सागर भस्मे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मागील लेखातून आपण वॉकर सर्क्युलेशन आणि एन्सो या संकल्पना काय आहेत? आणि त्यांचा भारतीय मान्सूनवर कसा परिणाम होतो, याबाबत माहिती घेतली. या लेखातून आपण वायू राशी काय असतात, याबाबत जाणून घेऊ. वायू राशीला हवेचा एक मोठा भाग म्हणून परिभाषित केले जाऊ शकते; ज्याचे भौतिक गुणधर्म विशेषत: तापमान, आर्द्रता आणि लॅप्स रेट, शेकडो किलोमीटरसाठी कमी-अधिक प्रमाणात समान असतात. हवेचे वस्तुमान इतके विस्तृत असू शकते की, ते खंडाचा एक मोठा भाग व्यापू शकते आणि ते उभ्या परिमाणात इतके जाड असू शकते की, ते पूर्ण तपांबराची उंची विस्तारू शकते. वायू राशीच्या गुणधर्मांचे स्वरूप हे स्रोत क्षेत्राचे गुणधर्म आणि त्याच्या हालचालीची दिशा याद्वारे निर्धारित केले जाते.

हेही वाचा – UPSC-MPSC : वॉकर सर्क्युलेशन ही संकल्पना काय आहे? त्याचा भारतीय मान्सूनवर कसा परिणाम होतो?

स्रोत प्रदेश / क्षेत्र (Source Regions) :

ज्या विस्तृत क्षेत्रांवर वायू राशी उत्पन्न होते किंवा तयार होते, त्याला स्रोत क्षेत्र म्हणतात. स्रोत प्रदेश वायू राशीचे गुणधर्म जसे की, तापमान आणि आर्द्रता मोठ्या प्रमाणात निर्धारित करतात. जेव्हा वायू राशीची उत्पत्ती होते तेव्हा वातावरणाची परिस्थिती दीर्घ कालावधीसाठी बर्‍यापैकी स्थिर व एकसमान राहते; जेणेकरून त्या क्षेत्रावरील हवा जमिनीच्या पृष्ठभागाचे तापमान आणि आर्द्रता प्राप्त करू शकेल. एकदा तयार झाल्यावर वायू राशी स्रोत क्षेत्रावर क्वचितच स्थिर राहते, त्याऐवजी ती इतर भागात पसरते.

वायू राशीचे दोन भागांत वर्गीकरण केले जाते. १) भौगोलिक वर्गीकरण आणि २) थर्मोडायनॅमिक वर्गीकरण

भौगोलिक वर्गीकरण (Geographical Classification) : वायू राशीचे भौगोलिक वर्गीकरण स्रोताच्या वैशिष्ट्यांवर आधारित आहे. त्रीवार्थाद्वारे भौगोलिक स्थानांच्या आधारे वायू राशीचे दोन मोठ्या श्रेणींमध्ये वर्गीकरण करण्यात आले आहे. १) ध्रुवीय वायू राशी (Polar Air Mass = P); जिचा उगम ध्रुवीय भागात होतो. आर्क्टिक एअर मासदेखील या श्रेणीमध्ये समाविष्ट आहे. २) उष्ण कटिबंधीय वायू राशी (Tropical Air Mass = T); जी उष्ण कटिबंधीय भागात उगम पावते. इक्वेटोरियल एअर मासचा समावेश यात होतो. स्रोत प्रदेशांच्या पृष्ठभागाच्या स्वरूपाच्या आधारावर वायू राशी आणखी दोन प्रकारांत विभागली गेली आहे. १) महाद्वीपीय वायू राशी (Continental Air Mass = c (c small)) आणि २) सागरी वायूराशी (Maritime Air Mass = m (m small)

वरील वस्तुस्थितींच्या आधारे वायू राशींचे त्यांच्या स्थानानुसार खालील चार प्रमुख प्रकारांमध्ये वर्गीकरण केले जाते.

  • महाद्वीपीय ध्रुवीय वायू राशी (continental polar air mass) = cP
  • सागरी ध्रुवीय वायू राशी (maritime polar air mass) = mP
  • महाद्वीपीय उष्ण कटिबंधीय वायू राशी (continental tropical air mass) = cT
  • सागरी उष्ण कटिबंधीय वायू राशी (maritime tropical air mass) = mT

वायू राशीचे थर्मोडायनॅमिक वर्गीकरण : वायू राशीचे थर्मोडायनॅमिक वर्गीकरण हे त्यांच्या तापमानाच्या गुणधर्माधारे केले जाते. १) थंड वायू राशी आणि २) गरम वायू राशी.

