मंगळवारी लेबनॉनची राजधानी बैरूतमध्ये हेजबोलाचा महत्त्वाचा नेता फौद शुकुरू ठार झाला. याला २४ तास उलटण्यापूर्वीच इराणची राजधानी तेहरानमध्ये हमासच्या राजकीय शाखेचा सर्वोच्च नेता इस्माईल हनिये मारला गेला. शुकुरूची हत्या आपणच केल्याचे इस्रायली लष्कराने जाहीर केले असले, तरी हनियेवर झालेल्या हल्ल्याबाबत मात्र अद्याप संपूर्ण मौन बाळगले आहे. साधारणत: अन्य देशांत मोसाद किंवा दुसऱ्या एखाद्या यंत्रणेने केलेल्या हल्ल्यांची जबाबदारी इस्रायल स्वीकारत नाही, असा इतिहास आहे. मात्र इस्रायलच्या शत्रुराष्ट्रांतील अनेक महत्त्वाचे नेते आणि लष्करी अधिकारी असेच मारले गेले आहेत. यानिमित्ताने इस्रायलच्या ‘लक्ष्यवेधी’ हल्ल्यांचा हा इतिहास…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गाझा युद्धानंतर मारलेले महत्त्वाचे नेते कोण?

७ ऑक्टोबर २०२३ रोजी पहाटे हमासने पहाटेच्या वेळी बेसावध ठेवून केलेल्या हल्ल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांनी गाझा पट्टीत सैन्य घुसवून हमासविरोधात युद्ध छेडले. यात ४० हजारांवर सर्वसामान्य पॅलेस्टिनींचा बळी गेला असताना इस्रायलने हमासचे काही नेते टिपून मारले. गेल्याच महिन्यात हमासचा लष्करी कमांडर मोहम्मद दैफ याला ठार करण्यासाठी दक्षिण गाझातील अत्यंत गजबजलेल्या ठिकाणी इस्रायलने हल्ला केला. यात ९० नागरिक मृत्युमुखी पडले असले, तरी त्यांच्यात दैफ होता की नाही, याची मात्र खातरजमा होऊ शकलेली नाही. एप्रिलमध्ये सीरियातील इराणच्या वाणिज्य दूतावासावर हल्ला करून इस्रायलने दोन इराणी जनरल टिपले. जानेवारीत बैरूतमध्ये ड्रोन हल्ला करून हमासचा उच्चपदस्थ नेता सालेह अरोरीला इस्रायलने कंठस्नान घातले. त्याच्या आधीच्या महिन्यातही सीरियाची राजधानी दमास्कसवर ड्रोन हल्ला झाला. यात ‘रिव्हॉल्युशनरी गार्ड’ या इराणच्या निमलष्करी दलाचा दीर्घकालीन सल्लागार सय्यद रझी मौसावी मारला गेला.

हेही वाचा >>>विश्लेषण: इनाम जमिनींच्या श्रेणीवाढीतून काय साध्य होईल?

गेल्या दोन दशकांतील इस्रायलचे मोठे हल्ले कोणते?

२००० ते २०२० या काळात इस्रायलने इराण आणि इराणपुरस्कृत दहशतवादी संघटनांचे (ॲक्सेस ऑफ रेझिस्टन्स) अनेक लष्करी अधिकारी किंवा नेते ठार केले. २०१९मध्ये गाझातील ‘इस्लामिक जिहाद’ या संघटनेचा वरिष्ठ कमांडर बाहा अबू अल-अट्टा याच्या घरावर हवाई हल्ला केला. यात बाहा आणि त्याची पत्नी मारले गेले. २०१२ साली हमासच्या सशस्त्र शाखेचा प्रमुख अहमद जबरी याच्या मोटारीला लक्ष्य करण्यात ले .जबरीच्या हत्येनंतर हमास-इस्रायलमध्ये आठ दिवस युद्धही झाले. २०१०मध्ये हमासचा प्रमुख कार्यकर्ता महमूद अल-मबाऊ दुबईतील हॉटेलमध्ये मारला गेला. इस्रायलने या हत्येची जबाबदारी स्वीकारली नसली, तरी मोसादचे काही गुप्तहेर पर्यटकांच्या वेशात हॉटेलच्या सीसीटीव्हीमध्ये दिसले होते. २००८मध्ये हेजबोलाचा लष्करी प्रमुख इमाद मुघनी आत्मघातकी हल्ल्यात मारला गेला. २००४मध्ये हमासच्या धार्मिक शाखेचा नेता अहमद यासिन, २००२मध्ये हमासचा दुसऱ्या क्रमांकाचा लष्करी कमांडर सलाह शेहादे मारला गेला.

