेल्या प्रवासी संख्या गेल्या वर्षापूर्वीच्या कालावधीच्या तुलनेत १० ते १२ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मार्च २०२४ अखेर तिमाहीत कंपनीचे एकूण उत्पन्न सुमारे २७ टक्क्यांनी वाढून १८,५०५.१ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. वर्षभरापूर्वीच्या काळात ते केवळ १४,६००.१ कोटी रुपये होते. दरम्यान कंपनीच्या इंधन खर्चात ६.५ टक्क्यांची वाढ झाली एकंदर खर्च २२.३ टक्क्यांनी वधारला आहे. कंपनीला वर्ष २०२-२३ मध्ये ३०५.८ कोटींचा तोटा झाला होता, त्या तुलनेत सरलेल्या आर्थिक वर्षात करोत्तर नफा ८,१७२.५ कोटी रुपयांवर पोहोचला. मजबूत व्यवसाय नीतीच्या अंमलबजावणीमुळे सरलेल्या वर्षातील सर्व चार तिमाही कंपनीसाठी फायदेशीर ठरल्या आहेत, असे इंडिगोचे मुख्य कार्यकारी अधिकारी पीटर एल्बर्स म्हणाले.

हेही वाचा : जिओ फायनान्स ‘एफडीआय’ मर्यादा ४९ टक्क्यांपर्यंत वाढवणार

मार्च तिमाहीअखेर इंडिगोचे प्रवासी तिकिटांचे उत्पन्न २५.५ टक्क्यांनी वाढून १५,६००.९ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. मार्चअखेरीस, इंडिगोकडे ३६७ विमानांचा ताफा होता. ताज्या अधिकृत आकडेवारीनुसार, इंडिगोचा देशांतर्गत बाजारातील हिस्सा एप्रिलमध्ये ६०.६ टक्क्यांवर पोहोचला आहे. मार्च २०२४ अखेर, कंपनीकडे ३४,७३७.५ कोटी रुपयांची रोखता आहे.