बिग बी, महानायक अशा विविध नावाने ओळखले जाणारे अमिताभ बच्चन यांचा कलाविश्वामध्ये चांगलाच दबदबा आहे. विशेष म्हणजे कलाविश्वामध्ये नाव कमावूनही बिग बी प्रत्येक व्यक्तीसोबत आदराने वागतात. त्यामुळेच त्यांची लोकप्रियता कमालीची आहे. बिग बी जितका आदर त्यांच्या चाहत्यांना किंवा चित्रपटाच्या सेटवर देतात. तितकाच आदर ते आपल्या कुटुंबीयांनादेखील देतात. अमिताभ यांनी १९७३ साली अभिनेत्री जया बच्चन यांच्यासोबत लग्न केलं असून आजही त्यांच्यातील नातं कायम आहे. खरं तर कलाविश्वातील असंख्य जोडपी मतभेदामुळे विभक्त झाली आहेत. मात्र या साऱ्यामध्ये बिग बी आणि जया बच्चन यांची जोडी निराळी आहे. या दोघांनी जीवनात अनेक चढ-उतार पाहिले परंतु आजही ते एकमेकांची साथ देताना दिसून येतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ग्लॅमरच्या झगमगाटामध्ये आजवर अनेक जोडप्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. मात्र या साऱ्यामध्ये संसार कसा करावा आणि तो कसा टिकून ठेवावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे बिग बी आणि जया बच्चन. त्यामुळे त्यांची लव्ह स्टोरी नक्की कशी असावी याविषयी साऱ्यांना उत्सुकता आहे.

बॉलिवूडच्या सर्वाधिक यशस्वी जोड्यांपैकी एक असलेल्या अमिताभ आणि जया यांची लव्ह स्टोरी रंजक आहे. अमिताभ बच्चन आणि जया हे पूर्वीपासूनच एकमेकांना ओळखत होते. मात्र महाविद्यालयीन शिक्षण सुरु असताना जया अमिताभ यांच्या प्रेमात पडल्या. त्यातच त्या पुण्यात शिक्षण घेत असताना बिग बी त्यांच्या पहिल्या ‘सात हिंदुस्तानी’ या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी पुण्यात आले होते. विशेष म्हणजे अमिताभ यांना पाहताच जया यांच्या मैत्रिणींनी त्यांना चिडवून प्रचंड त्रास दिला होता. त्यानंतर बिग बींप्रमाणेच जया यांचीही पावले चित्रपटसृष्टीकडे वळाली. चित्रपटसृष्टीत पदार्पण केल्यानंतर जया यांनी हृषिकेश मुखर्जी यांच्या ‘गुड्डी’ या चित्रपटामध्ये अमिताभ यांच्यासह स्क्रिन शेअर केली. त्यानंतर या दोघांची जवळीक झाली आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. विशेष म्हणजे एकत्र राहण्याच्या आणाभाका घेतलेल्या या दोघांनी ३ जून १९७३ साली लग्नगाठ बांधली.

लग्नानंतर जया आणि बिग बी यांच्या आयुष्यात अनेक वादळं आली.मात्र, या साऱ्याला ते खंबीरपणे सामोरे गेले. याच दरम्यान, अमिताभ आणि रेखा यांच्या लव्हस्टोरीचीदेखील जोरदार चर्चा रंगली होती. त्यामुळे जया आणि बिग बी यांचं वैवाहिक आयुष्य धोक्यात आले होते. मात्र या संकटावरही त्यांनी एकत्र मात केली. त्यामुळेच त्यांचा आज संसार सुरळीतपणे सुरु आहे. विशेष म्हणजे या जोडीला बॉलिवूडमध्ये ‘गोल्डन कपल’ म्हणून ओळखलं जातं.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amitabh and jaya bachchan love story ssj