पाकिस्तानविरुद्ध झालेल्या पाचव्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने २० धावांनी विजय मिळवला आणि मालिका ५-० ने खिशात घातली. ग्लेन मॅक्सवेलचे तुफानी अर्धशतक व उस्मान ख्वाजा, कर्णधार आरोन फिंच यांनीदेखील अर्धशतक झळकावत त्याला दिलेल्या सुरेख साथीच्या बळावर ऑस्ट्रेलियाने पाचव्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात पाकिस्तानचा पराभव केला. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या ३२८ धावांच्या प्रत्युत्तरात पाकिस्तानला ५० षटकांत ७ बाद ३०७ धावांपर्यंतच मजल मारता आली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ऑस्ट्रेलियाकडून प्रथम फलंदाजी करताना उस्मान ख्वाजाने १११ चेंडूत ९८ धावा केल्या. पण शतकाने त्याला हुलकावणी दिली. ख्वाजाने १० चौकार लगावले. सलामीवीर कर्णधार फिंचनेदेखील अप्रतिम अर्धशतक ठोकले. त्याने ६९ चेंडूत ५३ धावा केल्या. या दोघांनी ऑस्ट्रेलियाला १३४ धावांची सलामी दिली. त्यानंतर आलेल्या शॉन मार्शने ५ चौकार आणि १ षटकार खेचत ६१ धावांची खेळी केली. तर ग्लेन मॅक्सवेलने झंझावाती ७० धावा केल्या. १० चौकार आणि ३ षटकार यांच्यासह त्याने केवळ ३३ चेंडूत ही खेळी उभारली. शेवटच्या षटकात मात्र ऑस्ट्रेलियाचे फलंदाज फारसा प्रभाव पाडू शकले नाहीत.

३२८ धावांचा पाठलाग करताना सलामीवीर अबिद अली पहिल्या चेंडूवर बाद झाला. पण शान मसूद आणि हॅरिस सोहेल यांनी चांगली खेळी करत १०८ धावांची भागीदारी केली. शान मसूद ५० धावा काढून बाद झाला. पण हॅरिस सोहेलने १३० धावांची धमाकेदार खेळी साकारली. त्यात ११ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता. त्याच्याशिवाय इमाद वसीम (५०) आणि उमर अकमल (४३) यांनी काही काळ झुंज दिली, पण ती झुंज अपयशी ठरली. अटीतटीच्या लढतीत ऑस्ट्रेलियाचा संघ विजयी झाला.

संक्षिप्त धावफलक

ऑस्ट्रेलिया : ५० षटकांत ७ बाद ३२७ (उस्मान ख्वाजा ९८, ग्लेन मॅक्सवेल ७०; उस्मान शेनवारी ४/५९) विजयी वि. पाकिस्तान : ५० षटकांत ७ बाद ३०७ (हॅरिस सोहेल १३०, इमाद वासिम नाबाद ५०; जेसन बेहरनडॉर्फ ३/६३).

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Australia beat pakistan in 5th odi to win the series