७ ऑक्टोबर २०२३ला हमासने केलेल्या भीषण हल्ल्यानंतर इस्रायलने युद्ध छेडले. हमास या दहशतवादी संघटनेचा संपूर्ण बिमोड करण्याचा विडा उचलून इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांनी सर्व ताकदीनिशी गाझा पट्टीवर हल्ला चढवला. युद्धाला आठ महिने उलटून गेल्यानंतर हमास शिल्लक आहेच, उलट ३७ हजारांपेक्षा जास्त पॅलेस्टिनींचा बळी घेतल्याबद्दल इस्रायलवर टीका होत आहे. त्यातच आता इस्रायलचे लष्कर आणि नेतान्याहू यांच्यात हमासबाबत भूमिकेतील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. लष्कराच्या प्रवक्त्याने केलेल्या एका विधानामुळे ही बाब उघड झाली…

लष्कराच्या प्रवक्त्याचे विधान काय?

‘हमास संपूर्ण नष्ट करण्याची किंवा ती संघटना गायब करण्याची भाषा म्हणजे जनतेच्या डोळ्यात धूळफेक ठरेल,’ असे वक्तव्य इस्रायली लष्कराचे मुख्य प्रवक्ता रिअर ॲडमिरल डॅनियल हॅगारी यांनी अलिकडेच केले. इस्रायलच्या ‘चॅनल १३’ या वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा दावा केल्यामुळे वाद निर्माण झाला. ‘हमास ही एक विचारधारा आहे. एक संकल्पना आहे. लोकांच्या (पॅलेस्टिनींच्या) मनांवर त्याची घट्ट पकड आहे. आपण हमासला संपवू शकतो, असे कुणाला वाटत असेल तर ती चूक आहे,’ अशी पुष्टीही हॅगारी यांनी जोडली. नेतान्याहू यांनी हमासचा संपूर्ण बिमोड होईपर्यंत, गाझाच्या शासन-प्रशासनातून हमासला हद्दपार करत नाही, तोपर्यंत हे युद्ध सुरू राहील, अशी वल्गना केली आहे. मात्र ज्या लष्कराच्या जिवावर ते ही भीष्मप्रतिज्ञा करून बसले आहेत, त्याच लष्करात नेतान्याहूंच्या उद्दिष्टांबाबत शंका असल्याचे स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा >>> २१ जून वर्षातील सर्वांत मोठा दिवस का ठरतो? त्यामागचे खगोलशास्त्रीय कारण काय?

नेतान्याहूंचे व लष्कराचे म्हणणे काय?

हॅगारी यांची मुलाखत प्रदर्शित होताच नेतान्याहू यांच्या कार्यालयाला तातडीने खुलासा करावा लागला. ‘पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली युद्धकालीन मंत्रिमंडळाने हमासचे सैन्य आणि त्यांची प्रशासकीय क्षमता नष्ट करणे हे या युद्धाचे एक उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवले आहे. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी इस्रायलचे सैन्य अर्थातच वचनबद्ध आहे,’ असे पंतप्रधान कार्यालयाला जाहीर करणे भाग पडले. तर लष्करानेही तातडीने पत्रक जारी करून स्पष्टीकरण दिले. ‘मंत्रिमंडळाने ठेवलेली युद्धाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी लष्कर कटिबद्ध आहे. युद्धकाळात लष्कर रात्रंदिवस झटत आहे आणि झटत राहील,’ असे स्पष्ट करतानाच हगारी यांच्या विधानाचा विपर्यास करण्यात आल्याचा दावाही लष्कराने केला आहे.

वरिष्ठ नेतृत्वामध्ये तीव्र मतभेद?

नेतान्याहू सरकारची युद्ध हाताळणी, त्याचे संभाव्य फलित याबाबत जगातील अन्य देशच नव्हे, तर खुद्द इस्रायली जनतेच्या मनातही तीव्र शंका आहे. सरकारमध्ये हमासबरोबर समझोत्याला विरोध करणारे अतिउजवे नेते नेतान्याहू सरकारमध्ये आहेत. इस्रायलचा ‘दत्तक पिता’ असलेल्या अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी मांडलेला युद्धविरामाचा प्रस्तावही अनेक महिन्यांपासून प्रलंबित आहे. माजी लष्करप्रमुख आणि मध्यममार्गी नेते बेनी गँट्झ याच महिन्याच्या सुरुवातीला नेतान्याहूंच्या युद्धहाताळणीवर नाराजी व्यक्त करत मंत्रिमंडळातून राजीनामा दिला. राफा या महत्त्वाच्या शहरात मदत पोहोचावी, यासाठी लष्कराने जाहीर केलेल्या धोरणात्मक युद्धविरामावर नेतान्याहू यांनी उघड नाराजी व्यक्त केली, त्यालाही फार दिवस लोटलेले नाहीत. ‘हा लष्करासह देश आहे, देशासह लष्कर नाही,’ अशी बोचरी टीका पंतप्रधानांनी केल्याचा दावा इस्रायली माध्यमांनी केला.

हेही वाचा >>> बायडेन आणि ट्रम्प यांच्यातील पहिल्या डिबेटमध्ये या ५ गोष्टींकडे असेल जगाचे लक्ष

नेतान्याहू यांच्यापुढे पर्याय काय?

इस्रायलचे १२० नागरिक अद्याप हमासने ओलिस ठेवले असून त्यातील किमान ४० जणांचा मृत्यू झाला असावा, अशी भीती आहे. युद्ध आणखी लांबले तर हा आकडा वाढण्याची शक्यता असल्याने त्वरित युद्धबंदीची मागणी इस्रायली नागरिक मोठ्या प्रमाणात करीत आहेत. अनेक माजी लष्करी अधिकारी, मध्यममार्गी-डावे नेते हीच मागणी करीत आहेत. मात्र नेतान्याहू यापैकी कुणाचेच ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याचे सध्यातरी दिसते. यामागे दोन कारणे असण्याची शक्यता तज्ज्ञ वर्तवित आहेत. पहिले म्हणजे हमासचा बिमोड झाला नाही, युद्धोत्तर गाझाच्या प्रशासनात हमासचे अस्तित्व कायम राहिले (आणि सध्यातरी हीच शक्यता अधिक आहे) तर तो एकाअर्थी नेतान्याहू यांचा पराभव असेल. ३७ हजारांवर पॅलेस्टिनींचा बळी घेतल्याचा जबाब त्यांना आज ना उद्या द्यावाच लागणार आहे. त्यासाठी किमान एखादे मोठे यश गाठीशी असावे, असा त्यांचा प्रयत्न आहे. युद्ध न थांबविण्याचे दुसरे कारण देशांतर्गत राजकारणात दडले आहे. नेतान्याहू यांच्यावर भ्रष्टाचाराचे खटले सुरू आहेत. शांतता प्रस्थापित झाली तर हे खटले पुन्हा अग्रस्थानी येतील. या खटल्यांतून सहिसलामत निसटण्यासाठी घटनादुरुस्ती त्यांना अद्याप रेटता आलेली नाही. त्यामुळे सध्यातरी ‘येन केन प्रकारेन’ युद्ध रेटत राहील, याची खबरदारी नेतान्याहू घेण्याचीच शक्यता अधिक आहे.

amol.paranjpe@expressindia.com