संदीप आचार्य
दादर येथील सिद्धिविनायक मंदिर न्यासाच्या माध्यमातून वेगवेगळ्या क्षेत्रातील गरजू रुग्णांना तसेच सामाजिक संस्थांना भरभरून मदत करण्यात येते. तथापि गेल्या काही वर्षांपासून मूत्रपिंड विकाराचे वाढते रुग्ण लक्षात घेऊन सिद्धिविनायक मंदिर न्यासाच्या माध्यमातून डायलिसीस सेवा मोठ्या प्रमाणात गरजू रुग्णांना उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आगामी काळात अष्टविनायकांच्या ठिकाणी डायलिसीस सेवा सुरु करण्याचा प्रस्ताव सिद्धिविनायक मंदिर न्यासाने मांडला आहे. त्याचप्रमाणे कोल्हापूरजवळील नरसोबाची वाडी या जागृत दत्तस्थानीही सिद्धिविनायकाच्या माध्यमातून लवकरच डायलिसीस सेवा सुरु करण्यात येणार आहे.
महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशभरातील गणेशभक्तांसाठी अष्टविनायक हे भक्तीचे केंद्र आहे. या अष्टविनायकांच्या ठिकाणी लक्षावधी भक्त दर्शनासाठी जात असतात. या अष्टविनायकांच्या ठिकाणी डायलिसीस सेवा केंद्र सुरु करण्याचा संकल्पना सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी मांडली असून याबाबतची बैठकही संबंधित मंदिरांच्या प्रतिनिधींबरोबर झाल्याचे बांदेकर यांनी सांगितले. त्याचप्रमाणे नरसोबाची वाडी येथे डायलिसीस सेवा केंद्र सुरु करण्याचा निर्णयही घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या सर्व देवस्थानांच्या ठिकाणी देवस्थान समितीने जागा व डायलिसीस मशिन उपलब्ध करून देणे अपेक्षित असून सिद्धिविनायक मंदिराच्या माध्यमातून ही डायलिसीस केंद्रे चालविण्यात येणार आहेत. सिद्धिविनायक मंदिर न्यासाच्या माध्यमातून आम्ही अष्टविनायक देवस्थान समितीला सुरुवातीला डायलिसीस केंद्र सुरु करण्याबाबतचे पत्र दिले असून प्रत्येक मंदिराच्या ठिकाणी किमान चार डायसिसीस मशिन बसविण्याचा मानस असल्याचे बांदेकर यांनी सांगितले.
सिद्धिविनायक मंदिराच्या माध्यमातून सध्या मुंबईत तीन ठिकाणी डायलिसीस सेवा चालविण्यात येत असून गेल्या सहा वर्षात या केंद्रांच्या माध्यमातून किडनी रुग्णांना एक लाख १२ हजार २६४ डायलिसीस सायकल देण्यात आली असून यासाठी सुमारे सहा कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. याशिवाय राज्याच्या आरोग्य विभागाला सिद्धिविनायक न्यासाच्या माध्यमातून १०३ डायलिसीस मशिन देण्यात आली असून यासाठी नऊ कोटी रुपये खर्च आला. आदेश बांदेकर यांच्या म्हणण्यानुसार, गेल्या सहा वर्षांच्या त्यांच्या अध्यक्षपदाच्या काळात २६ हजार १९३ गरीब व गरजू रुग्णांना वैद्यकीय मदतीपोटी ६० कोटी २१ लाख ३९ हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे जन्मत: ऐकू न येणाऱ्या मुलांसाठी कॉक्लिअर इंप्लांट शस्त्रक्रियेसाठी चार कोटी ८३ लाख ५० हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली. याचा लाभ ५३८ मुलांना झाला आहे.
आगामी काळात डोंबिवली पूर्व येथील गणेश मंदिर संस्थेबरोबर डायलिसीस केंद्र सुरु करण्यात येणार असून चेंबूर येथे सुफला ट्रस्टबरोबर डायलिसीस केंद्र सुरु करण्यात येणार आहे. याशिवाय सिंधुदुर्ग येथेही एक डायलिसीस केंद्र सिद्धिविनायक मंदिराच्या माध्यमातून चालविण्याचा निर्णय घेण्यात आला असून नरसोबाची वाडी येथे डायलिसिस केंद्र सुरु करण्याचे तत्त्वत: मंजूर करण्यात आले असून नृसिंहवाडी संस्थेकडून याबाबतचा प्रस्ताव प्राप्त झाल्यावर पुढील कार्यवाही केली जाईल, असे आदेश बांदेकर यांनी सांगितले.
अष्टविनायकांच्या ठिकाणी डायलिसीस सेवा सुरु करणे हे माझे स्वप्न होते व त्यासाठी मी पुढाकार घेतला असून आगामी काळात या सर्व ठिकाणी डायलिसीस केंद्र सुरु झालेली असतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. डायलिसीस सेवा ही अत्यंत खार्चिक असून गरीब तसेच मध्यमवर्गीय रुग्णांच्या आवाक्याबाहेर असते. खाजगी रुग्णालयांमध्ये एका डायलिसीससाठी सुमारे दोन ते अडीच हजार रुपये खर्च येतो. प्रत्येक रुग्णाला आठवड्यातून किमान तीन वेळा डायलिसीस करावे लागत असल्याने या सेवेचा विस्तार करण्याचा निर्णय घेतल्याचे बांदेकर म्हणाले. सिद्धिविनायक मंदिर न्यासाच्या माध्यमातून आगामी काळात अष्टविनायक व अन्य ठिकाणी चालविण्यात येणाऱ्या डायलिसीस सेवा केंद्रामध्ये रुग्णाकडून एकवेळच्या डायलिसीससाठी दोनशे ते अडीचशे रुपये एवढा माफक दर आकारण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
राज्य सरकारच्या आरोग्य विभागाच्या रुग्णालयात सध्या ३३६ डायलिसीस मशनच्या माध्यमातून रुग्णांना वर्षिक ८४ हजार डायलिसीस सायकल दिल्या जातात. ही सेवा मोफत असून आगामी काळात आरोग्य विभाग आणखी ३०० डायलिसीस मशिन घेणार आहे. तथापि मूत्रपिंड विकाराचे वाढते रुग्ण लक्षात घेता स्वयंसेवी संस्थांनी यात पुढाकार घेऊन माफक दरात ही सेवा रुग्णांना उपलब्ध करून देणे गरजेचे असल्याचे आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. सिद्धिविनायक मंदिर न्यासाने यात मोठा पुढाकार घेतला असून आज शेकडो रुग्णांना यामुळे मोठा दिलासा मिळत आहे.