हेही वाचा >>>भोपाळ गॅस दुर्घटनेतील घातक कचर्‍याची ४० वर्षांनंतर विल्हेवाट लावणार; विल्हेवाटीसाठी इतक्या वर्षांची प्रतीक्षा का करावी लागली?

इराणच्या अणूशास्त्रज्ञांचीही इस्रायलकडून हत्या?

अण्वस्त्रसज्ज इराण म्हणजे केवळ इस्रायलच नव्हे, तर अमेरिकेसह संपूर्ण पाश्चिमात्य जगाची डोकेदुखी ठरणार हे निश्चित आहे. त्यामुळेच इराणचा अणूकार्यक्रम बंद पाडावा किंवा शक्य तितका लांबवावा असा प्रयत्न इस्रायलकडून सतत केला जातो. त्यासाठी प्रामुख्याने तीन मार्ग वापरले जातात. पहिला म्हणजे चर्चेच्या माध्यमातून इराणवर आणता येईल तितका दबाव आणणे, दुसरा मार्ग म्हणजे अनेक निर्बंध लादून अणूचाचण्यांसाठी कच्चा माल आणि अन्य साधनसामग्री सहज मिळणार नाही याची व्यवस्था करणे. तिसरा मार्ग म्हणजे अणूकार्यक्रमातील महत्त्वाच्या व्यक्तींना मार्गातून दूर करणे. अर्थात हा मार्ग अवलंबिल्याचे कुणीही मान्य करत नसले, तरी घटनांचे बिंदू जोडून हा निष्कर्ष सहज काढता येतो. २०१० ते २०२० या काळात मसूद अली-मोहम्मदी, माजिद शहरीरी, दारियस रेझाएनेजाद, मुस्तफा अहमदी रोशन आणि मोहसेन फखरीजादेह या इराणच्या पाच मोठ्या अणूशास्त्रज्ञांच्या हत्या झाल्या. फरेदून अब्बासी या आणखी एका अणूशास्त्रज्ञाच्या मोटारीतही बॉम्पस्फोट घडविण्यात आला. मात्र या हल्ल्यातून ते बचावले. या हत्यांमागे कोण आहे, हे आजतागात स्पष्ट झाले नसले, तरी पहिला संशय ‘मोसाद’वरच जातो. याचे तीन मोठे परिणाम बघायला मिळाले. एकतर या शास्त्रज्ञांकडे असलेली माहिती, तंत्रज्ञान त्यांच्याबरोबरच अस्तंगत झाले. दुसरा मोठा फायदा म्हणजे अणूप्रकल्प, प्रयोगशाळा आणि शास्त्रज्ञ-तंत्रज्ञांच्या सुरक्षेवर इराणची बरीच शक्ती खर्ची पडू लागली आणि तिसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे देशातील इतर शास्त्रज्ञ मृत्यूच्या भीतीने या प्रकल्पांपासून दूर राहिले. यामुळे इराणचा अणूकार्यक्रम किमान एक दशक लांबणीवर गेल्याचे मानले जाते.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Who killed ismail haniyeh the leader of the political wing of hamas in tehran print exp amy