आपल्या सर्वांनाच अंतराळात प्रवास करणाऱ्या आणि चंद्रावर प्रथम पोहोचलेल्या अंतराळवीरांची नावे माहीत आहेत. ते अंतराळवीर म्हणजे ‘नील आर्मस्ट्राँग’ व ‘बझ ऑल्ड्रिन’. जुलै १९६९ साली अपोलो ११ हे यान यशस्वीरीत्या चंद्रावर पोहोचले आणि ‘नील आर्मस्ट्राँग’ व ‘बझ ऑल्ड्रिन’ चंद्रावर आपल्या पावलांचे ठसे उमटविणारे मानवजातीतील प्रथम पुरुष अंतराळवीर ठरले होते. मात्र, तुम्हाला माहीत आहे का की, हा प्रवास यशस्वी होण्यामागे खरे तर अनेक प्राणी कारणीभूत आहेत. कारण- मानवाआधी पृथ्वीवरील अनेक प्राण्यांना अवकाशात पाठविण्यात आले होते. आज आपण त्याच प्राणी, कीटकांबद्दल जाणून घेणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अंतराळ प्रवास करणारे प्राणी

१. माशी

तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल; मात्र पृथ्वीवरून सर्वांत प्रथम म्हणजे १९४७ साली घरात घोंगावणाऱ्या माश्यांना अंतराळात पाठविण्यात आले होते. अमेरिकन शास्त्रज्ञ भविष्यात अंतराळवीरांवर पडू शकणाऱ्या वैश्विक किरणोत्सर्गाच्या [Cosmic Radiation] प्रभावाबद्दल अभ्यास करीत होते. म्हणून या प्रयोगासाठी त्यांनी माश्यांची निवड केली होती. माश्या या आनुवंशिकदृष्ट्या मानवासारख्याच असतात म्हणून प्रयोगासाठी त्यांची निवड करण्यात आली होती.

हेही वाचा : हत्तीची स्मशानभूमी? खरंच हा बुद्धिमान प्राणी शेवटचा श्वास घेण्यासाठी विशिष्ट ठिकाणी जातो? जाणून घ्या…

दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटी नाझींचे V-2 बॅलिस्टिक क्षेपणास्त्र सापडले तेव्हा त्याला भरपूर माश्या लागलेल्या होत्या. या मिसाईलने हवेमध्ये साधारण १०९ किमी. प्रवास केला होता. हे अंतर म्हणजे अंतराळ सुरू होण्याचे अंतर होते. माश्यांनी भरलेले कॅप्सुल जेव्हा न्यू मेक्सिकोमध्ये उतरवले तेव्हा त्या कॅप्सुलमधील सर्व माश्या जिवंत असल्याचे शास्त्रज्ञांना आढळले. तसेच त्या माश्यांवर रेडिएशन म्हणजेच वैश्विक किरणोत्सर्गाचा कोणताही परिणाम झाला नसल्याचे दिसत होते. या यशस्वी प्रयोगानंतर मात्र अंतराळ पाठविण्यात येणाऱ्या प्राण्यांची रांग लागण्यास सुरुवात झाली.

२. माकड आणि वानर

आतापर्यंत माकडांच्या विविध प्रजाती मिळून एकूण ३२ माकडांनी अंतराळ प्रवास केला आहे. त्यांमधील सर्वांत पहिले माकड हे रीसस मॅकाक प्रजातीचे. अल्बर्ट नावाचे दुसरे माकड होते. परंतु, १९४९ साली १३४ किमी. अंतराचा प्रवास केल्यानंतर या माकडाचे पॅराशूट बिघडले आणि ते पुन्हा पृथ्वीच्या वातावरणात येऊ लागले. परिणामत: अल्बर्ट नावाच्या या माकडाचा दुर्दैवी मृत्यू झाला. याआधी पाठविण्यात आलेल्या अल्बर्ट पहिला नावाच्या माकडाचाही कॅप्सुलमध्ये गुदमरून मृत्यू झाला होता.

