शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना पत्रा चाळ गैरव्यवहार प्रकरणामध्ये सक्तवसुली संचलनालयाने केलेल्या अटकेच्या प्रकरणात जामीन नाकारण्यात आला आहे. संजय राऊत यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. याचसंदर्भात पत्रकारांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंना प्रश्न विचारला असता त्यांनी केंद्रीय संस्थांच्या कारवाया या सरकारविरोधात बोलणाऱ्यांविरोधात वाढल्याचं दिसत आहे, असं नमूद केलं आहे. तसेच त्यांनी भारतीय जनता पार्टीला लक्ष्य करताना लॉण्ड्री असा उल्लेख केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संजय राऊत यांनी जामीनासाठी अर्ज केला होता. मात्र जामीन झालेला आहे. माजी गृहमंत्री अमित देशमुखांना जामीन नाही. नवाब मलिकांना जामीन नाही. काय नेमकं राजकारण वाटतंय तुम्हाला यामागे? असा प्रश्न सुप्रिया सुळेंना विचारण्यात आला. या प्रश्नावर उत्तर देताना सुप्रिया यांनी, “काहीतरी कुठंतरी शिजतंय. दोन आठवड्यांपूर्वी वर्तमानपत्रात माहिती अधिकार कार्याअंतर्गत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर आधारित सविस्तर बातमी आली होती. त्यात म्हटलं होतं की या देशामध्ये ९० टक्क्यांपेक्षा जास्त, जवळपास ९५ टक्क्यांपर्यंत असेल. ईडी, सीबीआय आणि आयकर विभागाची प्रकरणं आहेत ती विरोधकांची आहेत. असं वर्तमानपत्रात आलं असून असा सरकारचा डेटा आहे,” असा संदर्भ दिला.

“छापेमारीमध्ये वाढ झाली आहे. लोकांना अटक करण्यात वाढ झाली आहे. जी वाढ झाली आहे ती विरोधात बोलतात त्यांच्या किंवा विरोध पक्षांमध्येच झालेली आहे,” असंही सुप्रिया यांनी म्हटलं आहे. तसेच त्यांनी भाजपावरही टीका केली. “अनेक असे भाजपा लॉण्ड्रीचे खासदार, पदाधिकारी, वरिष्ठ नेते आहेत. ज्यांना मी तुमच्याच चॅनेलवर बोलताना पाहिलं आहे की आम्हाला शांत झोप येते कारण आम्ही भारतीय जनता लॉण्ड्रीमध्ये आहोत. ना आमच्याकडे सकाळी सातला ईडीची रेड येते ना सीबीआयची. हे आम्ही नाही म्हणत आहोत तेच म्हणत आहेत,” असं सुप्रिया यांनी पत्रकारांना दिलेल्या उत्तरामध्ये नमूद केलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Supriya sule on sanjay raut denied bail in patra chawl case scsg
First published on: 04-10-2022 at 14:05 IST