चीनच्या संघर्षांवरून काँग्रेसने केंद्र सरकार व भाजपला सातत्याने लक्ष्य बनवल्यामुळे सत्ताधारी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी बुधवारी पुन्हा गांधी कुटुंबावर अप्रत्यक्ष पण, कडवी टीका केली. देशाने नाकारलेले सत्ताहीन राजघराणे हे संपूर्ण विरोधी पक्ष असू शकत नाही. एका कुटुंबाचे हित म्हणजे देशाचे हित असे कधीच होऊ शकत नाही, असा शाब्दिक प्रहार नड्डा यांनी गांधी कुटुंबाचे नाव न घेता केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पूर्व लडाखमधील चीनशी सुरू असलेल्या संघर्षांच्या संदर्भात नड्डा म्हणाले की, आज देश एकजूट झालेला असून तो लष्करी दलाच्या पाठीशी उभा आहे. ही वेळ ऐक्याची आहे.

देशाच्या राजकारण काँग्रेस पक्ष एकटा पडला असल्याचा दावा नड्डा यांनी केला. विरोधी पक्षाला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे, पण सर्वपक्षीय बैठकीत काँग्रेस वगळता सर्व पक्षांनी विविध सूचना केल्या व (चीनसंदर्भातील) रणनीती ठरवण्यासाठी केंद्र सरकारला पाठिंबा दिला. त्याला फक्त एक कुटुंब अपवाद ठरले होते.

एक राजघराणे म्हणजे देशातील विरोधी पक्ष असल्याचा या राजघराण्यातील व्यक्ती आणि त्यांच्या दरबारातील इमानदार सदस्यांमध्ये भ्रम निर्माण झालेला आहे. राजा नाटक करतो आणि त्याचे दरबारी सदस्य खोटय़ा गोष्टी पसरवत असतात, अशीही टीका नड्डा यांनी केली.

एका राजघराण्याच्या फाजील साहसामुळे आपण हजारो चौरस किमीची जमीन गमावली. सियाचीनचा भूभाग गमावलाच असता, असा आरोप नड्डा यांनी माजी परराष्ट्र सचिव श्याम शरण यांच्या पुस्तकाचा दाखला देत केला. सियाचीनसंदर्भात २००६ मध्ये भारत व पाकिस्तान यांच्यात सामंजस्य झाले होते. त्याला तत्कालीन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार एम.के. नारायण यांनी केल्याचे शरण यांनी पुस्तकात नमूद केले आहे.

भारताने सियाचीन पाकिस्तानला देण्याची तयारी दाखवली होती, मात्र लष्कराने त्याला विरोध केला. त्यामुळे हा संभाव्य करार बारगळला असा आरोप भाजपचे प्रवक्ता संबित पात्रा यांनी केला.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp presidents criticism of sonia and rahul gandhi abn