World Heritage Day 2024: पृथ्वीवरील सांस्कृतिक वारसा आणि विविधता यांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी १८ एप्रिल या दिवशी, ‘वर्ल्ड हेरिटेज डे’ म्हणजेच जागतिक वारसा दिवस साजरा केला जातो. हा दिवस सर्वप्रथम संयुक्त राष्ट्रे शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संस्था अथवा युनेस्कोद्वारे [UNESCO] साजरा केला होता.

लोकांना तसेच स्थानिक नागरिकांना त्यांच्या सांस्कृतिक वारशाचे, विविध स्मारकांच्या जतनाचे महत्त्व समजण्यासाठी आणि ते जपण्यास प्रेरणा देणे असा या दिवसाचा हेतू आहे.

जागतिक वारसा दिवसाची यंदाची थीम : Theme Of World Heritage Day

१९८३ सालापासून स्मारके आणि साइट्सवरील आंतरराष्ट्रीय परिषदेने थीम ठेवण्यास सुरुवात केली. त्या थीमनुसार हा दिवस साजरा केला जातो. यंदा वर्ष २०२४ ची थीम ही ‘व्हेनिस चार्टरच्या दृष्टीतून आपत्ती आणि संघर्ष’ [Disasters & Conflicts Through the Lens of the Venice Charter] अशी ठेवण्यात आली आहे.

हेही वाचा : Voter ID and Aadhaar Linking : वोटर आयडीसह कसे करायचे आधार कार्ड लिंक? जाणून घ्या ही सोपी प्रक्रिया

भारतातील काही स्मारके [Monuments In India]

भारतात एकूण ३,६९१ स्मारके आणि सांस्कृतिक स्थळं असून, UNESCO ने त्यापैकी एकूण ४० जागांना जागतिक वारसा स्थळे म्हणून घोषित केले आहे. त्यापैकी काही निवडक जागांची थोडक्यात माहिती पाहू.

१. एलिफंटा लेणी

एलिफंटा किंवा घारापुरीची लेणी या मुंबईपासून साधारण १२ किलोमीटर अंतरावर असलेल्या आणि समुद्रात असलेल्या घारापुरी या लहान बेटावर डोंगरात कोरलेल्या आहेत. साधारण नवव्या शतकापासून ते १३ व्या शतकापर्यंतच्या कालखंडात या लेण्या कोरण्यात आल्या आहेत. १९८७ साली युनेस्कोने या लेण्यांना जागतिक वारसा स्थानाचा दर्जा दिला होता. घारापूरी लेण्यांच्या प्रवेशद्वाराजवळ हत्तीचे प्रचंड आकाराचे एक शिल्प होते, त्यावरूनच या लेण्यांना एलिफंटा लेणी असे नाव पडले.

२. वेरूळ लेणी

भारतात एकूण १२०० लेण्या असून, त्यातील तब्ब्ल ८०० लेण्या या महाराष्ट्रात आहेत. मात्र त्यांमधील औरंगाबादपासून सुमारे २८ कि.मी. अंतरावर असणाऱ्या आणि अतिशय कुशलतेने कोरलेल्या वेरूळ लेणी व त्यामध्ये कोरलेली शिल्पांना युनेस्कोने जागतिक वारसा म्हणून विशेष स्थान दिले आहे . वेरूळच्या लेणीसमूहात १६ वैदिक हिंदू, १३ बौद्ध आणि ५ जैन लेणी आढळतात. तीन धर्माचे अधिष्ठान असलेल्या आणि अत्यंत सुंदर अशा शिल्पाकृती आपल्याला एकाच ठिकाणी पाहायला मिळतात.

३. ताजमहाल

आग्र्यातील जगप्रसिद्ध ताजमहाल हा शाहजहानने त्याच्या पत्नी मुमताजसाठी बांधला होता. ताजमहालास बरेचदा प्रेमाचे प्रतीक म्हणूनदेखील संबोधित केले जाते. अतिशय सुंदर असा हा संगमरवरी ताजमहाल बांधून पूर्ण होण्यासाठी तब्ब्ल २२ वर्षे लागली होती.

४. हंपीची मंदिरे

कर्नाटकातील विजयनगर साम्राज्यात, तुंगभद्रा नदीजवळील १५ व्या शतकातील हंपीने जागतिक वारसा यादीत मानाचे स्थान पटकावले आहे. हंपीमध्ये अनेक सुंदर मंदिरे, वास्तू असून त्यावर विविध भित्तीचित्रे आहेत. जे इंग्लिश, पोर्तुगीज, चिनी, अरब लोकांशी होणाऱ्या व्यापाराचे दर्शन घडवतात. भारतातील ह्या प्रदेशातील सुबत्ता व संपन्नता जगभर आकर्षणाचे केंद्र होते.

५. सांची स्तूप

मध्य प्रदेशातील भोपाळ शहरापासून साधारण ४० कि.मी. अंतरावर हा महास्तूप स्थापन केलेला आहे. या स्तूपाची उंची ही तब्ब्ल १२० फुटांची आहे. या स्तुपाच्या एका भागाजवळ सम्राट अशोकाचा शिलालेख आहे. या स्तुपाच्या अवतीभवती सुंदर तोरणे उभारली असून, त्यामध्ये जातक कथेतील प्रसंगासह गौतम बुद्धांच्या जीवनातील प्रमुख प्रसंगांचे कोरीव काम अतिशय सुंदररित्या केलेले पाहायला मिळते. अशी सर्व माहिती आणि संदर्भ लोकसत्ताच्या लेखांमधून समजते.

हेही वाचा : हडप्पा संस्कृतीमध्ये झाला का वांग्याच्या भाजीचा उदय? वाचा शेफ कुणाल कपूरने दिलेली माहिती….

या व्यतिरिक्त कुतुबमिनार, लाल किल्ला, हवामहल, चारमिनार, अजिंठा एलोरा लेणी, खजुराहो मंदिर अशा विविध प्रसिद्ध आणि जागतिक वारसा म्हणून मान्यता मिळालेल्या ठिकाणांना तुम्ही यंदा भेट देऊ शकता.