Heatwave Precautions : उन्हाळा सुरू झाला आहे आणि दिवसेंदिवस तापमान वाढत आहे. अशात उष्णतेपासून स्वत:ला वाचविणे अत्यंत गरजेचे आहे. कारण- उन्हाळ्यात उष्णतेशी संबंधित आजारांचा धोका वाढतो. उष्माघात, थकवा येणे, स्ट्रोक व हायपरथर्मिया यांसारख्या आरोग्याच्या समस्या दिसून येतात. अशात उष्णतेपासून स्वत:ला सुरक्षित ठेवण्यासाठी खालील महत्त्वाच्या टिप्स फायदेशीर ठरू शकतात.

भरपूर पाणी प्या – शरीराला पाण्याची कमतरता भासू नये यासाठी दिवसभर जास्तीत जास्त द्रव पदार्थांचे सेवन करा. पाणी, फळांचे रस, भाज्यांचे रसाचे तुम्ही सेवन करू शकता. त्याशिवाय स्पोर्ट ड्रिंक्स, लस्सी, ताक यांसारखी पेये तुम्ही पिऊ शकता. त्यामुळे तुमच्या शरीराला जास्तीत जास्त इलेक्ट्रोलाइट्स मिळतील.

हलके जेवण करणे – शरीरात पाण्याची कमतरता भासू नये म्हणून स्ट्रॉबेरी, संत्री, काकडी इत्यादींमध्ये पाण्याची मात्रा अधिक असते. असे पदार्थ निवडा.

व्यायामादरम्यान भरपूर पाणी प्या – व्यायाम करण्यापूर्वी दोन ते तीन ग्लास पाणी प्या. व्यायामादरम्यान दर २० मिनिटांनी एक ग्लास पाणी प्या आणि व्यायामानंतर ३० मिनिटांनी एक ग्लास पाणी प्या.

हेही वाचा : Skin Care Tips: मुग डाळीचा असा वापर कराल तर खऱ्या वयापेक्षा दिसाल लहान व तरुण; सुरकुत्या, पिंपल्सही होतील दूर!

शरीरात पाण्याची मात्रा कमी करणारे पदार्थ टाळा – कॅफिन किंवा अल्कोहोलचा समावेश असलेली पेये पिणे टाळा. कारण- ही पेये शरीरातील पाणी कमी करतात आणि त्यामुळे आपल्याला थकवा येतो.

थंड वातावरणात राहा – घराबाहेर पडताना कूलिंग स्प्रे बरोबर घ्या. त्याशिवाय उन्हाळ्यात घरातील पडदे किंवा खिडक्या बंद करून वातावरण थंड ठेवण्याचा प्रयत्न करा.

सुरक्षित राहा – उन्हाळ्यात मुले, वृद्ध व्यक्ती किंवा पाळीव प्राण्यांना पार्क केलेल्या कारमध्ये कधीही सोडू नका. उन्हाळ्यात उष्णतेमुळे गाडी पेट घेऊ शकते. उन्हाळ्यात कमीत कमी दोन वेळा अंघोळ करा आणि घराबाहेर पडताना हलके सुती किंवा सैल कपडे घाला.

कामाचे नियोजन करा – उष्णता पाहून कामाचे नियोजन करा. उष्णतेमध्ये धावपळ करणे टाळा; नाही तर तुम्ही आजारी पडू शकता.

गरजू लोकांना मदत करा – वृद्ध शेजारी, मुले, आजारी व्यक्ती, प्राणी किंवा पक्षी यांच्या आरोग्यावर उष्णतेचा परिणाम होऊ शकतो. त्यांना शक्य होईल तेवढी नेहमी मदत करा

डिहायड्रेशनची लक्षणे ओळखा – उन्हाळ्यात तोंड कोरडे पडणे, चक्कर येणे, डोकेदुखी इत्यादी लक्षणे दिसताच डॉक्टरांकडे जा. वरील सोप्या टिप्सच्या मदतीने उष्णतेचा सामना करा. जास्तीत जास्त पाणी पिणे आणि शरीर शीत / थंड ठेवणे उन्हाळ्यात सर्वांत जास्त फायदेशीर ठरू शकते.