Independence Day History: स्वातंत्र्य दिनासंदर्भातील जोरदार तयारी सध्या शासकीय पातळीवर सुरु आहे. या वर्षीचा स्वातंत्र्य दिन हा अधिक खास आहे कारण यंदा आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव म्हणजेच ७५ वे वर्ष साजरं करत आहोत. भारत सरकारने या निमित्त ‘आजादी का अमृत महोत्सव’ नावाने देशभरात अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. सरकारने ‘हर घर तिरंगा’ मोहीम सुद्धा सुरु केली आहे. या मोहिमेमध्ये मोठ्या संख्येने भारतीयांनी सहभाग नोंदवला आहे.

नक्की वाचा >> विश्लेषण : ‘हर घर तिरंगा’ मोहीम आहे तरी काय? यामध्ये कसं सहभागी व्हायचं? यात सहभागी झाल्याचं प्रमाणपत्र कसं मिळतं?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘हर घर तिरंगा’ मोहिमेमसाठी नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. या नव्या नियमांनुसार नागरिकांना १३ ते १५ ऑगस्टदरम्यान त्यांच्या घरावर रात्रीही झेंडा फडकवता येणार आहे. स्वातंत्र्याचं महत्त्व अधोरेखित करणाऱ्या दिवसाच्या पार्श्वभूमीवर अनेक जुने किस्सेही चर्चेत आहेत. मात्र स्वातंत्र्य दिन म्हणून १५ ऑगस्टचीच निवड का करण्यात आली तुम्हाला ठाऊक आहे का? या लेखामध्ये आपण नेमकी हीच तारीख स्वातंत्र्य दिन म्हणून का निवडण्यात आली हे जाणून घेणार आहोत.

प्रत्येक पंतप्रधान देतात भाषण…
देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांनी १५ ऑगस्ट १९४७ रोजी दिल्लीतील लाल किल्ल्यातील लाहौरी गेटवर तिरंगा फडकवला होता. त्यानंतर या परंपरेचं पालन दर वर्षी प्रत्येक पंतप्रधान करतात. झेंडावंदनाबरोबरच लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान देशाला संबोधित करणारं भाषण करतात. तिरंगा झेंडा आपण एका स्वतंत्र भारत देशात राहतो असं दर्शवतो. मात्र स्वातंत्र्याचं महत्त्व अधोरेखित करण्यासाठी हाच दिवस निवडण्यामागे एक विशेष कारण आहे.

३० जून १९४८ पर्यंत होती मुदत पण…
स्वातंत्र्यासाठीचं आंदोलन हे अनेक वर्षांपासून सुरु होतं. मवाळ मतवादी, जहाल मतवाद्यांच्या प्रयत्नातून या देशाला स्वातंत्र्य मिळालं. अहिंसा, संघर्ष असा सर्वच मार्गांनी प्रयत्न केल्यानंतर अखेर ब्रिटिश संसदेने लॉर्ड माऊंटबॅटन यांना ३० जून १९४८ पर्यंत संपूर्ण सत्ता भारतीयांकडे हस्तांतरित करण्याचे निर्देश दिले. मात्र माऊंटबॅटन यांनी यामध्ये बदल करत १५ ऑगस्ट १९४७ रोजी संपूर्ण सत्ता भारतीयांकडे सोपवण्याचं ठरवलं. १५ ऑगस्ट १९४७ रोजी ब्रिटनने भारताला स्वतंत्र देश म्हणून घोषित करत सर्व कारभार भारतीय नेत्यांच्या हाती सोपवला.

…म्हणून १९४८ ऐवजी १९४७ लाच स्वातंत्र्य देण्याचा घेतला निर्णय
स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल सी. राजगोपालचारी यांनी माऊंटबॅटन यांनी निर्धारित वेळेच्या आधीच भारतीयांच्या हाती सत्ता का सोपवली यासंदर्भात भाष्य केलं होतं. लॉर्ड माऊंटबॅटन यांनी १९४८ पर्यंट वाट पाहिली असती तर मोठ्या प्रमाणात रक्तपात, दंगली किंवा हिंसा झाली असती असं त्यांना वाटत होतं. त्यामुळेच त्यांनी १९४८ पर्यंतच्या वाढीव मुदतीची वाट न पाहता लवकरात लवकर सत्ता हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळेच त्यांनी ब्रिटिश सरकारच्या निर्देशांनंतर अवघ्या काही आठवड्यांमध्ये भारतातील सत्ता ऑगस्ट १९४७ लाच भारतीयांकडे सोपवण्याचा निर्णय घेतला.

१८ जुलैला मिळाली संमती
माऊंटबॅटन यांनी सादर केलेल्या अहवालाच्या आधारे ४ जुलै १९४७ रोजी ब्रिटिश संसदेच्या हाउस ऑफ कॉमन्समध्ये भारताच्या स्वातंत्र्याबद्दलचा अधिनियम संमत करण्यात आला. १८ जुलै १९४७ रोजी भारतासंदर्भातील या ठरावाला ब्रिटनमध्ये शाही स्वीकृति देण्यात आली. त्या दिवसापासूनच भारतामधील ब्रिटिश सत्तेचा अंत झाल्याचं म्हटलं जातं.

१५ ऑगस्ट तारीख निवडण्यामागील कारण काय?
‘फ्रीडम अ‍ॅड मिडनाइट’ या पुस्तकामध्ये लॉर्ड माऊंटबॅटन यांनी भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी १५ ऑगस्ट याच तारखेची निवड का केली याबद्दल खुलासा केला. या पुस्तकामध्ये माऊंटबॅटन यांनी, “मी जी तारीख निवडली ती अगदी अचानकच निवडली. मी ही तारीख खरं तर एका प्रश्नाला उत्तर म्हणू निवडली होती. मला त्यावेळी हे दाखवायचं होतं की सगळं काही माझ्याच हाती आहे. मला जेव्हा त्यांनी (हाऊस ऑफ कॉमन्समध्ये) विचारलं की तुम्ही एखादी तारीख ठरवली आहे का? तेव्हा माझ्या डोक्यामध्ये केवळ एकच विचार होता की जो निर्णय घेणार तो लवकर घेतला पाहिजे. खरं तर मी त्यावेळी कोणत्याही तारखेचा विचार करुन गेलो नव्हतो. मी मनात विचार करताना ही तारीख ऑगस्ट अथवा सप्टेंबरच्या महिन्यात असावी हे मात्र निश्चित ठरवलं होतं. अखेर थोडा विचार करुन मी १५ ऑगस्ट असं उत्तर दिलं. मी हीच तारीख सांगण्याचं कारण म्हणजे दुसऱ्या महायुद्धामध्ये जपानने आत्मसमर्पण केल्याच्या घटनेला या दिवशी दोन वर्ष पूर्ण होणार होती,” असं १५ ऑगस्ट या तारखेची निवड करण्यासंदर्भातील कारणाबद्दल लिहिलं आहे.

त्यानंतर हाऊस ऑफ कॉमन्सने याच तारखेवर शिक्कामोर्तब केलं आणि भारताला १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळालं.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Did you know why august 15 was chosen as indian independence day scsg
First published on: 08-08-2022 at 14:45 IST