बालासोर : शुक्रवारच्या अपघातानंतर दिवसाच्या वेळी धावणाऱ्या पहिल्या गाडीने, वंदे भारत एक्स्प्रेस अपघातस्थळ सुरळीतपणे ओलांडले, तेव्हा अपघातामुळे झालेला विध्वंस पाहून गाडीतील प्रवाशांनी श्वास रोखून धरले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ही गाडी हावडय़ाहून जगन्नाथाचे मंदिर असलेल्या पुरी शहराकडे निघाली होती. नव्याने दुरुस्त झालेल्या रुळांवरून धावताना खबरदारी म्हणून गाडी हळू झाली, तेव्हा काही जण ‘जगन्नाथ, जगन्नाथ’ असे पुटपुटले, मात्र बहुतांश लोक नि:शब्द झाले होते.

ही गाडी वेळेवर सुटेल, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी प्रवाशांना रविवारी लघुसंदेशाद्वारे कळवले होते. त्यानुसार गाडी सकाळी ६.१० वाजता हावडा स्थानकावरून रवाना झाली, मात्र अपघातग्रस्त रेल्वे मार्गाची स्थिती माहीत नसल्यामुळे ती कोणत्या मार्गाने जाईल याची कुणालाच खात्री नव्हती. बहुतांश प्रवासी पुरीला जाण्यासाठी निघाले होते.

इंजिन चालकांचे जबाब नोंदवले

भुवनेश्वर : बालासोर रेल्वे दुर्घटनेत जखमी झालेले शालीमार चेन्नई कोरोमंडल एक्स्प्रेसचे  इंजिन चालक गुणनिधी मोहंती आणि त्यांचे सहायक चालक हजारी बेहरा यांचे जाबजबाब सोमवारी रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी नोंदवले. या दोघांवर येथील एम्समध्ये उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे. मोहंती यांना अतिदक्षता विभागातून सोमवारी सामान्य कक्षात हलविण्यात आले. तर, बेहरा यांच्या डोक्यावर शस्त्रक्रिया केली जाणार आहे, असे दक्षिण-पूर्व रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सांगितले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Howrah puri vande bharat passes through balasore accident site after tracks restoration zws