पुणे वॉरियर्सच्या फलंदाजांनी घरच्या मैदानावर पुन्हा एकदा हाराकिरी केली. त्यामुळेच चेन्नई सुपर किंग्सने पुण्यावर ३७ धावांनी विजय मिळवून १६ गुणांसह अव्वल स्थान पटकावले. विजयासाठीच्या १६५ धावांच्या आव्हानाला सामोरे जाताना पुण्याला २० षटकांत ९ बाद १२७ धावा करता आल्या.
पुण्याच्या रॉबिन उथप्पा व आरोन फिन्च यांनी पहिल्या दोन षटकांत २६ धावा वसूल करीत चांगली सुरुवात केली. मात्र तिसऱ्या षटकांत मोहित शर्मा याने फिन्च (१५) व टी. सुमन (०) यांना बाद करत पुण्याच्या डावाला खिंडार पाडले. पाठोपाठ उथप्पा (१०) व युवराज सिंग (५) हे तंबूत परतल्यानंतर पुण्याची ४.५ षटकांत ४ बाद ४६ अशी दयनीय स्थिती झाली.
ल्युक राईटपाठोपाठ अभिषेक नायर धावबाद झाल्यानंतर केन रिचर्डसन व स्टीव्हन स्मिथ यांनी ३१ धावांची भागीदारी करत डाव सावरण्याचा प्रयत्न केला, मात्र स्मिथ हा रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याने ३५ धावा केल्या. भुवनेश्वर कुमारने जडेजास एकाच षटकात चौकार व षटकार ठोकून प्रेक्षकांचे मनोरंजन केले. भुवनेश्वर (नाबाद २५) व केन रिचर्डसन (२६) यांचे प्रयत्नही संघास विजय मिळविण्यासाठी कमी पडले.
संक्षिप्त धावफलक
चेन्नई सुपर किंग्स : २० षटकांत ३ बाद १६४ (सुरेश रैना नाबाद ६३, एस. बद्रीनाथ ३४, महेंद्रसिंह धोनी नाबाद ४५; ल्युक राईट १/१२) विजयी विरुद्ध पुणे वॉरियर्स : २० षटकांत ९ बाद १२७ (स्टीव्हन स्मिथ ३५, केन रिचर्डसन २६; मोहित शर्मा ३/२१)
सामनावीर : महेंद्रसिंग धोनी.