Eknath Khadse on Girish Mahajan : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि विधान परिषदेतील आमदार एकनाथ खडसे यांनी एका पत्रकाराच्या वृत्ताचा हवाला देत मंत्री गिरीश महाजन यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांसंदर्भात ते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा करणार आहेत. आज एकनाथ खडसे यांनी यासंदर्भात एक व्हिडिओ प्रसिद्ध करून गिरीश महाजन यांच्यावर आरोप केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एकनाथ खडसे म्हणाले, गिरिश महाराजांनाच्या रंगल्या रात्री अशा विषयाखाली एका पत्रकाराने एक क्लिप प्रकाशित केली आहे. त्यात संबंधित पत्रकाराने सांगितलंय की गिरीश महाजानांचे महिला आयएएस अधिकाऱ्याबरोबर संबंध आहेत. त्यांचं नाव मला माहितेय पण ते सांगणं उचित होणार नाही.”

अमित शाहांकडे गिरीश महाजनांचे सीडीआर

“मंत्रिमंडळ विस्ताराच्या बैठकीवेळी अमित शाहांनी गिरीश महाजनांना या संबंधित महिला आयएएस अधिकाऱ्याविषयी विचारलं होतं. तेव्हा गिरीश महाजन म्हणाले होते की कामाच्या निमित्ताने माझे अनेकांबरोबर संबंध आहेत. अमित शाहांनी तेव्हा सांगितलं की तुमचे (गिरीश महाजन यांचे) कॉल डिटेल्स माझ्याकडे आहेत. १०० वेळा त्या महिला आयएएस अधिकाऱ्याबरोबर तुझे कॉल झालेले आहेत. पुढे काहीही सांग, तुझा सीडीआर खरं बोलतो. अमित शाहांच्या वक्तव्याचा हवाला देऊन संबंधित पत्रकाराने काही प्रश्न उपस्थित केले आहेत”, असं एकनाथ खडसे म्हणाले.

मी अमित शाहांना विचारणार आहे

“मला वाटतं, (अमित शाहांकडे असलेले) सीडीआर तपासले तर खरी वस्तुस्थिती समोर येईल. गिरीश महाजनांच्या रंगल्या रात्री, असं पत्रकाराने म्हटलंय. मीही अमित शाहांची भेट झाली तर यातील तथ्य किती आहे हे विचारणार आहे”, असं एकनाथ खडसे म्हणाले.

गिरीश महाजनांचे संबंध सर्वश्रुत

माध्यमांशी बोलताना एकनाथ खडसे म्हणाले, “गिरीश महाजानांचे हे संबंध अवघ्या राज्याला माहीत आहे. हे आजचं नाही. गेल्या कित्येक वर्षापासून महाराष्ट्रात ही चर्चा सुरू आहे. या अधिकाऱ्याचे नावही सर्वांना श्रूत आहे. आयएएस अधिकाऱ्यांना मंत्री फोन करत असतील आणि त्यात जर तथ्य असेल तर त्यांना मंत्रि‍पदावर राहण्याचा अधिकार काय? नैतिकता आहे की नाही? बायकांना रात्री फोन करणे योग्य आहे का. सर्वांना हे प्रकरण माहितेय.”

गिरीश महाजनांचे प्रत्युत्तर काय?

एकनाथ खडसे यांनी आरोप केल्यानंतर मंत्री गिरीश महाजन यांनीही तत्काळ प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “मी एक गोष्ट सांगितली तर घराबाहेर पडल्यावर एकनाथ खडसेंना लोक जोड्याने मारतील. माझं त्यांना आव्हान आहे की त्यांनी एक पुरावा दाखवावा, मी सक्रिय राजकारणातून बाहेर पडेन. मी कधीही कुणालाही तोंड दाखवणार नाही. तसंच जे काही आहे ते लोकांना दाखव फालतू बडबड करु नको. माझा अंत बघू नका. मी जर एका गोष्टीचा खुलासा केला तर खडसेंना तोंड काळं करुनच बाहेर पडावं लागेल. घरातलीच गोष्ट आहे पण मी बोलणार नाही. एका भोंदू पत्रकाराला सांगून हा विषय उचलायला लावला आहे, त्यातून हा विषय झाला आहे”, असं प्रत्युत्तर गिरीश महाजन यांनी दिलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eknath khadse allegations on minister girish mahajan over female ias officer call recordings sgk