फ्रान्समध्ये निवडणुकीचे वारे वाहत असतानाच पॅरिस शहर पुन्हा एकदा दहशतवादी हल्ल्याने हादरले आहे. पॅरिसमधील शाँज एलिजे येथे हा हल्ला झाला असून या हल्ल्यात एका पोलिसाचा मृत्यू झाला आहे. बंदुकधारी हल्लेखोराला पोलिसांनी कंठस्नान घातले असून आयसिसने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पॅरिसमध्ये येणाऱ्या पर्यटकांमध्ये आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेल्या शाँज एलिजे या प्रसिद्ध रस्त्यावर बंदुकधारी हल्लेखोराने पोलिसांवर गोळीबार केला. रस्त्यावर पार्क केलेल्या पोलिसांच्या कारवर त्याने हल्ला केला. या हल्ल्यात एका पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू झाला. तर दोन पोलीस गंभीर जखमी झाले. पोलिसांच्या कारवाईत हल्लेखोराला कंठस्नान घालण्यात आले. सुरुवातीला हा दहशतवादी हल्ला होता की चोरीच्या उद्देशाने हा हल्ला झाला याविषयी संभ्रम होते. पण आयसिसने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारताच हा दहशतवादी हल्ला असल्याचे स्पष्ट झाले.

आयसिसने हल्लेखोराचे नाव जाहीर केले असून अबू युसूफ असे या हल्लेखोराचे नाव आहे. अबू हा मूळचा बेल्जियमचा असून गेल्या अनेक वर्षांपासून तो फ्रान्समध्येच राहत होता. विशेष म्हणजे अबू युसूफ हा दहशतवादी कारवायांमध्ये सक्रीय असून तो शस्त्रास्त्र विकत घेण्याच्या प्रयत्नात होता अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. पण सबळ पुराव्या अभावी चौकशीनंतर त्याला सोडून देण्यात आले होते. या घटनेच्या काही दिवसानंतरच अबूने हा हल्ला केला केला.

१५ वर्षांपूर्वी अबू युसूफने पाठलाग करणाऱ्या पोलिसांना लक्ष्य केले होते. याप्रकरणी त्याला २० वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षाही झाली होती. पण २०१६ मध्ये त्याला तुरुंगातून सोडण्यात आले होते. अबू युसूफ हा ३९ वर्षांचा असून या हल्ल्यात त्याच्यासोबत आणखी एक दहशतवादी होता असा संशय व्यक्त होत आहे. पोलिसांनी त्याच्या साथीदाराचा शोधही सुरु केला आहे. फ्रान्समध्ये तीन दिवसांनी राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत पॅरिसमधील दहशतवादी हल्ल्यांचे वाढते प्रमाण हा एक प्रमुख मुद्दा ठरणार असे दिसते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: France paris attack champs elysees french police officers isis gunman shot dead fire police car abu yousuf