लोकसत्ता प्रतिनिधी

सोलापूर : महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील अक्कलकोट तालुक्यातील हैद्रा येथील प्रसिध्द हजरत ख्वाजा सैफुलमुल्क दर्गाहच्या सेवेकऱ्यांमध्ये वाद निर्माण झाला असून त्याचे पर्यवसान दर्गाहच्या व्यवस्थापन कार्यालयाचे कुलूप तोडून धमकावण्यापर्यंत झाले आहे. याप्रकरणी अक्कलकोट दक्षिण पोलिसांनी दर्गाहमधील चार सेवेकऱ्यांविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.

यासंदर्भात दर्गाहमधील एक सेवेकरी म. युसूफ बादशाह मुजावर (वय ७०) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार रफिक शिराजोद्दीन मुजावर (वय ४०), अब्दुल ऊर्फ अहमदसाहेब मुजावर (वय ३६), बंदेनवाज तालाबअली मुजावर (वय ४६) आणि वकील नबीलाल ऊर्फ वस्ताद मुजावर (वय ५४) यांच्या विरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.

आणखी वाचा-सांगोल्याजवळील स्फोटाचे गूढ चौथ्या दिवशीही कायम

सैफुलमुल्क बाबांचा दर्गाह आठशे वर्षांपूर्वी जुना असून महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणातील हजारो हिंदू-मुस्लिमांसह अठरापगड जाती-जमातींच्या भाविकांची या दर्गाहवर श्रध्दा आहे. दर अमावस्या, दर गुरूवार आणि उरूसामध्ये भाविक मोठ्या प्रमाणावर दर्शनासाठी येतात आणि नवस पूर्ण करतात. परंतु या दर्गाहमध्ये वंशपरंपरेतील सेवेकरी तथा विश्वस्तांमध्ये अधुनमधून वाद होतो. भाविकांकडून बळजबरीने मोठ्या रकमेची दक्षिणा उकळली जाते, अशाही तक्रारी आहेत.

या पार्श्वभूमीवर पहाटे गुपचूपपणे दर्गाह परिसरातील व्यवस्थापन कार्यालयाच्या बंद दरवाज्याचे कुलूप तोडण्यात आल्यामुळे त्याबाबत तेथील रखवालदार सेवेकरी आता अ. गनी मुजावर यांनी विचारणा केली असता त्यांना रफिक मुजावर व इतरांनी दमदाटी व शिवीगाळ करीत दर्गाह परिसरातून बाहेर हाकलून देण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.