आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पेजावर मठाचे प्रमुख श्री विश्वेशा तीर्थ स्वामीजी यांचे रविवारी येथे अल्प आजाराने निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते. दक्षिण भारतातील प्रमुख धर्मगुरूंपैकी ते एक होते. विश्व हिंदू परिषदेच्या रामजन्मभूमी चळवळीत ते आघाडीवर होते. त्यांनी पेजावर मठाच्या परिसरातच अखेरचा श्वास घेतला.

त्यांच्या निधनामुळे कर्नाटक सरकारने तीन दिवसांचा दुखवटा जाहीर केला असून बंगळुरू येथे त्यांनी स्थापन केलेल्या विद्यापीठात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील, असे मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांनी सांगितले.

विश्वेशा तीर्थ हे अष्टमठातील एक प्रमुख धर्मगुरू होते. अष्टमठांची स्थापना ८०० वर्षांपूर्वी द्वैत तत्त्वज्ञानी श्री माधवाचार्य यांनी केली होती. विश्वेशा तीर्थ यांना मणिपाल येथील केएमसी रुग्णालयात १९ डिसेंबर रोजी दाखल केले होते. त्यानंतर त्यांना त्यांच्या इच्छेनुसार पेजावर मठ येथे हलवण्यात आले. तेथून त्यांचे पार्थिव बांबूच्या पेटीतून आठ शतके जुन्या उडुपी श्रीकृष्ण मठात नेण्यात आले.    येडीयुरप्पा यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली व त्यांच्या पार्थिवावर राष्ट्रध्वज ठेवला. त्यांच्या पार्थिवाला तुळशीच्या माळा घालण्यात आल्या. पोलिसांनी बंदुकांची सलामी दिली. भाजप व संघाच्या अनेक नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की, स्वामीजी नेहमीच लाखो लोकांच्या हृदयात घर करून राहतील. त्यांनी समाजासाठी मोठे काम केले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Head of the monastery viswesha tirtha passed away abn