मात्र, ३१ जानेवारी १९६१ साली ग्रेट ऐप, हॅम या चिपांझीला अंतराळात यशस्वीरीत्या पोहोचवण्यात आले होते. इतकेच नाही, तर हॅमला सुखरूप पृथीवरदेखील परत आणण्यात आले. हॅमने १९८३ साली अखेरचा श्वास घेतला.

३. उंदीर

अनेक वर्षांपासून अंतराळ प्रवासाचा मानवी शरीरावर कसा परिणाम होऊ शकतो हे पाहण्यासाठी उंदरांचा वापर केला जात आहे. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर असणाऱ्या उंदरांवरील एक आभास नुकताच नासाने प्रकाशित केला आहे. त्यानुसार उंदीर गुरुत्वाकर्षणाच्या सूक्ष्म बदलांसारख्या परिस्थितीशी खूप लवकर जुळवून घेतो.
मात्र, असे असले तरी १९५० साली अंतराळात पाठविल्या गेलेल्या सर्वांत पहिल्या उंदराचा पॅराशूट बिघाड आणि रॉकेटचे विघटन यांमुळे दुर्दैवी मृत्यू झाला.

हेही वाचा : पदार्थांवर माश्या बसल्यावर नेमके काय घडते? हे वाचा, रस्त्यावरचे अन्नपदार्थ खाण्याआधी १० वेळा विचार कराल…

४. श्वान

माजी सोविएत युनियनअंतर्गत अनेक श्वानांना अंतराळ पाठविण्यात आले होते. त्यांच्यातील १९५७ मधील सर्वांत प्रसिद्ध श्वान म्हणजे लाइका. लाइका ही भटकी कुत्री होती. शास्त्रज्ञांच्या मते, रस्त्यावर भटकणारे श्वान या प्रयोगासाठी योग्य होते. कारण- कोणत्याही परिस्थितीशी जुळवून घेणयासाठी त्यांची तयारी असते.

लाइका पृथ्वीभोवती फिरणाऱ्या प्राण्यांमध्ये सर्वांत पहिली होती. मात्र, असे असले तरी ती परत कधीच पृथ्वीवर परतणार नसल्याचे ठरले होते. तिला केवळ एक दिवसाचे जेवण आणि सात दिवसांचा प्राणवायू पुरविण्यात आला होता. सोविएत सरकारच्या दाव्यानुसार लाइका सात दिवस जिवंत होती. मात्र खरे तर, लाइकाचे यान सुरू झाल्यानंतर प्रचंड तापले आणि अवघ्या पाच तासांतच तिचा मृत्यू झाला, असे समजते.

त्यानंतर कासव, बेडूक, कोळी, मासा यांसारख्या प्राण्यांना प्रयोगानिमित्त अंतराळात पाठविण्यात आले होते. इतकेच नाही, तर २००७ साली टार्डिग्रेड्स नामक जीव मनुष्याव्यतिरिक्त अंतराळात जिवंत राहणारा सर्वांत पहिला प्राणी होता. हा जीव अतिशय सूक्ष्म असून, कोणत्याही प्रकारच्या वातावरणाशी जुळवून घेण्यात तो पटाईत असतो. ऑक्सिजनचा अभाव, किरणोत्सर्ग, अतिप्रचंड थंडी अगदी कशाचाच परिणाम त्याच्यावर होत नाही. अशी सर्व माहिती बीबीसीच्या डिस्कव्हर वाइल्ड लाइफच्या एका लेखावरून मिळाली आहे.

[टीप – वरील सर्व माहिती ही क्रिस्टीना हॅरिसनने, डिस्कव्हर वाइल्ड लाइफसाठी लिहिलेल्या एका लेखातून समजते.]

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What animals went to space before humans and how many survive check out this amazing information dha
First published on: 18-02-2024 at 13:59 IST