वायू राशीमधील बदल चार घटकांवर अवलंबून असतात : १) स्रोत क्षेत्राचे तापमान व आर्द्रता, २) जमीन किंवा पाण्याच्या पृष्ठभागाचे स्वरूप; ज्यावर वायू राशी तयार होते, ३) स्रोत क्षेत्रापासून प्रभावीत क्षेत्रापर्यंत वायू राशीचा मार्ग व ४) वायू राशीला विशिष्ट गंतव्य स्थानापर्यंत पोहोचण्यासाठी लागणारा वेळ.

हेही वाचा – UPSC-MPSC : ‘हिंदी महासागरातील द्विध्रुव’ ही संकल्पना काय आहे? त्याचा मान्सूनवर कसा परिणाम होतो?

थंड वायू राशी ( Cold air mass ) : थंड वायू राशीचा उगम ध्रुवीय आणि आर्क्टिक प्रदेशात होतो. थंड वायू राशीचे तापमान,आर्द्रता, तसेच तिचा लॅप्स दर कमी असतो. ज्या भागात थंड वायू राशी पोहोचते, तेथील तापमान कमी होऊ लागते. जर थंड वायू राशी उबदार समुद्राच्या पृष्ठभागावर असेल, तर त्याची विशिष्ट आर्द्रता वाढते आणि क्युम्युलोनिंबस (cumulonimbus) ढग तयार होतात, तेव्हा पर्जन्यवृष्टी होते. परंतु, जर ती थंड महाद्वीपावर असेल, तर पाऊस पडत नाही. जर थंड वायू राशी अंशतः उबदार समुद्राच्या पृष्ठभागावर आणि अंशतः लगतच्या थंड जमिनीच्या पृष्ठभागावर असेल, तर चक्रीवादळाची परिस्थिती निर्माण होते. त्याचे पुन्हा दोन भागांमध्ये वर्गीकरण केले जाते : १) महाद्वीपीय थंड वायू राशी (continental cold air mass), २) सागरीय थंड वायू राशी (maritime cold air mass)

उष्ण/गरम वायू राशी (warm air mass) : उष्ण वायू राशीचा उगम साधारणपणे उपोष्ण कटिबंधीय (subtropical) प्रदेशात होतो. या वायू राशीचे तापमान ती ज्या पृष्ठभागावर जाते, त्या भागांपेक्षा जास्त असते. तिचे पुन्हा दोन भागांमध्ये वर्गीकरण केले जाते– १) महाद्वीपीय गरम वायू राशी (continental warm air mass), २) सागरीय गरम वायू राशी (maritime warm air mass)

पृथ्वीच्या पृष्ठभागावर वायू राशीची सहा प्रमुख क्षेत्रे आहेत.

  1. ध्रुवीय महासागर क्षेत्र (कॅनडा व उत्तर युरोपमधील उत्तर अटलांटिक महासागर आणि सायबेरिया व कॅनडादरम्यान उत्तर पॅसिफिक महासागर),
  2. ध्रुवीय आणि आर्क्टिक खंडीय क्षेत्रे (युरेशिया व उत्तर अमेरिकेतील बर्फ-रूपांतरित क्षेत्रे आणि आर्क्टिक प्रदेश)
  3. उष्ण कटिबंधीय महासागरीय क्षेत्रे (अँटीसायक्लोनिक क्षेत्र),
  4. उष्ण कटिबंधीय खंडीय क्षेत्रे (उत्तर आफ्रिका-सहारा, आशिया, यूएसएचा मिसिसिपी व्हॅली झोन; जो सर्वांत जास्त उन्हाळ्यात विकसित होतो),
  5. विषुववृत्तीय प्रदेश (व्यापारी वाऱ्यांच्या दरम्यान स्थित क्षेत्र) व
  6. मान्सून भूमी (S.E. आशिया) (Monsoon lands).

अशा प्रकारे वायू राशी या पृथ्वीच्या भागावर तपांबरामध्ये तयार होऊन हवामानाला प्रभावीत करतात.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Upsc mpsc indian geography what is air masses and its type mpup spb
First published on: 12-09-2023 at 17:32 IST