किवी फिरकीपटू एजाज पटेलचे ट्विटर अकाऊंट भारतीय स्टार ऑफस्पिनर रवीचंद्रन अश्विनच्या ट्वीटमुळे व्हेरिफाइड झाले आहे. इतकेच नव्हे, तर एकाच दिवसात त्याचे हजारो फॉलोअर्सही वाढले. एजाज पटेलसाठी भारताविरुद्धची दोन सामन्यांची कसोटी मालिका खूप संस्मरणीय होती. त्याने कानपूर कसोटीत आपल्या फलंदाजीने न्यूझीलंडची कसोटी वाचवली, त्यानंतर मुंबई कसोटीत पहिल्या डावात १० बळी घेत इतिहास रचला. एजाज पटेलचे इन्स्टाग्राम अकाउंट आधीच व्हेरिफाइड झाले होते, पण त्याचे ट्विटर अकाउंट व्हेरिफाइड झाले नव्हते, इतकेच नव्हे, तर त्याचे फॉलोअर्सही खूप कमी होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई कसोटी सामन्यानंतर रवीचंद्रन अश्विनने ट्वीटमध्ये एजाज पटेल आणि ट्विटर वेरिफाइड यांना टॅग केले. अश्विनने लिहिले, ”प्रिय व्हेरिफाइड ट्विटर, एका डावात १० विकेट घेणारा माणूस किमान व्हेरिफाइड अकाउंटसाठी पात्र आहे.” यानंतर काही वेळातच एजाज पटेलचे ट्विटर अकाउंट व्हेरिफाइड झाले. यासाठी अश्विनने ट्विटर व्हेरिफाइडचे आभार मानले आहेत.

न्यूझीलंडचा फिरकीपटू एजाज पटेलने मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर अप्रतिम गोलंदाजीचा नजराणा पेश करत भारताचा संपूर्ण संघ गारद केला. कसोटी सामन्याच्या एका डावात १० बळी घेत एजाजने मोठा पराक्रम केला. यासह त्याने भारताच्या अनिल कुंबळेची बरोबरी केली.

हेही वाचा – VIDEO : अर्ध्या तासात पालटलं नशीब..! रस्त्यावर विकत होता क्रेडिट कार्ड, इतक्यातच मित्र धावत आला अन् म्हणाला…

अनिल कुंबळे आणि एजाजव्यतिरिक्त इंग्लंडच्या जिम लेकर यांनी हा विक्रम पहिल्यांदा रचला होता. कसोटीच्या एका डावात १० बळी घेण्याचा पराक्रम फिरकी गोलंदाजांनीच केला आहे. पण पहिल्यांदाच एखाद्या गोलंदाजाने घराबाहेर हा पराक्रम केला आहे. याआधी कुंबळे आणि लेकर यांनी घरच्या मैदानावर ही कामगिरी केली होती. १९५६मध्ये इंग्लंडच्या लेकर यांनी (५१.२-२३-५३-१०) ओल्ड ट्रेफर्डवर ऑस्टेलियाविरुद्ध आणि १९९९मध्ये कुंबळेने (२६.३-९-७४-१०) पाकिस्तानविरुद्ध १० बळी मिळवले होते. एजाजने १० बळी परदेशात मिळवण्याची किमया साधली. न्यूझीलंडकडून आतापर्यंत रिचर्ड हेडली यांनी सर्वाधिक ९ बळी घेतले होते. हा विक्रमसुद्धा एजाजने मोडीत काढला.

मुंबई कसोटी सामन्यात भारतीय संघाने अप्रतिम कामगिरी करत ३७२ धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारतीय संघाने कसोटी मालिका १-० ने आपल्या नावावर केली.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kiwi spinner ajaz patel became a verified twitter user after ravichandran ashwin tweet adn