२०२४ मध्ये जागतिक सरासरी वार्षिक तापमानवाढ प्री -इंडस्ट्रियल कालावधीपेक्षा १.५५ अंश सेल्सिअस जास्त असल्याची नोंद झाली. (प्री -इंडस्ट्रीयल कालावधी हा १८५० ते १९०० पर्यंतचा सरासरी कालावधी असतो) यासाठी विविध सहा ठिकाणांहून माहिती संकलन करण्यात आली. या सहापैकी युरोपीय केंद्राच्या कोपरनिकस हवामान बदल सेवेकडून (कोपर्निकस क्लायमेट चेंज सर्व्हिस (C3S)  मिळालेल्या डेटानुसार तापमान प्री इंडस्ट्रीयल कालावधीपेक्षा १.६ अंश सेल्सिअस जास्त होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विक्रमी वाढ

तापमानवाढीत २०२३ सालाने विक्रमी नोंद केली होती. त्यावर्षी सरासरी तापमान प्री  इंडस्ट्रीयल कालावधीपेक्षा १.४५ अंशांनी अधिक असल्याची नोंद झाली होती. पण २०२४ सालाने हा विक्रम मोडला. 

हेही वाचा >>>धरणे तुडुंब तरी नाशिक कोरडे…नवीन जलवाहिनीमुळे पाणी प्रश्न सुटेल?

१.५ अंशांचा टप्पा महत्त्वाचा

१.५ अंश सेल्सिअसचा टप्पा महत्त्वाचा असल्याचा उल्लेख २०१५ च्या पॅरिस करारात केला होता. जागतिक तापमानवाढ २ अंश सेल्सिअसच्या खालीच रोखण्याचे, किंबहुना ती १.५ अंश सेल्सिअसपर्यंत मर्यादित ठेवण्यसाठी प्रयत्न करण्याचे आवाहन यात करण्यात आले होते.

२०२४ मध्ये तापमानाने १.५ अंश सेल्सिअस वाढीचा टप्पा ओलांडला याचा अर्थ असा नव्हे की  तापमानवाढ रोखण्याचे उद्दिष्ट संपले. खरे तर १.५ किंवा २ अंशांपर्यंत वाढ मर्यादित ठेवण्याची उद्दिष्टे ही दीर्घकालीन तापमान ट्रेंडच्या संदर्भात आहेत. वर्ष किंवा महिन्यागणिक तापमानातील फरकांच्या संदर्भात नाही. उदाहरणार्थ, गेल्या दोन वर्षांत मासिक सरासरी तापमानाने अनेक वेळा १.५ अंश सेल्सिअस वाढीचा टप्पा ओलांडला आहे. दैनंदिन सरासरी तापमानाने तर शेकडो वेळा १.५ अंशाचा टप्पा ओलांडला आहे. हवामान बदलाच्या दृष्टिकोनातून पाहायचे तर एक किंवा दोन दशकातील सरासरी तापमान १.५ अंश सेल्सिअसच्या वर राहिले तरच हा टप्पा ओलांडला असे मानले जाईल. तापमानवाढीचा प्रत्येक अंश महत्त्वाचा आहे हे ओळखणे आवश्यक आहे. तापमानवाढ १.५ अंश सेल्सिअसपेक्षा कमी किंवा त्याहून अधिक असो, जागतिक तापमानवाढीची प्रत्येक अतिरिक्त वाढ आपल्या जीवनावर, अर्थव्यवस्थांवर आणि पृथ्वीवर होणारे परिणाम वाढवते, असे हवामान संघटनेचे सरचिटणीस सेलेस्टे साऊलो यांनी एका निवेदनात म्हटले आहे.

मागील दशक सर्वाधिक उष्ण

२०२३ आणि २०२४ या सलग दोन वर्षांच्या विक्रमी तापमानाने हे सुनिश्चित केले आहे की २०१५ ते २०२४ ही मागील दहा वर्षे सर्वाधिक उष्ण वर्षांमध्ये गणली जाणार आहेत. जुलै २०२३ पासून प्रत्येक महिन्यात, जुलै २०२४ चा अपवाद वगळता, १.५ अंश तापमानवाधीचा टप्पा ओलांडला आहे, असे ECMWF (युरोपियन सेंटर फॉर मिडियम-रेंज वेदर फोरकास्ट) चा डेटा दर्शवितो.

हेही वाचा >>>मृत्यूचं सोंग, गुरगुरणं आणि सुटका! नरांच्या बळजबरीपासून संरक्षणाची विलक्षण रणनीती; संशोधन काय सांगते?

एल निनोचा प्रभाव

तापमानातील या असामान्य वाढीमुळे हवामान बदलाच्या वाढत्या धोक्याबद्दल चिंता वाढली आहे. गेल्या जूनमध्ये संपलेल्या एल निनोच्या घटनेने देखील उष्णतेच्या वाढीस हातभार लावला. एल निनो म्हणजे पॅसिफिक महासागरातील तापमानवाढ. या तापमानवाढीमुळे जागतिक हवामानावर प्रभाव पडतो.

जगभरातील वाढत्या हवामान आपत्ती

२०२४ मधील हवामान आपत्तींची मालिका जगाने अनुभवली. यात विनाशकारी पूर आणि तीव्र उष्णतेच्या लाटा यांचा समावेश होता. या सर्व नैसर्गिक घटना नैसर्गिक असल्या तरी थेट हवामान बदलाशी संबंधित होत्या. वातावरणातील   कार्बन डायऑक्साइड आणि मिथेन उत्सर्जन वाढल्यामुळे ही तापमानवाढ होते. 

भारताची स्थिती काय?

भारतासाठी देखील २०२४ हे सर्वात उष्ण वर्ष होते, मात्र तापमानवाढ १.५ अंश सेल्सिअसपर्यंत नव्हती, असे भारतीय हवामान विभागाने या महिन्याच्या सुरुवातीला स्पष्ट केले आहे. भारतातील २०२४ चे तापमान प्री इंडस्ट्रीयल कालावधीतील तापमानापेक्षा अधिक नव्हते. एरव्हीदेखील भारतातील तापमान जागतिक सरासरीहून कमीच आहे.

२०२५ साली दिलासा?

२०२५ हे वर्ष मागील दोन वर्षांप्रमाणे नसण्याची शक्यता आहे. सुरुवातीच्या अंदाजानुसार यावर्षी तापमानाचा नवा विक्रम निर्माण होण्याची अपेक्षा नाही.  २०२५ मध्ये ‘ला निना’ स्थितीमुळे (प्रशांत महासागरातील समुद्राच्या पृष्ठभागावरील तापमान थंड राहण्याची स्थिती) वातावरण थंड राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 2015 to 2024 the ten warmest years essential to bring annual warming below a degree print exp amy