पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शनिवारी(दि.4) उत्तर प्रदेशातील एका प्रचारसभेत बोलताना ‘भ्रष्टाचारी नंबर वन अशा रुपात राजीव गांधींचा जीवनप्रवास संपला’, असे वक्तव्य केले होते. मोदींच्या या विधानावर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी ट्विटरमार्फत प्रतिक्रिया देताना ‘मोदीजी, लढाई संपलेली आहे. तुमचं कर्म तुमची वाट पाहतंय. तुमची तुमच्याबद्दलची वैयक्तिक मते माझ्या वडिलांवर लादल्याने तुमची सुटका होणार नाही, असं प्रत्युत्तर दिलं होतं. काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून मोदींच्या त्या वक्तव्यावर कडाडून टीका करण्यात येत असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मोदींच्या त्या विधानावर राज ठाकरेंनी फेसबुक पोस्टद्वारे टीका केली आहे. ‘दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधींबद्दलच्या विधानासाठी नरेंद्र मोदींना देश कधीही माफ करणार नाही’, अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोदींच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. आकस, सातत्यानं खोटं बोलणं आणि सार्वजनिक जीवनातील कोणत्याही संकेतांचं भान नसणं या तीन गोष्टींसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची कारकीर्द ओळखली जात होती. आता त्यात भर पडली ती विधीशून्यतेची. स्व. राजीव गांधींबद्दलच्या विधानासाठी मोदी, तुम्हांला देश कधीही माफ करणार नाही’, असं राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

काय म्हणाले होते मोदी –
‘तुमच्या वडिलांची प्रतिमा तुमच्या ‘राजदरबाऱ्यांनी’ मिस्टर क्लीन अशी रंगवली होती. पण त्यांच्या आयुष्याची अखेर ‘भ्रष्टाचारी नंबर १’ च्या रुपात झाली. नामदार, हा अहंकार तुम्हाला खाऊन टाकेल. हा देश चुका माफ करतो, पण फसवेगिरी कधीही माफ करत नाही’ असं विधान मोदींनी केलं होतं.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nation will never forgive modis statement about ex pm rajiv gandhi says raj thackeray