Tanaji Sawant : माजी मंत्री तानाजी सावंत ( Tanaji Sawant ) यांच्या मुलाचं अपहरण झाल्याच्या बातम्या समोर आल्या. काही वेळापूर्वीच पोलिसांची पत्रकार परिषदही झाली. दरम्यान तानाजी सावंत यांना हा प्रश्न विचारण्यात आला की तुमचा मुलगा ऋषीराज बेपत्ता झाला की त्याचं अपहरण झालं? या प्रश्नावर तानाजी सावंत यांनी महत्त्वाचं उत्तर दिलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तो निनावी फोन आणि…

तानाजी सावंत ( Tanaji Sawant ) यांच्या मुलाचे पुणे विमानतळ परिसरातून अपहरण झाल्याचा एक निनावी फोन पुणे पोलिस कंट्रोल रुमला आला होता. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. ऋषीराज सावंत यांचा स्विफ्ट गाडीतून चौघांनी अपहरण केल्याच्या बातम्या समोर आल्या. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्या कात्रजमधील निवासस्थानी जाऊन तपास सुरू केला. या आधी ऋषीराज सावंत यांना खंडणीसाठी कुणाचा कॉल आला होता का याची माहिती पोलिसांनी घेतली.

तानाजी सावंत काय म्हणाले?

पुणे पोलिसांनी पत्रकार परिषद घेतली तेव्हा तानाजी सावंत ( Tanaji Sawant ) हे देखील उपस्थित होते. यावेळी तानाजी सावंत हे म्हणाले की, “ऋषीराज सावंत विमानाने गेल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, आमचं बोलणं झालेलं नाही. ड्रायव्हर मुलाला सोडवायला गेला होता, त्याने आम्हाला माहिती दिली की मी मुलाला पुणे विमानतळावर सोडून आलो. त्यामुळे आम्हाला कळलं की विमानतळावर आला. अजून त्याच्याबरोबर त्याचे दोन मित्रही आहेत. पण ते नेमकं कुठे गेलेत? याबाबत आम्हाला काही माहिती नाही. मुलाबरोबर माझं बोलण होत असतं तसं आज बोलणं झालेलं नाही. त्यामुळे आम्हाला चिंता लागली आहे”, अशी माहिती तानाजी सावंत ( Tanaji Sawant ) यांनी सांगितली.

माझा मुलगा ऋषिराज सावंत बेपत्ता नाही-तानाजी सावंत

“मुलगा ऋषीराज सावंत हा बेपत्ता किंवा अपहरण असं अद्याप काहीही नाही. कारण त्याचे दोन मित्रच आहेत. त्याच्यामध्ये दुसरं नवीन कोणीही नाही. पण त्याने त्याची गाडी वापरली नाही. त्याने दुसऱ्यांची गाडी वापरली त्यामुळे आम्हाला चिंता लागली. पण आमचा कायम संपर्क असतो. पण आज आमचं बोलणं झालं नाही. त्यात आज त्याचा फोन आला नाही. तसेच अचानक तो पुणे विमानतळावर कशाला गेला? त्यामुळे आम्ही पोलिसांकडे आलो. येथे आल्यानंतर माहिती समजली की ते एका खासगी विमानाने गेले आहेत. त्यामुळे आता ते कुठे जातात? आम्ही माहिती घेत आहोत”, अशी माहिती तानाजी सावंत ( Tanaji Sawant ) यांनी सांगितली आहे

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tanaji swant gave answer on question is rushiraj sawant kidnapped by some goons what did he say scj