‘राजा विक्रमादित्यने कुतुबमिनार बांधला’, माजी ASI अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा

मागील काही दिवसांपासून देशात ज्ञानवापी मशीद प्रकरणावरून राजकीय वातावरण तापलं आहे. असं असताना आता दिल्लीतील प्रसिद्ध वास्तू कुतुबमिनारबाबत वेगवेगळे दावे प्रतिदावे केले जात आहेत.

मागील काही दिवसांपासून देशात ज्ञानवापी मशीद प्रकरणावरून राजकीय वातावरण तापलं आहे. असं असताना आता दिल्लीतील प्रसिद्ध वास्तू कुतुबमिनारबाबत वेगवेगळे दावे प्रतिदावे केले जात आहेत. अलीकडेच कुतुबमिनार परिसरात एका हिंदुत्ववादी गटाने आंदोलन केलं होतं. तसेच कुतुबमिनारचं नामकरण ‘विष्णूस्तंभ’ करावं, अशी मागणीही त्या गटाकडून करण्यात आली होती. यानंतर आता भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या एका माजी अधिकाऱ्यानं खळबळजनक दावा केला आहे.

कुतुबमिनार ही वास्तू कुतुब-अल-दिन ऐबक यांनी नव्हे तर राजा विक्रमादित्य यांनी बांधली होती, असा दावा भारतीय पुरातत्व सर्वेक्षणचे (ASI) माजी प्रादेशिक संचालक धर्मवीर शर्मा यांनी केला आहे. राजा विक्रमादित्य यांनी सूर्यात होणाऱ्या बदलाची स्थिती जाणून घेण्यासाठी कुतुबमिनारची निर्मिती केली होती. पाचव्या शतकात ही वास्तू बांधण्यात आली होती, असंही त्यांनी म्हटलं.

“संबंधित वास्तू ही कुतुबमिनार नसून एक सूर्य टॉवर (वेधशाळा टॉवर) आहे. तो कुतुब-अल-दिन ऐबकने नव्हे तर ५व्या शतकात राजा विक्रमादित्यने बांधला होता. माझ्याकडे याबाबत बरेच पुरावे आहेत,” असंही ते म्हणाले. भारतीय पुरातत्व विभागाकडून आपण अनेकदा कुतुबमिनारचं सर्वेक्षण केलं असल्याचंही त्यांनी म्हटलं.

“कुतुब मिनारच्या बुरुजात २५ इंचाचा कल आहे. सूर्याचं निरीक्षण करता यावं यासाठीच हा कल बनवला होता. हे विज्ञान आणि पुरातत्व विभागाचं तथ्य आहे,” असंही त्यांनी सांगितलं. कुतुबमिनार ही एक स्वतंत्र वास्तू असून त्याच्या जवळच्या मशिदीशी कुतुबमिनारचा काहीही संबंध नाही. रात्रीच्या वेळी आकाशात ध्रुव तारा पाहता यावा, यासाठी कुतुबमिनारचा दरवाजा देखील उत्तर दिशेला आहे, असा दावाही त्यांनी यावेळी केला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Qutub minar built by king vikramaditya not by qutb al din aibak big claim by former asi officer rmm

Next Story
गुजरातमध्ये भीषण अपघात; कारखान्याची भिंत कोसळून १२ जणांचा मृत्यू
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी